राणी दुर्गावती: अकबराला टक्कर देणारी साक्षात महिषासुरमर्दिनी!

मोगल सम्राट अकबराच्या मस्तवाल कारभाराला टक्कर देऊन स्वाभिमान जपत बलिदानाच्या वेदीवर चढणारी गोंड राणी दुर्गावती समस्त भारतीय जनतेपुढे आदर्श ठेवून अजरामर झाली.


मुघलांच्या वाढत्या प्रभावामुळे स्वतःचं राज्य टिकवण्याचा विचार अनेक राजांसाठी कल्पनातीत होता…!अकबराच्या वाढत्या महत्वाकांक्षेमुळे स्वाभिमानाने जगणं हा सगळ्यांत मोठा अपराध झाला होता…!त्यावेळी अशा आततायी शासनापुढे न झुकता, जगायचं तर मानाने अथवा जगायचंच नाही आशा हट्टाने पेटलेली… स्वत:हाच्या बलिदानाने “स्वाभिमानाशी तडजोड नाही” हा कडक संदेश संपूर्ण भारतवर्षाला देणारी दुर्गा म्हणजे गोंड राणी दुर्गावती! अंगात चिलखत,डोक्यावर शिरस्त्राण, पाठीला बाणांचा भाता,खांद्यावर धनुष्य…!घोड्याच्या दोन्ही बाजूंनी एकेक पाय टाकून उभं राहायचं आणि तोंडात लगाम पकडून दोन्ही हातांनी तूफान तलवारबाजी करत शत्रूच्या गोटात निर्भीडपणे शिरायचं…ही होती वीरांगना राणी दुर्गावती!तिच्या अतुलनीय शौर्यामुळे तसंच प्रजेच्या सर्वतोपरी केलेल्या कल्याणामुळे आजही अनेक गीतांमधून,काव्यांमधून जी आठवली जाते ती प्रजेची आई म्हणजे राणी दुर्गावती!

५ ऑक्टोबर १५२४ रोजी हमीरपूर(उत्तर प्रदेश) जिल्ह्याच्या महोबा गावामधे चंदेल वंशाचे महाराजा कीर्तीदेव सिंह यांच्या पोटी ही दुर्गा जन्माला आली. कलिंजार च्या किल्ल्यावर तिचा जन्म झाला. कुटुंबात साक्षात दुर्गेचं दैवत होतं. म्हणून नाव दुर्गावती!आई गेल्याने वडिलांनीच तिचं पालन पोषण केलं. रक्तातच शौर्य घेऊन आलेली ही मुलगी वयाच्या पहिल्या १३-१४ वर्षांत धनुर्विद्या, खड्ग, घोडेस्वारी, पोहणं या सगळ्यांत निष्णात झाली. संस्कृतसह अनेक भाषा आत्मसात करत तिने अनेक ग्रंथांचा अभ्यासही केला. गावकर्‍यांना त्रास देणार्‍या जंगली वाघांना एका बाणांत ती आडवं करायची. अशी ही सुदृढ, तेजस्वी, निर्णयक्षम, धाडसी दुर्गा विवाहयोग्य झाली. पण मंडलिक राजांची स्थळं तिने सपशेल नाकारली. तिला स्वतंत्र वृत्तीचा पराक्रमी नवरा हवा होता.

गोंडवाना (मध्यप्रदेश) राज्याचा राजकुमार दलपत शहा (संग्राम सिंह राजाचा मुलगा) अत्यंत शूर आणि मातृभूमीवर नि:स्सीम प्रेम करणारा होता. तो स्वत:ची ओळख “राज्याचा सेवक” अशी करून देत असे. यामुळे दुर्गावती प्रभावित झाली. पण लग्नासाठी तो पूर्णपणे क्षत्रीय नसल्याचा मुद्दा उपस्थित केला गेला. तेव्हा दुर्गावतीने “क्षतात् त्रायते इति क्षत्री- जो आपत्तीपासून रक्षण करतो तो क्षत्रीय” हे सगळ्यांना पटवून स्वतंत्र बुद्धीने तिचा वर निवडला, राजा कीर्तीदेव सिंह लाही ते पटलं. १५४२ मधे दुर्गावती राणी होऊन गोंडवाना(गाढिमंडला) मधे आली. पुढे दलपत शहा राजा झाला.
राणी बनून आल्यावर दुर्गावती महालामधे फारशी रमली नाही. दलपत सिंह ने तिला प्रोत्साहन दिलं.

