कित्तूरची राणी चेन्नम्मा : ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य-यज्ञांतली पहिली ऊर्ध्वगामी ज्वाळा….!

कित्तूरची राणी चन्नम्माने प्रथम पेटवलेली स्वातंत्र्य ज्वाळा भडकून उठली. त्यात इंग्रजी राज्याचे हवन झाले. असंख्य क्रांतिकारकांनी राणी चेन्नम्माच्या प्रेरणेतून स्वातंत्र्यासाठी बलिदान केले.


कर्नाटकमधे चेन्नम्मा नावाच्या दोन राण्या होऊन गेल्या- एक केलदीची चेन्नम्मा, जी १६९६ पर्यंत मुघलांशी लढली आणि तिच्यानंतरची दुसरी कित्तूरची चेन्नम्मा(१७७८-१८२९)जिने आजच्याच दिवशी १८२४ मधे इंग्रजांवर पहिला विजय मिळवला!

भारताच्या संसद भवनाच्या प्रांगणात ११ सप्टेंबर २००७ रोजी एका भव्य अश्वारूढ पुतळ्याचं राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यांत आलं! ती म्हणजे इंग्रजांना ललकारणारी पहिली स्वातंत्र्य सेनानी कित्तूरची शूर वीरांगना राणी चेन्नम्मा! तिचं इतिहासातलं स्थान अमर आहे! १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याच्या किती तरी वर्षं आधी इंग्रजांचा विस्तारवाद ओळखून त्यांच्या प्रत्येक जाचक धोरणाला कडा विरोध करत राणी चेन्नम्माची तलवार तळपत राहिली. प्रजेची आई होऊन राज्यांचं प्रशासन करणारी राणी चेन्नम्मा स्फूर्ती होऊन सैनिकांच्या सळसळत्या धमण्यांमधला लढणारा अंगार झाली!१८२४च्या युद्धांत बलाढ्य इंग्रजांना पराभूत करत तिने धैर्याचा कळस गाठला आणि मोठाच इतिहास रचला! आणि त्यानंतर तिच्या बलिदानाने इंग्रजांविरुद्धचा स्वातंत्र्य लढा संपूर्ण भारतात खर्‍या अर्थाने गतिमान झाला!

राणी चेन्नम्माचा जन्म २३ ऑक्टोबर १७७८ रोजी कर्नाटक मधल्या काकती या लहान गावात झाला(सध्याच्या बेळगाव जिल्ह्यांमधे). वडील श्री धुलप्पा गौडा यांच्या संस्कारांत, लिंगायत समाजाच्या अतिशय धार्मिक आशा कुटुंबात चेन्नम्मा लहानाची मोठी झाली. त्याकाळच्या पद्धतीनुसार तिचं शिक्षण सुरू झालं. अभ्यासाबरोबरच घोडेस्वारी, तलवारबाजी, धनुर्विद्या यांतल्या प्राविण्यामुळे चेन्नम्माची कीर्ती दूरवर पसरली! तिच्या शौर्याची चुणूक कुटुंबाला वेळीवेळी दिसत होती.

राणीच्या कित्तूर मधल्या कर्तृत्त्वाचा प्रारंभ:

या तेजस्वी युवतीचं लग्नं कित्तूरचा महापराक्रमी राजा, देसाई कुटुंबातला मल्लासर्जा याच्याशी झालं. १५८५ पासून कित्तूर राज्य पिढ्यंपिढ्या देसाईंकडे होतं. १६५० ते १६८१ पर्यंत राज्यं केलेल्या अलाप्पा गौडा देसाई यांनी कित्तूरमधे बळकट असा किल्ला बांधला. मल्लासर्जा हा तिथला अकरावा राजा होता.

