नानाच्या ताना !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तर सर्वच हिंदू समाज आपला वाटतो; पण रामद्रोही, राष्ट्रद्रोही यांना त्यांना समजणाऱ्या भाषेत समजावून सांगण्याची जबाबदारीसुद्धा स्वयंसेवक जाणतो… 


सध्या महाराष्ट्र प्रांतात काँग्रेस ने प्रदेश अध्यक्ष म्हणून नाना पटोले नामक दुसऱ्या पक्षातून आलेले हे गृहस्थ नियुक्त केले आहेत . १३५ वर्ष पूर्ण झालेल्या काँग्रेस ची ही दिवाळखोरी आहे आणि त्याबद्दल न बोललेले बरे . त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे . पण जेव्हा त्यांच्या घाणेरड्या राजकारणात संघाचे नाव ते घेतात तेंव्हा लाखो स्वयंसेवक अस्वस्थ होतात . Nana Patole must be reasonable over RSS criticism

हे महाशय काही वर्षे भाजप मध्ये होते. देशभरात निर्माण झालेल्या राष्ट्रवादी विचाराच्या प्रभावात निवडून आले आणि नंतर त्यांना अचानक मोदी शेतकरी विरोधी असल्याचा साक्षात्कार झाला आणि मग गडकरी यांच्या विरुद्ध पराभव झाला तर राजकारण संन्यास घेईल अशी घोषणा करून ते मोकळे झाले. ते निवृत्त होणार नव्हतेच, पण नागपूरकरांनी त्यांना जागा दाखवली. मोदी विरुद्ध जितके विखारी बोलू तेव्हढे मोठे बक्षीस ! ह्या गुणवत्तेवर आधी विधानसभा अध्यक्ष आणि आता मंत्री होण्यासाठी संघ आणि संघ विचाराच्या लोकांना झोडपण्याचा मंत्र आणि तंत्र यांनी सुरू केले आहे.ज्या पक्षाचे ते प्रतिनिधी आहेत त्या पक्षाचे पहिले पंतप्रधान म्हंटले होते भ्रष्टाचारी आणि काळाबाजार करणाऱ्या ना जाहीर फाशी दिले पाहिजे. मग त्या पक्षाच्या इंदिरा गांधी काळात नगरवाला ते तुलमोहन राम प्रकरण घडले .नंतर राजीव गांधी बोफोर्स आणि फेअर फॅक्स प्रकरणात गेले . नरसिंह राव काळात शेअर घोटाळा झाला आणि त्यांच्या आजच्या मॅडम आणि राजपुत्र तर भ्रष्टाचाराच्या आरोपा खाली जामिनावर बाहेर आहेत.

संघ त्यांच्या निष्ठावान स्वयंसेवकांनी ध्वजासमोर समर्पित केलेल्या गुरुदक्षिणा समर्पणाच्या आधारावर आपली आर्थिक व्यवस्था चालवतो, हे नानांना पक्के माहिती आहे. पण त्यांना हे आपण असे जर संघाविरुद्ध बोललो तरच आपल्याला मंत्रीपद मिळू शकते, असे वाटते म्हणून नाना अशा ताना मारत आहेत . पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की अशा मुळे ते लक्षावधी स्वयंसेवक जे प्रामाणिक आहेत त्यांची हाय घेत आहेत. मधे राममंदिर निर्माण समर्पण निधी बद्दल विधानसभेत ते बोललेच होते आता संघाबद्दल बोलले. अशीच हाय मुलायम आणि लालूने खाल्ली रामभक्तांची ! परिणाम काय होतो आहे ?

जरा माहिती घ्या. प्रामाणिक माणसाचा तळतळाट खूप वाईट असतो आणि उशीरा पण परिणामकारक असतो. नानाने किती ही ताना मारल्या तरी लोकांना सगळे कळते. आपत्तीप्रसंगी कोरोना असो पूर असो दुष्काळ असो कोण धावून जाते? लोक आपत्ती काळात सेवा भारती कडेच का निधी देतात ? कारण नाना, स्वयंसेवक काम करताना व्यवहार पारदर्शी ठेवतात. २०१४ च्या तुमच्या निवडणुकीत देशामध्ये आवश्यक असणाऱ्या परिवर्तनासाठी असंख्य स्वयंसेवकांनी तुमच्यासाठी काम करताना एक कप चहा पण तुमच्या पैशाचा घेतलेला नाही.