राज्याची ओळख करून दिली. संपूर्ण राज्याचं अवलोकन करत भौगोलिक, सामाजिक दृष्टीने प्रजेला ओळखण्यासाठी ती खूप भटकली. नर्मदा नदीचे वेगवेगळे भाग, दर्‍या, डोंगर, इतर नद्या ओलांडून ती गावोगावी गेली. नैसर्गिक आपत्ती, पुराच्या शक्यतेवर आधीच तोडगे काढून त्या त्या भागात काम सुरू केलं. प्रजेसमोर पडदा किंवा घुंगट ठेवण्याची पद्धत तिने बंद केली. ती सगळ्यांपुढे आत्मविश्वासाने गेली. त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधला. मातीने माखलेल्या, वाकून नमस्कार करणार्‍या बायकांना तिने पटकन आलिंगन दिलं! ती झोपडीत आनंदाने जेवली! बघता बघता गढीमंडलाचं रूप पालटलं. १५४५ मधे राणीला सुदृढ,तेजस्वी असा मुलगा झाला…वीरनारायण! त्याचं संगोपन,प्रशिक्षण आणि राज्याचं प्रशासन असं सगळं ती उत्तम रीतीने सांभाळू लागली. पण तिचे हे सुखाचे दिवस फार काळ टिकले नाहीत. तिचे वडिल महाराजा कीर्ती सिंह यांची शत्रूकडून हत्या करण्यात आली. तिचं गौरवशाली माहेर नेस्तनाबूत केलं त्यांनी.

१५५० मधे आजारपणामुळे दलपत शहा निधन पावला. या आघातांमधून ती सावरली. सती न जाता वीरांगनेचा वेश तिने धारण केला! सेनापती आधार सिंह आणि इतर निष्ठावान मंत्र्यांनी तिला साथ दिली. आता पूर्ण वेळ ती राज्यासाठी देऊ लागली. तिने राजधानी सिंगोरागढ इथून हलवून सातपुड्याच्या रांगांमध्ये असलेल्या चौरागढ इथे नेली. त्याचा strategic importance ओळखून हा बदल तिने मुद्दाम केला.

वीरणारायणचं शिक्षण सुरू होतं. त्याच वेळी राज्य सर्वार्थाने सक्षम करायचं असं तिने ठरवलं. चांगली शिक्षण व्यवस्था, अर्थव्यवस्था, निर्मिती कार्य, अनुशासन, युद्धप्रशिक्षण यामधल्या गतीमुळे राज्याचं चित्रच पालटलं! हाथी तलावात शेकडो मदमस्त हत्ती खेळायला लागले…वेगळी गजवहिनी राणीने सुरू केली. महिलांच्या दलाची मुख्य तिची बाल सखी रामचेरी ही होती. सिंगोरागढ हे प्रशिक्षणाचं केंद्र होतं. बरोबरीने विद्वानांचा आदर, शास्त्र चर्चा हेही राणीला आवश्यक वाटायचं. गुप्तचरांच्या बैठका, व्यापारी, शेतकर्‍यांसाठी सुविधा,नवीन रस्ते बांधणी, जल सिंचन हे सगळं ती जातीने बघायची! वेशांतर करून आढावा घ्यायची. राजपूत, पठाण, गोंड,ब्राह्मण अशा अनेक समाजांची भक्कम फौज तिने उभारली.

1562 मधे अकबराने बाज बहादूर चा पाडाव करून सगळा माळवा प्रांत जिंकला. माळवा मुघलांचं सत्ताकेंद्र झालं. त्याची सीमारेषा गोंडवानालगत आली! अकबराच्या महत्त्वाकांक्षेला अंत नव्हता. राणीचं वैभवशाली राज्य त्याच्या डोळ्यांत आलं नसतं तर नवल! त्याने ख्वाजा आबुल माजिद असफ खान याला सैन्य देऊन गोंडवानावर पाठवलं.

इकडे राणी सज्ज झाली. समोर सैनिकांना पाहून तिने घोडा वळवला. ती पळून जातेय असं वाटून मुघल सैनिक पाठलाग करू लागले. तिच्या मागोमाग डोंगर दर्‍यांमद्धे मुघल सैनिक पोचले.राणी कुठेच दिसत नव्हती..अचानक वरुन बाणांचा पाऊस सुरू झाला! काही कळायच्या आतच त्यांची पिछेहाट झाली. राणी स्वतः ज्या गतीने बाण धनुष्यातून सोडायची…त्याला फक्त मुसळधार पावसाचीच उपमा योग्य ठरेल!

