माता भाग कौर(माई भागो): मुघलांचा काळ होऊन बरसणारी तेजस्वी उल्का!

  • गुरु गोविंदांच्या शिष्या बनून माई भागोंनी मुघलांची मुघलांशी तडाखेबंद टक्कर घेतली. त्यांच्या प्रचंड सैन्याला पराभूत केले आणि शीख इतिहासातले त्या सोनेरी पान बनवून राहिल्या.

अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध जी जी लढते…ती दुर्गा! खलांच्या संहारणासाठी संतांनी देखील हातात शस्त्र घेऊन लढल्याची उदाहरणं आपल्या इतिहासात आहेत!आपल्या समोर बलिदानांची मालिका उभी करणारा शिखांचा इतिहास तर याला मुळीच अपवाद नाही. औरंगजेबाच्या भितीने तलवार टाकून पळ काढणार्‍या निराश, भयभीत शिखांमधे आपल्या शब्दांनी पुन्हा एकदा लढण्याची स्फूर्ती जागी करणारी आणि नेतृत्त्वं करत त्यांच्या सहाय्याने मुघलांवर तुटून पडणारी संतश्रेष्ठ वीरांगना म्हणजे माता भाग कौर (माई भागो)!

माई भागो गुरु गोविंद सिंहांच्या शिष्या होऊन त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आयुष्यभर चालल्या आणि वेळ आली की आततायी शत्रूंसमोर हातात तलवार उचलून स्वाभिमानाने लढल्या!इतरांना सुद्धा लढायला भाग पाडलं. १७०५ साली मुघल आणि शिखांमद्धे मुक्तसरचं जे ऐतिहासिक युद्धं झालं त्यात काही मोजक्या शिख सैंनिकांसह १०,००० मुघल सैन्यावर हल्ला करणार्‍या या वाघिणीचं धैर्य अतुलनीय आहे! डोक्यावर बांधलेली केसरिया पगडी, खालसा गणवेश परिधान करून कमरेला किरपाण धारण केलेल्या माई भागो म्हणजे मूर्तीमंत शौर्य!शिखांमधली रणांगणावर जाऊन प्रत्यक्ष लढणारी ही पहिलीच वीरांगना!

पंजाबमधे अजूनही हा पराक्रम अजोड मानला जातो! त्यांना मानवंदना दिली जाते!  पंजाब शासनाने फक्त मुलींसाठी मोहाली इथे Mai Bhago Arm Forces Preparatory Institute (AFPI )नावाचं सैन्यपूर्वप्रशिक्षण केंद्र सुरू केलं. त्याचं उद्घाटन २५ जुलै २०१५ रोजी तत्कालीन रक्षामंत्री श्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते झालं. तिथे समोरच माई भागोंचा भव्य अश्वारूढ पुतळा बसवलेला आहे. तरुणींच्या मनांत आणि मनगटांत शक्तिचा स्त्रोत होऊन माई भागो अजूनही प्रेरणा देतात!

माई भागोंचा जन्म त्यांच्या वंश परंपरागत गावात झाबल कलान (सध्या पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात) इथे १६६६ मधे झाला. भाई पेरो शाह यांची नात आणि मालो शाह यांची ही मुलगी अतिशय धार्मिक वातावरणांत लहानाची मोठी झाली. बलिदानांच्या कथांनी तिचं मन विदीर्ण व्हायचं. आपणही अन्यायाविरुद्ध ठाम उभं राहायचं हा निश्चय तिने तेव्हाच केला! दिलबाग सिंह आणि भाग सिंह अशा आपल्या दोन्ही भावांच्या बरोबरीने तिने शस्त्रविद्या शिकून घेतली. उपजत सुदृढ आणि सशक्त अशा शरीरयष्टीची, निर्भय डोळ्यांची भागो अध्यात्म आणि खड्गविद्या,घोडेस्वारी यात बरोबरीने प्रगती करू लागली. पुढे तिचं लग्नं पट्टी (अमृतसरपासून ४७ किमी) इथल्या निधान सिंह यांच्याशी झालं.