तुमचे पोट वेगळ्या कारणाने दुखत आहे, हे आम्हाला माहिती आहे. तुमचा वाटा मागण्यासाठी भागीदार पक्षाशी भांडा त्यासाठी भाजपला बोला ते तुम्हाला काय उत्तर दयायचे ते देतील पण संघ आणि स्वयंसेवक यांना मध्ये घेऊ नका . तुमच्या पक्षाच्या राजकुमाराला असे बेजबाबदार बोलल्यामुळे कोर्टाच्या फेऱ्या पडत आहेत. तुमच्यावर ही वेळ येऊ शकते. खंडणी तर जाऊ द्या, पण अनेक कार्यक्रमात अनेक लोकांनी कसा व्यवहार केला याची अनेक उदाहरणे आहेत.

नगरची सायं शाखा. अनेक सेवा वस्तीतील मुले शाखेत यायची. महापालिका निवडणूक. एका उमेदवाराने त्या स्वयंसेवकाना पत्रके दिली वाटायला त्या बरोबर पैसे पण दिले खाऊ साठी ! कार्यकर्ते, कार्यवाह कडे गेले त्यांनी पत्रक आणि पैसे परत देण्यास सांगितले. त्यांनी ते परत नेऊन दिले. आज २५ वर्षांत तो कधीच नगरसेवक झाला नाही, पण ही मुले मात्र आज त्यांच्या वैयक्तिक जीवनात प्रामाणिकपणे उभी आहेत. हा संस्कार नानासारख्यांना कधी कळणार ?  संघ शिक्षा वर्ग नगरला असताना एका राजकीय नेत्याने दिलेली मदत परत केलेली मला चांगले आठवते.

एकदा एका ग्रामीण भागात वर्ग होता. गावात पहिलाच कार्यक्रम नवीन गाव. सगळे आठवी ते १० वीतले स्वयंसेवक ! शाळा सुटल्यावर आठ दिवस रोजगार हमी योजनेत काम करून आलेल्या स्वयंसेवकांचे वर्गात आदरातिथ्य केले. संघाचा एक स्वयंसेवक एका गावात विस्तारक गेला. नाना च्या माहितीसाठी तो काँग्रेसच्या सरपंचाच्या घरी राहायचा. गावातील एक पूल भ्रष्टाचार झाल्याने खचला होता. त्याने गावकरी गोळा केले आणि श्रमदानातून तो पूल उभा केला.

एका गावात शिबिरासाठी जिल्हा कार्यवाह शिधा गोळा करताना साखर कारखान्याच्या अध्यक्ष कडे गेले. तो त्यांचा विद्यार्थी आणि नानासाठी तो काँग्रेसचा ! त्यांनी एका साखरेच्या पोत्याची आवश्यकता सांगितली . त्यांनी दोन पोते देऊ केले . कार्यकर्त्यांनी दुसरे पोते नम्रपणे नाकारले .गुजरातचे त्याकाळी गृहमंत्री असलेले व स्वयंसेवक श्री मकरंद देसाई यांनी गुरू पूजनाच्या उत्सवाला पूजनाच्या वेळेत न पोहचल्यामुळे देऊ केलेले समर्पण शाखा कार्यवाहने नम्रपणे नाकारले, अशी आठवण ज्येष्ठ प्रचारक माननीय मधुभाई यांच्याकडून मी ऐकली आहे .

ही सगळी उच्च दर्जाची उदात्त उदाहरणे समजण्यासाठी पण पात्रता लागते नानांची ती पात्रता वाढेल अशी प्रार्थना देवाला करू या ! थोडक्यात टाळूवरचे लोणी खाणार्यांनी आपले जीव धोक्यात घालून मृत नागरिकांना अंत्यसंस्कार करणाऱ्या सेवाभावी कार्यकर्त्यांना ,स्वयंसेवकाना खंडणीचे दाखले देणे म्हणजे खूप झाले. आणि शेवटी भाजप!Incoming राजकारण तुमचे चालू ठेवा, पण संघ स्वयंसेवकाना किती गृहीत धरायचे याच्या मर्यादा समजून घ्या. संघाला तर सर्वच हिंदू समाज आपला वाटतो, पण रामद्रोही ,राष्ट्रद्रोही यांना त्यांना समजणाऱ्या भाषेत समजावून सांगण्याची जबाबदारीपण स्वयंसेवक जाणतो, हे लक्षात ठेवलेले बरे.

Nana Patole must be reasonable over RSS criticism

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*