त्यावेळी कित्तूर दुसरा बाजीराव पेशवा याच्या अंमलाखाली होतं. कित्तूरचं हे राज्यं मल्लासर्जाच्या नेतृत्त्वाखाली सर्वार्थाने वैभवाच्या शिखरावर पोचलं! राणी चेन्नम्मा ही राजाची पहिली राणी नव्हती. पण अतिशय बुद्धिमती अशी ही राणी तिच्या शौर्याने आणि प्रशासकीय कौशल्याने प्रजेची आईच झाली!राजाचा विश्वास आणि प्रजेचा सर्वतोपरी आदर तिने कमावला. राजा मल्लासर्जाचं तिला सतत प्रोत्साहन मिळत होतं! राणीला एक तेजस्वी मुलगाही झाला- बसवराज!एक प्रेमळ आई असलेली राणी स्वतः त्याला तलवारबाजी शिकवायची, त्याच्याशी घोड्यावर शर्यत लावायची!

इंग्रजांचा विस्तारवाद:

इंग्रजांचे दोन खंदे विरोधक मराठे आणि मैसूर मधले हैदर आणि टिपू यांच्या अस्तामुळे १८२० च्या सुमारास ईस्ट इंडिया कंपनीला खूपच महत्त्वं प्राप्त झालं. अगदी सुरुवातीचं पाऊल म्हणजे व्यापारानिमित्त शिरकाव, व्यापारासाठी वेगवेगळ्या केंद्रांची निर्मिती, मग पुढे भारतातल्या राज्यांच्या प्रशासनामधे हस्तक्षेप करणं हे दोन्ही टप्पे त्यांनी पार केले होते. आता सरळ सरळ भारताच्या जास्तीत जास्त राज्यांना खालसा करून ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार(annexation policy) करण्याचा इंग्रजांचा मनोदय स्पष्ट जाणवू लागला होता!

“doctrine of lapse” हे धोरण लॉर्ड डल हौसीने औपचारिकपणे १८४७ मधे जाहीर केलं असलं तरी त्याची अंमलबजावणी सत्तापिपासू लॉर्ड एल्फिस्टनने किती तरी वर्षं आधीच सुरू केली होती. जे जे राजे आजारी वा वयाने वृद्धं होते, त्यांची राज्यं इंग्रजांनी जाहीरपणे “incompetent” ठरवली आणि त्यात हस्तक्षेप सुरू केला. तर जे राजे पुरुष वारस मागे न ठेवता निधन पावले त्यांचं दत्तक विधान नामंजूर करून त्यांचंही राज्यं बळकावण्याची योजना आखली. खरं तर मुलींनी राज्याचा उत्तराधिकारी होणं, रणांगणात लढणं ही गोष्ट त्याकाळी भारतात नवीन नव्हती किंवा राजे गेल्यानंतर त्यांच्या राण्या राज्याचं उत्तम प्रशासन करू शकत होत्या! पण या दोन्ही गोष्टी इंग्रजांच्या पचनी पडणार्‍या नव्हत्या किंवा त्यांनी हेतू पुरस्सर त्याकडे दुर्लक्षं केलं! कारण तसं केलं नसतं तर राज्यं खालसा करण्यासाठी निमित्त कसं मिळालं असतं!

राणी चेन्नम्मासमोर संकटांची मालिका:

अतिशय वैभवशाली अशा कित्तूरचा राजा मल्लासर्जा १८१६ साली निधन पावला. त्यानंतर राणीने तिचा हुशार मुलगा बसवराज याला गादीवर बसवलं. पण दुर्दैवाने काही वर्षांतच १८२४ साली बसवराज सुद्धा हे जग सोडून गेला!एकामागून एक असे दोन आघात! राणी शोकाकुल झाली! पण बरोबरीने ती प्रजेचीही आई असल्याची जाणीव तिला झाली! पुत्रशोकाच्या दु:खावर मात करत शिवलिंगप्पाला दत्तक घेऊन तिने स्वतः नव्याने राज्यकारभाराची घडी बसवली!

