चंद्राबाबूंना जनगमोहन रेड्डी हे ख्रिश्चन मुख्यमंत्री असल्याचा साक्षात्कार कसा काय झाला?; राजकीय जमीन घसरल्याचा परिणाम की आणखी काही…??

आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे ख्रिश्चन सीएम आहेत. ते धर्मांध चर्चला साथ देण्यासाठी सत्तेचा गैरवापर करत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे… बऱ्याच दिवसांनी चंद्राबाबू यांच्या सारख्या एकेकाळी राष्ट्रीय पातळीवर चमकणाऱ्या नेत्याची राजकीय टिपण्णी बाहेर आली आहे… चंद्राबाबू आज अचानक कसे काय बोलले??, इतके दिवस ते होते कोठे?? करत काय होते?? त्यांच्या आजच्या राजकीय विधानाचा नेमका अर्थ काय?, याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न… How did Chandrababu come to know that Jangmohan Reddy is a Christian Chief Minister ?


विनायक ढेरे

जगनमोहन रेड्डी हे ख्रिश्चन सीएम आहेत, हे विधान करून आपण अजूनही राजकीयदृष्ट्या अस्तित्वात आहोत, हे चंद्राबाबू नायडूंनी दाखवून दिले आहे. किंबहुना बरेच महिने गामावलेले अस्तित्व दाखविण्यासाठीच चंद्राबाबूंनी ही आरोळी ठोकली असावी असे मानण्यास वाव आहे… खरेच आहे. देशात आणि आंध्रात एवढ्या घडामोडी घडताहेत… पण चंद्राबाबूंचे अस्तित्वच यात कोठे जाणवत नव्हते. कोरोना, शेतकरी आंदोलनापासून ममता बॅनर्जींपर्यंत एवढे मुद्दे गेले सहा – आठ महिने तरी देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत… पण यात खरेच चंद्राबाबू कुठेच दिसत नव्हते.

 • अगदी मध्यंतरी हैदराबाद महापालिकेच्या निवडणूका झाल्या, तांत्रिकदृष्ट्या त्या तेलंगणातील निवडणूका होत्या. तेथे चंद्रशेखर राव – ओवैसींची प्रतिष्ठा पणाला लागली होती… पण एकेकाळी म्हणजे फार जुने नव्हे, अखंड आंध्र प्रदेश असताना तेथे चंद्राबाबू नावाचा राजकीय घटक फार महत्त्वाचा मानला जात होता… किंबहुना निर्णायक ठरत होता… पण तो बरेच दिवस हरवला होता किंवा सुप्तावस्थेत होता म्हणा…


 • पण चंद्राबाबूंच्या या अवस्थेस ते स्वतःच जिम्मेदार आहेत. त्यांनी अटलजी – अडवानींच्या भाजपशी जुळवून घेतले तसे मोदी – शहांच्या भाजपशी जुळवून घेतले नाही. ते ओरिसाच्या नवीनबाबूंसारखे तटस्थही राहिले नाहीत… त्यांनी मोदी – शहांशी पंगा घेऊन एनडीएशी संबंध तोडून टाकले… आंध्र प्रदेशात “अत्यंत स्वतंत्रपणे” निवडणूक लढवून जगनमोहन रेड्डींकडून पराभूत झाले… मोदी – शहांशी पंगा घेऊन ते राष्ट्रीय राजकारणातून अस्तंगत झालेच होते. पण जगनमोहन रेड्डींकडून पराभूत झाल्यानंतर आंध्रच्या राजकारणातूनही प्रभावहीन आणि संदर्भहीन झाले…
 • राज्यात मंदिरांवरील हल्ल्यांनंतर मात्र त्यांना “जाग” आली आहे. एव्हाना जगनमोहन रेड्डींशी आपण एकट्याने पंगा घेऊ शकत नाही, याची राजकीय जाणीव त्यांना झालेली दिसते आहे. आपल्या तेलुगु देशमच्या पायाखालची राजकीय जमीन पुरती घसरल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे.
 • त्यातही पुढची लढाई एकट्या जगनमोहन रेड्डींशी नाही… मोदी – शहा – नड्डांच्या भाजपशी होईल, याचा राजकीय अंदाज त्यांना आला आहे. आणि या दोन राजकीय हत्तींच्या लढाईत आपल्या तेलुगु देशमच्या सायकलचा पुरता चेंदामेंदा होऊ शकतो, याची भीती त्यांना सतावू लागलेली दिसते आहे.
 • त्यातूनच त्यांनी जगनमोहन यांच्या बाबतीत ख्रिश्चन सीएम ही टीकेची भाषा वापरलेली दिसते आहे… वास्तविक ही भाजपच्या तोंडची भाषा आहे… मंदिर यात्रा प्रदेश भाजपने जाहीर करून हिंदुत्वाचे राजकीय वातावरण तापवायला सुरवात केली आहे. अशा स्थितीत दोन लंबकाच्या मध्ये आपण कुठल्या कुठे हरवून जाण्यापेक्षा जुन्या मित्र पक्षाच्या म्हणजे भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न म्हणूनही चंद्राबाबू यांच्या टीकेकडे पाहता येऊ शकेल…
 • अर्थात जे चंद्राबाबूंच्या मनात आहे, ते मोदी – शहांच्या भाजपच्या मनात असेलच असे नाही. किंबहुना हे दोन्ही नेते म्हणूनच सर्वत्र स्बबळ वाढविण्याच्या सिरीयसली मागे लागले आहेत. त्यामुळे ख्रिश्चन सीएम या टीकेची लाइन जरी चंद्राबाबूंनी भाजपवर मारली असली तरी भाजप त्या लायनीला फळेलच असे काही सांगता येत नाही… किंबहुना फळणारच नाही असे अनुभवाअंती म्हणावे लागेल. कारण हा अटलजी – अडवानींचा भाजप नाही… मोदी – शहांचा भाजप आहे… आणि त्याला नड्डांची जोड आहे.

How did Chandrababu come to know that Jangmohan Reddy is a Christian Chief Minister ?

 • म्हणूनच आंध्रात जगनमोहन रेड्डी आणि भाजप या दोन ध्रुवांमध्ये जी राजकीय जमीन उरेल, त्यावर कब्जा करण्याचा चंद्राबाबूंचा प्रयत्न असल्याचे मानावे लागेल… ख्रिश्चन सीएम या टीकेचा खरा राजकीय अर्थ हा आहे.

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*