१७०५ : गुरु गोविंद सिंह (शिखांचे दहावे गुरु, गुरु तेग बहादुर यांचे सुपुत्र) यांना पकडण्यासाठी औरंगजेबाने वजीर खानाला आनंदपूर साहिब भागाकडे पाचारण केलं. लाहोर आणि कश्मीर इथल्या मुघल सेनेसह प्रचंड असा सैन्याचा ताफा आणि शस्त्रं वजीर खान घेऊन निघाला होता. आनंदपूर किल्ल्याजवळ पोचताच सगळ्या बाजूंनी घेराव घालून मुघल सैन्याने आधी तिथला अन्न पाण्याचा पुरवठा तोडला. आणि गुरु गोविंदाना लगेच आनंदपूर सोडून बाहेर येण्यासाठी जबरदस्ती केली.

औरंगजेबाने अनेक फर्मान काढले. त्याच्या धमक्यांना घाबरून पुढे गुरूंबरोबर युद्धांत सामील न होता इथूनच परत फिरण्याचा निर्णय काही शिखांनी घेतला. तसा ४० जणांचा एक गट तयार झाला. महान सिंह ब्रार याच्या नेतृत्त्वाखाली त्यांनी गुरु गोविंद सिंहाना सांगितलं की आता आम्ही तुमच्याबरोबर लढू शकत नाही. गुरूंनी त्यांना एका कागदावर हे लिहून खाली सही करून आणून देण्यासाठी सांगितलं. त्यांनी तसं केलं आणि जिवाच्या भीतीने ते ४० जण तिथून निघून गेले!

गुरु गोविंद सिंहांनी पुढची योजना आखून साथीदारांना घेऊन तिथून गुप्त मार्गाने कूच केलं. त्यांचे दोन लहान मुलं फतेह सिंह आणि जोरावर सिंह आजी माता गुजरी देवी(गुरु गोविंद सिहांच्या आई) यांच्या बरोबर गेले. मोठे दोन अजित सिंह आणि झुझार सिंह वडिलांबरोबर निघाले.

मुघल सैन्याला खबर लागताच ते गुरूंच्या मागेच निघाले. पुढे गुरु आणि त्यांचं सैन्य आणि मागे पाठलाग करणारे मुघल असे पंजाबच्या माळवा प्रांताच्या जंगलांमधून अहोरात्र घोडदौड करू लागले.
इकडे ते चाळीस जण घरी परत आले. गुरु गोविंद सिंहांच्या बाजूने लढण्यासाठी गेलेल्या या शिखांची ही दुर्बलता पाहून माई भागोंना अत्यंतिक वेदना झाल्या. ऐन संकटांत गुरूंना अशा पद्धतीने हे लोक सोडून आले होते हे त्यांना सहन होण्यापलिकडचं होतं! त्यांनी आपल्या पतीला आणि गावात सगळ्यांना ही घटना सांगितली. त्यांना जमा करून त्या चाळीस जणांची निर्भत्सना केली. त्यांना उद्देशून ती म्हणाली, “एक दिवस मरायचं तर आहेच मग वीरांसारखं ताठ मानेने का मरू नये? उठा आणि तलवारी घ्या. गुरूंच्या बरोबर खंबीरपणे उभे रहा.त्यांच्या परिवाराने दिलेल्या सर्वश्रेष्ठ बलिदानाकडे बघा…!” एका स्त्रीचे हे धारदार शब्द त्यांच्या काळजाचा ठाव घेत होते! शेवटी त्यांच्या चुकीची त्यांना जाणीव झाली. माई भागोंनी त्यांना गुरूंकडे परत जाण्यासाठी प्रवृत्त केलं. त्या स्वतः घोड्यावर स्वार झाल्या. चाळीस जणांसह इतर काही शिखांना घेऊन त्या गुरु गोविंदांच्या दिशेने जाण्यासाठी निघाल्या.