इंग्रजांचा कित्तूरमधे शिरकाव :

राणीच्या दत्तक वारसाचा सुगावा इंग्रजांना लागला, त्यांनी तिथे लगेच आपल्या प्रशासकाची नेमणूक करून कित्तूरमधे हस्तक्षेप सुरू केला. राणीने हे अजिबात खपवून घेतलं नाही. तिने बॉम्बेचा गवर्नर लॉर्ड एल्फिस्टन याला खरमरीत पत्रं पाठवलं की दत्तक विधान करून राज्यं खालसा करण्याचं धोरण ती धुडकावून लावत आहे आणि तिचा दत्तकपुत्र या राज्याचा राजा आहे हे इंग्रजांना मान्य करावंच लागेल.” तिचं हे पत्रं वाचून एल्फिस्टन चिडला. लगेच धारवाडच्या कलेक्टरला कित्तूरचं राज्यं हाती घेण्याचे आदेश देण्यांत आले.

पहिलं तुंबळ युद्धं २३ ऑक्टोबर १८२४ :

धरवाडच्या कलेक्टरला काय राणी इंग्रजांच्या कोणत्याच प्रतिनिधीला जुमानत नाही हे पाहून इंग्रजांनी २०,००० सैन्यासह आणि २०० हून अधिक तोफांसह(artillery guns) कित्तूरच्या किल्ल्याला वेढा घातला. राणीला किल्ल्याचे दरवाजे उघडून आत्मसमर्पण करण्यासाठी धमकीवजा संदेश पाठवण्यांत आला. या हल्ल्याचा प्रमुख उद्देश होता राणीचा खजिना आणि सगळी संपत्ती लुटून तिला आर्थिक दृष्टीने पंगू बनवणं. मग राज्यं हस्तगत करणं!

लवकरच किल्ल्याचे दरवाजे उघडून राणी आत्मसमर्पण करणार या अपेक्षेने इंग्रज बाहेर वाट पहात होते. दरवाजे उघडले पण आत्मसमर्पणसाठी नाही तर लढण्यासाठी! रणभेरी निनादल्या… आसमंत भरून गेला! राणी घोड्यावर स्वार झाली. राणीच्या हातात तलवार…डोळ्यांत निखारे आणि मनात होता शत्रुचं निर्दालन करण्याचा वज्र निश्चय! राणी सैन्याला उद्देशून म्हणाली, “ज्यासाठी माता आपल्या पुत्रांना जन्म देतात तो क्षण येऊन ठेपला आहे- मातृभूमीचं रक्षण! किल्ल्याचे दरवाजे उघडतांच इंग्रजांवर तुटून पडा.त्यांना दाखवून द्या की ते बाहेरचे आक्रमक आहेत आणि हा देश सोडून त्यांना जावंच लागेल.” त्याप्रमाणे दरवाजे उघल्यावर भयंकर युद्धं सुरू झालं. राणीचा एकेक सैनिक काळ होऊन इग्रजांवर बरसला. राणीचा सेनापती अमातूर बालप्पा तूफान लढला. त्याने कलेक्टर सेंट जॉन थायकर याला एका घावात संपवलं. राणीने तर साक्षात महाकालीचं रूप घेतलं होतं! गतप्राण शत्रूंचा खच तिच्या भोवती पडत होता!त्यामुळे राणीचं सैन्य कैक पटीने कमी असूनही तिने युद्धं जिंकलं! इंग्रजांचं अतोनात नुकसान झालं.एवढंच काय पण वरकडी म्हणून सर वॉल्टर एलियट आणि मिस्टर स्टिवन्सन या दोन अधिकार्‍यांना राणीने अटक करून ओलिस ठेवून घेतलं! या विजयाचं स्मरण म्हणून कित्तूरमधे अजूनही २२ ते २४ ऑक्टोबर विजयोत्सव साजरा करण्यांत येतो!

पराभूत इंग्रज वाटाघाटीची भाषा बोलू लागले. कुशाग्र राणीने प्रस्ताव ठेवला – ओलिस ठेवलेल्या दोघांना सोडण्यांत येईल पण त्या बदल्यात तिच्या दत्तक पुत्राला राजा म्हणून मान्यता द्यायची आणि पुन्हा कित्तूरकडे डोळे वर करून बघायचं नाही! कमिशनर ने तिचा हा प्रस्ताव बिनशर्त मान्य केला आणि त्या दोघांना सोडण्यांत आलं.

