राम मंदिराची उभारणी हा ज्ञानेश्वर तुकारामांचा पराभव कसा?


आपल्या परंपरेत प्रतिकांना किती महत्त्व आहे हे काही मंडळी कदाचित विसरली असावीत. या प्रतिकांसाठी मोठी किंमत भारतीय माणूस मोजत आला आहे. जागेला महत्त्व आहे म्हणूनच लाखो वारकरी पंढरपुरला शेकडो वर्षांपासून धाव घेत आले आहेत. याच मंदिरांचा जीर्णाद्धार झालेला आहे. यात नव्हे तर भारतातील कित्येक मंदिरांचा जीर्णोद्धार केवळ त्या जागेवर श्रद्धा आहे म्हणूनच केला गेला आहे. नसता ती जागा सोडून दुसरीकडे तेच मंदिर उभारलं गेलं असते ना… अयोध्येतील नियोजित राम मंदिराला निर्जीव वस्तू समजून त्याच्या निधी संकलनावर टीका करणाऱ्या काही बुद्धीवंतांचा घेतलेला हा सडेतोड समाचार..How construction of the Ram temple is a defeat for Dnyaneshwar and Tukaram?


श्रीकांत उमरीकर (औरंगाबाद)

राम मंदिराची उभारणी सुरू झाली आहे. त्यासाठी देशभरांतून देणग्या गोळा केल्या जात आहेत. अपेक्षेप्रमाणे यावर टीकाही सुरू झाली आहे. लोकशाहीत टीका व्हायला हवी. त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. पण यावर होणारे दोन आरोप मोठे विचित्र आहेत.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी समाजमाध्यमांवर यावर टीका करणारी एक पोस्ट लिहीली. त्यात गरजू माणसांसाठी काम करणार्‍या संघटना पै पै साठी तरसत आहेत आणि निर्जीव वास्तुसाठी करोडो रूपये वहात आहेत. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचा याहून मोठा पराभव कोणता? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

मोदी-संघ-अमित शहा-भाजप या एम.एस.ए.बी. वर कोणत्याही निमित्ताने टीका करण्याचे काही लोकांचे धोरण आहे. त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. मी काही भाजपचा प्रवक्ता समर्थक भक्त कार्यकर्ता नाही. दुसरा मुद्दा निर्जीव वस्तूंवर खर्च कशाला करायचा असा जो आहे त्यावर मात्र विचार केला पाहिजे. विश्वंभर चौधरी यांनी हा मुद्दा उपस्थित केला तेंव्हा आपल्या परंपरेत प्रतिकांना किती महत्त्व आहे हे ते कदाचित विसरले असावेत. या प्रतिकांसाठी मोठी किंमत भारतीय माणूस मोजत आला आहे. जागेला महत्त्व आहे म्हणूनच लाखो वारकरी पंढरपुरला शेकडो वर्षांपासून धाव घेत आले आहेत. याच मंदिरांचा जिर्णाद्धार झालेला आहे. यात नव्हे तर भारतातील कित्येक मंदिरांचा जिर्णोद्धार केवळ त्या जागेवर श्रद्धा आहे म्हणूनच केला गेला आहे. नसता ती जागा सोडून दुसरीकडे तेच मंदिर उभारलं गेलं असते ना.

ज्या वारकरी संप्रदायाचा उल्लेख विश्वंभर करतात त्या संप्रदायानं निर्गुणासोबतच सगुणाचीही उपासना केली आहे. तेंव्हा समोर प्रत्यक्ष वास्तू प्रतिक म्हणून लागतेच. केवळ मुर्तीच नव्हे तर समाधीही बांधून त्या जागेवर पुजा केली जाते. वारकरी संप्रदायानेच गावोगावी मंदिरं उभारली आहेत. तिथे सातत्याने किर्तनं भजनं होत असतात. सप्ताह साजरे होतात. पंढरपूर सोबतच देहू, आळंदी, पैठण, आपेगांव, नेवासा, मुक्ताईनगर, सासवड, श्रीगोंदा, त्र्यंबकेश्वर, नर्सी नामदेव अशा कितीतरी ठिकाणांचा धार्मिक स्थळ म्हणून विकास वारकरी संप्रदायीकांच्या रेट्यामुळेच झाला आहे. या ठिकाणी मोठ मोठ्या वास्तु उभारल्या गेल्या आहेत. हे कसं विसरता येईल. या सर्व ठिकाणच्या निर्जीव वास्तू आपल्याला जरी निर्जीव वाटत असल्या तरी तसं सश्रद्ध वारकर्‍यांना वाटत नाही.