मुक्तसर मधली घनघोर लढाई : २९ डिसेंबर १७०५:

गुरु गोविंद सिंह खिंद्राणा जवळ पोचले. त्यांनी लढण्यासाठी तिथला परिसर निवडला कारण आजूबाजूला भरपूर झाडं झुडूपं होती. मुख्य म्हणजे पाण्याचा तलाव होता, ज्यावर त्यांनी ताबा मिळवला. मुघलांना दुसरा पाण्याचा स्त्रोत अनेक मैल दूर होता. माई भागो आणि सैन्य सुद्धा तिथेच पोचलं….तलवारींना तलवारी भिडल्या… “बोले सो निहाल…सत श्री अकाल”..युद्धाचा नारा आसमंतात घुमला! माईंचं सैन्य त्यांच्या नेतृत्त्वाखाली गुरूंचा पाठलाग करणार्‍या अफाट मुघलसेनेवर तुटून पडलं. घनघोर युद्धं झालं. माई भागोंचा एकेक सैनिक कितीतरी मुघल सैनिकांना लोळवत होता. गुरु गोविंद आणि त्यांचं सैन्य उंच टेकडीवरून मुघलांवर बाणांचा वर्षाव करत होते. हजारो मुघल सैनिकांचा खच पडला. तुलनेने कैक पटीने अधिक असूनही मुघलांना पराभवाचा सामना करावा लागला. मोठाच इतिहास घडला!

सगळं शांत झाल्यावर गुरु गोविंद सिंह मैदानात आले. माई भागोंचे पती, मुलगा आणि अनेक सैंनिकांसह ते चाळीस जण प्राणपणाने लढून धारातिर्थी पडले होते! गुरूंनी जख्मी झालेला त्या चाळीस जणांचा म्होरक्या महान सिंह ब्रार याला मांडीवर घेतलं. त्याच्या मुखात पाणी घालून शेवटची इच्छा विचारली. त्याने मुक्ती मिळण्याची इच्छा प्रकट केली. गुरूंनी त्या चाळीस जणांना मुक्तीचा आशीर्वाद दिला. हे ऐकून महान सिंहने प्राण सोडले. ते इतिहासात “चाली मुक्ते” म्हणून प्रसिद्धं झाले आणि खिंद्राणा हे ठिकाण तेव्हापासून मुक्तसर म्हणून प्रसिद्धं झालं(जिथे हे पावन जीव मुक्त झाले) . माई भागोही अतिशय गंभीर रित्या जखमी झाल्या होत्या. पण तरीही त्या त्यांच्या घरी परतल्या नाहीत. गुरु गोविंद सिंहांच्या त्या शिष्या झाल्या. गुरूंनी दाखवून दिलेल्या धर्माच्या वाटेवर आमरण चालल्या!

गुरु गोविंद सिंह यांचं १७०८ मधे नांदेड इथे निधन झालं. बलिदान च होतं ते! त्यानंर माई भागो कर्नाटकात बिदर जवळ जनवाडा इथे साधना करत आणि धर्माची शिकवण देत दीर्घायुष्य जगल्या. ते माई भागोंचं तपस्थान गुरुद्वारामुळे प्रसिद्ध आहे. नांदेडच्या गुरुद्वारा मधे सुद्धा त्यांच्या स्मरणार्थ मोठा हॉल आहे.
माई भागो त्यांच्या अद्वितीय शौर्यामुळे शिखांच्या आणि संपूर्ण भारताच्या इतिहासात एक अढळ तारा बनून तेजाळत राहिल्या! त्यांची पावन स्मृती आजही सगळ्यांना विशेषतः स्त्रियांना सगळ्या अडचणींवर मात करून पुढे सरसावण्यासाठी स्फुरण देते! अशा या धैर्यशाली, मातृभक्त वीरांगना माई भागोंना त्रिवार वंदन!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*