अशा अनेक चकमकी सुरूच होत्या. कितीदा सैनिक आले आणि त्यांची पिछेहाट झाली. अकबराला हे कळत नव्हतं की ज्या राण्यांच्या सौंदर्याच्या इतके वर्ष बातम्या येत राहतात त्याच स्त्रिया वेळ आली की एवढ्या कर्तव्यकठोर कशा होऊ शकतात? महालांमध्ये रहाणार्‍या राण्या अशा हातात शस्त्र घेऊन पुरुषांवर सपासप वार करत एवढ्या शक्तिनिशी तुटून कशा पडतात?
पुन्हा एकदा असफ खान सैन्याचा प्रचंड ताफा आणि शस्त्रांसह निघाला. राणीला आधार सिंह ने मुघल शक्तीची कल्पना दिली. पण राणीने लढण्याचं ठरवलं. तिने यावेळी लढण्यासाठी (defensive battlefield) नरई नाल्याची निवड केली. नरईचं युद्धं असंच या युद्धाला म्हणलं जातं. त्याच्या एका बाजूला गौड आणि नर्मदा नदी होती आणि दुसर्‍या बाजूला उंच टेकड्या, डोंगर होते. मुघलांकडे आधुनिक शस्त्रं होती आणि मुख्य म्हणजे तोफा होत्या! राणीकडे कमी सैनिक होते पण …होता दृढ निश्चय…स्वाभिमानाने जगण्याचा!घनघोर युद्धाला प्रारंभ झाला. राणीचा म्होरक्या अर्जुन दास धारातीर्थी पडला. मग चपळाईने कधी घोड्यावर तर कधी तिच्या आवडत्या सरमन हत्तीवर आरुढ होत ती नेतृत्त्वं करू लागली. थोड्या वेळांत तिचा मुलगा वीरणारायण जखमी झाला. त्याला लगेच सुरक्षित स्थळी हलवण्यांत आलं.

आता मात्र तिच्यातली आई आणखीन पेटून उठली.कधी दोन्ही हातांनी वार करत तर कधी बाणांचा पाऊस पाडत ती शत्रूसागराला भिडली! दुसर्‍या दिवशी सकाळी असफ खानने तोफांच्या गोळ्यांनी मुद्दाम पाण्याचा बांध फोडला. पाणी झपाट्याने वाहू लागलं. राणी ईप्सित ठिकाणी पोचू शकली नाही. पूर वाढत चालला. एवढ्यांत राणीच्या कानशीलामध्ये बाण घुसला. तो काढून फेकेपर्यंत दुरसा बाण आरपार गळ्यांत शिरला जो बाहेर काढताच रक्ताची धार वाहू लागली. राणीला कळून चुकलं की आता शत्रूला मारणं कठीण आहे. पण तरीही तिचा निश्चय ठाम होता! कसला निश्चय?

राणी हत्तीवर होती. गनू महावताने सरमन हत्तीला परत फिरण्याचा संकेत दिला. पण राणीने नकार देत त्याला खाली बसवण्यासाठी सांगितलं. राणी खाली उतरूनही लढण्यासाठी पुढे सरसावत होती. राणीची अवस्था पाहून आधार सिंहच्या डोळ्याला धारा लागल्या! तो राणीला परत नेण्यासाठी पुढे आला. पण राणीने त्याला थांबावलं. राणीने आपल्या मातृभूमीला, गढमंडलला अखेरचा प्रणाम केला. सगळे प्राण एकवटून शेवटचे शब्द उच्चारले “गढा की जय!” आणि क्षणार्धात तिने खंजीर स्वत:च्या छातीत खुपसला. ती तारीख होती २४ जून १५६४. राणी कोसळली… पण मरतं ते फक्त शरीर! गीता वाचणारी दुर्गावती गीता प्रत्यक्ष जगली! दुसर्‍या दिवशी वीरनारायण सुद्धा आईप्रमाणे शरण न जाता शेवटच्या श्वासापर्यंत लढला आणि आईला भेटण्यासाठी निघून गेला! राणी गेली तो दिवस बलिदान दिन म्हणून पाळला जातो!

एक स्त्री एवढ्या मानाने जगली आणि एका वीर योध्याला शोभेल अशीच रणांगणावर लढतांना धारातीर्थी पडली हे ऐकून बाकीच्या राजांमधे सुद्धा शत्रूला सहज स्वाधीन न होता शेवटपर्यंत लढण्याची हिम्मत आली! राणी दुर्गावती प्रेरणेचा स्त्रोत बनून संपूर्ण भारतात भरून राहिली! आपल्या या लाडक्या राणीचा,आईचा पराक्रम एका पिढीने दुसर्‍या पिढीला गर्वाने सांगितला. १९८३ मधे जबलपूर विश्वविद्यालयाचं नाव राणीच्या सन्मानार्थ “राणी दुर्गावती विश्वविद्यालय”असं ठेवण्यात आलं. १९८८ साली तिचा एक पोस्टल स्टॅम्प काढला आहे. जबलपूर जंक्शन ते जम्मूतावी या ट्रेन चं नाव सुद्धा दुर्गावती एक्सप्रेस आहे!

राणी दुर्गावतीवर अनेक गाणी,पोवाडे, कवनं रचली गेली!आपणही याच राणीच्या राज्यात जन्माला आलो आहोत याचा प्रत्येक भारतीयाला गर्व वाटतो!आशा या मानिनीला… रणरागिणीला… साक्षात दुर्गेला साष्टांग दंडवत!

नाके भूमितले फणीश- भवने सिद्धि: सदा सेविता |

यासंख्ये प्रबलारिवृन्द हरणी, दुर्गेव दुर्गावती || (गढेशनृप वर्णन)

  • सौजन्य : फेसबूक
  • https://mohinigarge.blogspot.com/

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*