कोरोनाच्या महासंकटात राज्य कारभारच्या नव्या व्याख्येत “बदल्या”, “रद्द”, “आदेश”, “गाड्या”, “स्वाक्षऱ्या”, ” फेसबुक लाइव्ह” याच शब्दांना नवा अर्थ आलाय. “दौरे”, “मदत”, ” “जनता”, “दिलासा” या शब्दांचा अर्थ हरवून गेलाय.
विनायक ढेरे
महाराष्ट्राच्या तीन तिघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य कारभाराची नवी व्याख्या केल्याचे दिसतेय. मातोश्रीवर बसा, अधिकाऱ्यांना बोलवून आदेश द्या, मंत्र्यांना नव्या गाड्या घेण्याच्या आदेशावर स्वाक्षरी करा, बदल्या करा किंवा रद्द करा. अधून मधून कोणी राजकीय तक्रारी केल्या तर समन्वयाची बैठक घ्या…
दोन तीन दिवसांनंतर ती बैठक विसरून जा. पुन्हा मातोश्रीवरून कारभार हाकायला सुरवात करा…!! महाराष्ट्राच्या सरकारी कारभाराची अशी नवी विस्तृत व्याख्या मातोश्रीश्वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सिल्वर ओककर बारामतीकरांच्या futuristic politics साठी ही अतिशय उपयुक्त ठरणारी व्याख्या आहे.
या व्याखेनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर बसून राज्य कारभार हाकत आहेत. बाळासाहेब ठाकरे हयात असताना सरकारचा रिमोट कंट्रोल मातोश्रीवर होता. आता अख्खे सरकारच मातोश्रीवरून चालते आहे. बाळासाहेबांच्या रिमोट कंट्रोलचा तमाम महाराष्ट्रात दरारा होता, तर सरकारवर वचक होता. “दरारा”, “वचक” हे शब्द मातोश्रीच्या भिंतींचे कान वर्षानुवर्षे एेकत आल्या होत्या. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अख्खे सरकारच मातोश्रीवर आणल्यावर मात्र “दरारा” – “वचक” हे शब्द हवेत विरून गेले आणि “बदल्या”, “रद्द”, ” “करणारच”, “विचारणारच”, ” फेसबुक” हे नवे शब्द मातोश्रीच्या भिंतींच्या कानावर पडायला लागले. “दरारा”, ” वचक” या शब्दांचे अर्थ मातोश्रीला पुरते माहिती होते. नव्या शब्दांचे अर्थ मात्र तिला लागत नाही.
मातोश्रीवर बसून उद्धव ठाकरे यांच्या याच कारभार करण्यावर मात्र चोहीकडून टीका होऊ लागली आहे. आणि त्यात तथ्यही आहे. का नसावे? उद्धव ठाकरे जो कारभार मातोश्रीवरून हाकत आहेत, तो काय बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असा कारभार आहे का? इकडे कोरोनाने “करून दाखवून” महाराष्ट्र “अव्वल नंबरवर” नेऊन ठेवलाय आणि मुख्यमंत्री मातोश्रीवरून हालायला तयार नाहीत. नाही म्हणायला ते तिथून हालून ७ – ८ तास ड्राइव्ह करत पंढरपूरला पांडूरंगचरणी पोहोचले, ते “काबिले तारीफ” झाले.
पण तेवढ्याने भागते काय? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पांडूरंग पूजन एवढेच काम उरलेय काय? इकडे वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी वात्रटिकेतून मुख्यमंत्र्यांची मातोश्रीसकट “काढली” तरी मातोश्रीश्वर मुख्यमंत्री ढिम्मच. ते तिथून हालायलाच तयार नाहीत. बरं ते तिथून हालले तर जातात कुठे? दादरच्या महापौर बंगल्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारकात. तिथे ते बोलतात शरद पवारांशी, अजित पवारांशी. फारतर एखाद्या ज्येष्ठ काँग्रेस मंत्र्याशी. निर्णय काय घेतात? तर म्हणे महाआघाडीत समन्वय ठेवण्याचा. कोरोनाच्या महासंकटाची ही काळ, वेळ काय नुसत्या समन्वय ठेवण्यासाठी घ्यायच्या बैठकांची आहे काय? का काही ठोस निर्णय घेणारा कारभार करण्याची आहे? कोरोना वाढतोय, निसर्ग चक्रीवादळ येऊन कोकणाला उद्धवस्त करून गेले. तिथे पवार, देवेंद्र फडणवीस वेगवेगळे दौरे करून आले.