नदीवरचे अप्रतिम असे घाट उभारल्या गेले आहेत. अहिल्याबाईंनी मध्ययुगीन कालखंडात भारतीयांची सश्रद्ध मानसिकता जपण्याचे मोठे काम मंदिरं मठ नदीवरचे घाट आणि बारवा या निर्जीव वास्तू उभारूनच केले ना? त्यांच्यावरच्या अभ्यासपूर्ण ग्रंथात विनया खडपेकर यांनी तर असे सप्रमाण सिद्ध केले आहे की ज्या ठिकाणी मठ मंदिरं उभारली जातात नदीवरचे घाट बांधले जातात बारवांची दुरूस्ती होते त्या ठिकाणी शांतता नांदते. असे एक अधिकृत धोरणच ठरवून अहिल्याबाईंनी देशभर या आपल्याला वाटणार्‍या निर्जीव पण अस्मितेसाठी सश्रद्ध मानसिकता जपण्यासाठीच्या उर्जावान वास्तूंची उभारणी केली. आजही त्याचे ढळढळीत पुरावे आपल्याला मिळतात.

सोमनाथचे मंदिर असेच नजिकच्या काळात उभारल्या गेले. त्यातून तिथे नेमके काय दंगेधोपे झाले? जिथे पूर्वी मंदिर होते आणि त्याचे पुरावेही उत्खननात प्राप्त झाले आहेत म्हणूनच हा हट्ट भाजप संघ विश्व हिंदू परिषद आदींनी धरला. आणि न्यायालयानेही तो त्याच कसोटीवर तपासून घेतला ना. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यावर अधिकृतरित्या निर्णय दिल्यावर न्यासाची रितसर स्थापना झाल्यावर आता टीका कशासाठी? राम मंदिराच्या देणगीसाठी कुणी कुणाला धमकावल्याचे एकही उदाहरण अजून तरी समोर आले नाही. तेंव्हा ही अशी टीका योग्य नाही.

दुसरा मुद्दा गरीबांसाठी काम करण्याचा. तर धार्मिक संस्थानांनी जितकी समाजसेवा या देशात केलीय तेवढी आत्तापर्यंत कुठल्याच ‘एनजीओ’ ला करता आलेली नाही. गोरगरिबांना अन्नदान हे सगळ्यात मोठे काम हजारो वर्षांपासून मंदिरे करत आली आहेत. कितीतरी संस्था अनाथांसाठी अन्नछत्र चालवतात. राहण्याची सोय करतात. अंध अपंग मानसिक दृष्ट्या खचलेले यांना सांभाळण्याचे मोठे काम या देवस्थानांनीच केले आहे. हे विसरून कसे चालेल. या देवस्थानांमुळे धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणात होते आणि रोजगाराला चालना मिळते. या बाबींकडे कसे काय दुर्लक्ष करायचे? आजही मोठ्या देवस्थानांनी आपल्या निधीतील मोठा वाटा सातत्याने सामाजिक कामासाठी वापरलेला दिसून येतो. ज्या गरिबांच्या अडचणी आहेत त्या कुठल्याही मोठ्या देवस्थानांना कळवा. मला खात्री आहे भारतभरची देवस्थाने गरिबांसाठी गरजूंसाठी विकलांगांसाठी मदत करतील.

