‘हाथरस’वर काँग्रेसी गिधाडांच्या घिरट्या

हाथरस प्रकरणातील सत्य बाहेर येण्यास आणि संबंधितांना न्याय मिळावा, अशी काँग्रेसची इच्छाच नाही. त्यांना या प्रकरणाचा वापर केवळ राहुल गांधी आणि प्रियांका गांधी – वाड्रा यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी करावयाचा आहे.


ऋग्वेद

देशात आणि प्रामुख्याने भाजपशासित राज्यांमध्ये एखादी घटना घडली की तेथे अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण करायला तात्काळ जायचे, ही कार्यपद्धती काँग्रेस पक्ष अगदी इमानेइतबारे पाळत आली आहे. यापूर्वी त्याचे उदाहरण २००२ सालापासून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात तब्बल १२ वर्षे घाणेरडे राजकारण काँग्रेसने केले होते.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तर मोदींचा उल्लेख ‘मौत का सौदागर’ असाही केला होता. त्यानंतर ‘भगवा दहशतवाद’ ही नवी संकल्पना जन्माला घालून देशातील हिंदू समाजाला बदनाम करण्याचे काँग्रेसचे षडयंत्रही अनेक वर्षे सुरूच होते. त्यानंतर आता त्याचा तिसरा अध्याय काँग्रेसने हाथरसमध्ये सुरू केला आहे.

हाथरसमध्ये जे काही घडले ते अतिशय दुर्दैवी होते, यात कोणतीही शंका नाही. या घटनेचे सत्य नेमके काय, ते समोर आलेच पाहिजे. जेणेकरून संबंधितांना न्याय मिळू शकेल. समाधानाची बाब म्हणजे प्रकरणातील सत्य लवकरात लवकर बाहेर यावे, यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ कार्यवाही केली आहे. सर्वप्रथम त्यांनी प्रकरणाची फास्ट ट्रॅक चौकशी करण्याचे आदेश दिले, त्यानंतर प्रकरणाचा सखोल तपास व्हावा यासाठी एसआयटीची स्थापना केली.

त्या उपरही सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी व्हावी, असे प्रतित्रापत्रही सर्वोच्च न्यायालयात दाखल केले. एकीकडे अनेक मुख्यमंत्री सीबीआय तपासाला विरोध करीत असताना योगी आदित्यनाथ यांनी स्वतहून सीबीआय तपासाची मागणी केली, हे विशेष. एकुणच प्रकरणातील सत्य बाहेर यावे, यासाठी आवश्यक ते सर्व काही योगी आदित्यनाथ यांनी केले, त्यात कोणताही कसूर त्यांनी सोडली नाही.

मात्र, योगी आदित्यनाथ यांच्या अशा भूमिकेमुळे मृतदेहाचे लचके तोडून खाण्यात रस असलेल्या गिधाडांप्रमाणे मनोवृत्ती असलेल्या काँग्रेसचा आणि त्यांच्या नेत्यांचा संताप झाला आहे. कारण, या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यास आणि संबंधितांना न्याय मिळावा, अशी काँग्रेसची इच्छाच नाही. त्यांना या प्रकरणाचा वापर केवळ राहुल गांधी आणि प्रियांका गांधी – वाड्रा यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी करावयाचा आहे.

आता पाऊणवेळचे राजकारणी असलेले राहुल गांधी हे किती सुमार वकुबाचे आहेत, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. वयाची पन्नाशी गाठली तरीदेखील त्यांना तरुण नेता मानावे, असा त्यांचा बालिश हट्ट असतो. दुसरीकडे प्रियांका गांधी – वाड्रा यांचा तर फंडाच वेगळा आहे, त्यांचा अर्धा वेळ आपल्या कुटुंबाच्या अधिकारांचा वापर करून आपल्या यजमानांची (पक्षी – रॉबर्ट वाड्रा) संपत्ती वाढविण्यात खर्च होतो. उरलेल्या वेळात “माझी केशरचना आणि माझे नाक हे माझी आजी आणि देशाच्या कणखर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारखे आहे, म्हणून त्या आता मी नेतृत्व करणार”, हे सांगण्यात खर्च होतो.

हाथरसमध्ये जाण्यासाठी राहुल आणि प्रियांका यांनी जो तमाशा केला, तो अनेकांना अतिशय ऐतिहासिक असा वाटू शकेल. मात्र, तो तमाशा म्हणजे अतिशय हिन दर्जाचे राजकारण होते, हे काँग्रेसच्याच एका नेत्याने सिद्ध केले आहे.

“हाथरसमध्ये दंगे होतील, मोठ्या प्रमाणावर गोळीबार होईल. दोन्ही बाजुंची बरीच मंडळी त्यात मरतील. मग मोठा संघर्ष उफाळेल आणि मग आमचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी – वाड्रा हे पुन्हा हाथरसमध्ये येतील. मग या मुद्द्याचा वापर करून राज्यात मोठ्या प्रमाणावर अराजक निर्माण होईल आणि झालेच तर त्यात योगी आदित्यनाथ सरकार बरखास्तही होऊ शकते.

पिडीतेच्या कुटुंबाला मी व्यवस्थित समजावले आहे आणि त्यासाठी पैसेही दिले आहेत”. काँग्रेसचा हा असा प्लॅन राहुल गांधी यांचा निकटवर्तीय आणि काँग्रेसचा राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम केलेल्या श्योराज जीवन याने आखला होता. एका स्टिंग ऑपरेशनमध्ये ते समोर आले आहे. आता हा प्लॅन काँग्रेसनेतृत्वाच्या आदेशाशिवाय काही आखला जाणार नाही.

मात्र, काँग्रेसचा असा प्लॅन उत्तर प्रदेश सरकारने वेळीच नेस्तनाबुत केला आहे. त्यामुळेच काँग्रेसची आता तडफड सुरू आहे. कारण प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केल्यानंतर सत्य काय ते बाहेर येईलच. बलात्कार झाला की नाही, हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली, कोणी केली अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळायची आहेत.

मात्र, सत्य बाहेर आल्यावर राजकारणच संपणार असल्याचे काँग्रेसची आता आरडाओरड सुरू आहे. काँग्रेसशासित राजस्थानमध्ये जवळपास दररोज बलात्कार होत आहेत, काँग्रेस सत्तेत सहभागी असलेल्या महाराष्ट्रात तर कोव्हिड सेंटरमध्येही बलात्काराच्या घटना घडत आहेत; मात्र काँग्रेसचे लक्ष्य केवळ योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश हेच आहे.

विशेष म्हणजे २००२ सालापासून नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्यासाठी काँग्रेसने आपली संपूर्ण इकोसिस्टीम कामाला लावली होती. त्यात पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी अशा अनेक गणंगांचा समावेश होता. अगदी तशीच व्यवस्था आताही कार्यरत करण्यात आली आहे. मात्र, काँग्रेसने एक गोष्ट लक्षात घ्यावी, त्यांच्यासमोर मोदींएवढेच कणखर असे योगी आदित्यनाथ या संन्याशाचे नेतृत्व उभे आहे. त्यामुळे हाथरस प्रकरणातील सत्य बाहेर काढण्यासोबतच योगी काँग्रेसचेही कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाहीत, हे नक्की !

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*