फडणवीस रोज कुठल्या ना कुठल्या कोविड हॉस्पिटलला भेटी देताहेत. तिथली व्यवस्था पाहात आहेत. तिथल्या उणिवा सरकारला पत्रे लिहून कळवत आहेत. मातोश्रीश्वर मुख्यमंत्री मात्र जागचे हालायलाच तयार नाहीत. मध्यंतरी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे active mode मध्ये होते. पण आता तेही कुठे दिसायला तयार नाहीत… सिल्वर ओकच्या डोळ्यावर आला काय त्यांचा active mode? कळायला काही मार्ग नाही.
पण एवढे असूनही मुख्यमंत्री मातोश्रीवरच बसलेले. ते म्हणे तिथूनच कारभार हाकत होते आणि आहेत. या सगळ्या कारभारात “वर्षा” आणि “मंत्रालय” नावाच्या दोन स्वतंत्र political entities कुठे दिसायलाच तयार नाही. एकेकाळी त्यांचाही स्वतंत्र दबदबा होता त्यांचा महाराष्ट्राच्या कारभारात. आता तिकडे विडिओ कॉन्फरन्ससाठी बाकीच्या सगळ्या पक्षांचे नेते जाताहेत. पण मुख्यमंत्री नाही जात तिथे. मुख्यमंत्री मातोश्रीवर बसून कारभार हाकतात आणि पवार सिल्वर ओक किंवा ठाकरे स्मारकातून त्यांना मार्गदर्शन करतात. मग बाकीच्यांचे काय? ४५ सदस्यांचे अख्खे मंत्रिमंडळ काय पूजेच्या का आणखी कुठल्या दुर्वा उपटायला ठेवलेय काय?
या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर कोरोनाचे महासंकट तर राहिले बाजूलाच आणि आता शिवसेना आणि राष्ट्रवादीतच ठिणग्या पडल्यात. तिकडे अजित पवारांनी पारनेरमध्ये जाऊन शिवसेना फोडली. इकडे राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांनी १० वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. एेन मजधारेत नावाडी बदलण्याचा हा प्रकार होता. पण राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्याने बदल्या केल्या म्हणून शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवरून निर्णय फिरवून त्या बदल्या रद्द करून दाखवल्या. त्यावरून राजकीय गदारोळ उठताच मुंबईचे पोलिस आयुक्त परमजीत सिंग यांना मातोश्रीवरच स्पष्टीकरण मागण्यासाठी बोलवून घेतले… वा रे तीन तिघाडी ठाकरे – पवार सरकारचा कारभार. बदल्या करणार गृहमंत्री, रद्द करणार मुख्यमंत्री. वर स्पष्टीकरण मागणार पोलिसांकडेच…!! याला म्हणतात राज्य कारभार करणे म्हणजे मातोश्रीवर बसून राहाणे…!!
गेल्या शतकात लोकमान्य टिळकांनी केसरीतून इंग्रजांना बजावले होते, “राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे”… महाराष्ट्राच्या या मातोश्रीश्वर मुख्यमंत्र्याला बजावले पाहिजे, राज्य करणे म्हणजे नुसते मातोश्रीवर बसून राहाणे नव्हे… नुसत्या बदल्या रद्द करणे, नुसते पक्ष फोडणे नव्हे तर… वर्षावर राहाणे, मंत्रालयात जाणे, अख्ख्या मंत्रिमंडळाला कामाला जुंपून स्वत: पुढे राहुन, मैदानात उतरून कारभार करणे होय…!! जरा बघा की दिल्लीतल्या ७ लोक कल्याण मार्गाकडे…!! रामदास फुटाणेंच्या लेखणीतून नेमके कोण आणि काय बोललंय ते तरी बघा, मातोश्रीश्वर मुख्यमंत्री महोदय…!!