पण “प्राण जाए पर वचन न जाए” हे पाळणार्‍या राणीसमोर कमालीचे स्वार्थी आणि विश्वासघातकी इंग्रज उभे होते…त्यांचे शब्द कितीसे खरे असणार! त्यात एका स्त्रीकडून ते पराभूत झाले होते! एका छोट्या गावात जन्माला आलेली ही राणी मैसूर ते सोलापूर या प्रदेशातल्या अनेक संस्थांनांचं कुशलतेने संघटन करून आपल्यासारख्या बलाढ्य सत्तेला आव्हान करते म्हणजे काय! इंग्रज या पराभवाने चवताळले.

दुसरं युद्धं:

पुढे इंग्रजांनी राणीला हरवण्यासाठी वाट्टेल ती नीच पातळी गाठली. जिवाचा धाक दाखवून राणीच्या माणसांना फितवलं. Gun powder ऐवजी त्यात शेण, माती भरण्याची व्यवस्था केली. अनेक व्यवस्था मोडकळीला आणल्या. कैक गोष्टी भ्रष्ट केल्या. राणीची इतर मदत खंडित करून परत बलाढ्य सैन्यासह तिच्यावर आक्रमण केलं! “कित्तूर आमचं आहे आणि आमचंच रहाणार…आक्रमकांनो बाहेर व्हा” असं गर्जत राणी परत भिडली. तिने मोठी टक्कर दिली. यात सोलापूरचा सब कलेक्टर मारला गेला. पण शेवटी राणीला वेगळं पाडत तिला एकटं गाठून कैद करण्यांत इंग्रजांना यश आलं.

तिची स्फूर्ती सैन्यांत उतरली. तिचा अत्यंत निष्ठावान मंत्री संगोली रायण्णा राणीला कैद झाल्यावर अधिक जोमाने, धैर्याने लढला! त्याने अधुनिक भाषेत गोरीला वॉर फेअरच्या युद्धनीतीनुसार पुढची लढाई केली. अजिंक्य अशा या रायण्णाला मैदानावर हरवणं अशक्य होतं. म्हणून त्याला इंग्रजांनी धोक्याने कट कारस्थान करून पकडलं…आणि या शूर सिंहाला मरेपर्यंत फासावर लटकवलं! राणीला सोडवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण इंग्रजांनी तसं होऊ दिलं नाही. राणीचा शूर दत्तक पुत्र शिवलिंगप्पा यालाही इंग्रजांनी कैद केलं.
वाघीण पिंजर्‍यात टाकली तरी ती वाघीण होती! राणी चेन्नम्मा ने पाच वर्षं बेल होंगल इथे कैदेत राहून २१ फेब्रुवारी १८२९ रोजी प्राण सोडले पण इंग्रजांची कोणतीही अट तिने मान्य केली नाही. ती त्यांना शरण गेली नाही. बेल होंगल इथे राणीचं मोठं समाधीस्थान आहे!

आजही ती अनेक गाणी, पोवडे, कथा यांत भरून राहिली आहे. तिच्या सन्मानार्थ बेंगलोर ते मिरज पर्यंतच्या ट्रेनचं नावही चेन्नम्मा एक्सप्रेस ठेवण्यांत आलं. धारवाड मधल्या कर्नाटक विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रम केंद्र २०१० साली राणी चेन्नम्मा विद्यापीठांत रूपांतरित केलं.

महाराष्ट्रात घरंघरांत ज्याप्रमाणे “मै मेरी झांसी नाही दूंगी” हे आठवलं जातं… झाशीच्या राणीला मानवंदना दिली जाते! त्याप्रमाणेच कर्नाटकात राणी चेन्नम्माचे असंख्य पुतळे आहेत आणि राणी चेन्नम्मा सारखा वेश धरण करून मुलींच्या कंठातून अजूनही तिची वाक्यं गौरवाने उच्चारली जातात! राणी चेन्नम्माने पेटवलेली ही ठिणगी भारतभर वणव्यात रूपांतरित झाली. राणी पुढच्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी मोठी प्रेरणा झाली!अशा रणरागिणीला नवरात्रीच्या निमित्ताने सन्मानपूर्वक त्रिवार मानवंदना!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*