तिसरा मुद्दा यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांना ओढण्याचा आहे. वारकरी संप्रदायातीलच असलेले त्याच परंपरेतून आलेले जयंत देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या संदर्भात अनेक दाखले देत त्यांनी विश्वंभर यांचा हा आरोप खोडून काढला आहे. स्वत: तुकाराम महाराजांनी आपल्या गावातील विठ्ठलाचे मंदिर दुरूस्त केले होते याचा संदर्भही जयंत देशपांडे यांनी दिला आहे. आता अपेक्षा आहे विश्वंभर यांनी याला उत्तर द्यावे.

खरं तर ही देणगी मोठ्या प्रमाणावर गोळा होते आहे ती सर्व स्वेच्छा देणगी आहे. त्यात आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही. सर्व सामान्य गोरगरिबांची अडचण ओळखून त्यांना खर्‍या अर्थाने मदत करण्याचे काम अशा मंदिरे मठांनीची केले आहे. हे विसरून चालणार नाही. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनी पंढरपुरची वारी का पुढे चालू ठेवली? आज काळावर मात करून ही परंपरा केवळ टिकलीच असे नव्हे तर ती वृध्दिंगत झाली. इतका प्रचंड प्रतिसाद आजही पंढरीच्या वारीला कसा काय मिळतो आहे? आजही गावोगावच्या यात्रा तुडूंब गर्दीने कशा काय फुलून येतात? या जून्या वास्तू आजही लोक प्राणपणाने कशा काय जपत जातात? विश्वंभर चौधरी यांच्याच घराच्या बाजूला वालूर येथे लिंगायत समाजाचा प्राचीन मठ आहे. वास्तु शास्त्राच्या दृष्टीनेही ती वास्तू अप्रतिम अशी आहे. दगडी ओवर्‍या, भक्कम लाकडी खांब हे सर्व प्राचीन संपन्न असा वारसा आहे. विश्वंभर यांच्याच गावात प्राचीन सुंदर बारवा आहेत. मंदिरं आहेत. शिल्पं आहेत. हिंदू बांधकाम शैलीचा अविष्कार असेली मस्जीदही आहे. या सर्वांना केवळ निर्जीव प्रतिकं समजता येईल का?

भाजप संघ मोदी अमित शहा यांच्यावरची टिका ही वेगळी बाब आहे. ती ज्यांना कुणाला करायची त्यांनी ती करावी. विश्वंभर ज्या महात्मा गांधींना मानतात त्या गांधीनीही वैष्णव जन तो तेणे कहिये सारखे भजन आपल्या सार्वजनिक सभांमध्ये सातत्याने वापरले होते. महात्मा गांधींना पाहिलेला एकमेव चित्रपट अशी ज्याची जाहिरात केली गेली तो चित्रपट होता ‘रामराज्य’. धार्मिक श्रद्धा आणि धर्मांधता यात फरक आहे. वारकरी संप्रदायाने हा फरक नेमका ओळखून त्या प्रमाणे आपल्या समाजाला पटणारा पचणारा असा मार्ग दाखवला. आज राम मंदिराचे निर्माण हे एका स्वतंत्र न्यासाच्या वतीने होते आहे. त्यात भाजप मोदी संघाला ओढून तूम्ही त्यांच्या सोयीची अशी चर्चा घडवून आणत आहात.

भाजपने उघडपणे 1989 पासून आपल्याला धोरणात या मुद्द्यांचा समावेश केला होता. राम मंदिर, 370, तिन तलाक, समान नागरी कायदा हे विषय ठामपणे मांडले होते. त्यामुळे त्यांच्यावर आता टिका कशी काय करता येईल? त्यांच्या जाहिरनाम्यातच या गोष्टी होत्या. लोकांनी त्यांना यासाठीच निवडुन दिले आहे. लोकशाही मार्गानेच त्यांनी निवडणुका जिंकल्या आहेत. न्यायालयाने आदेश दिल्यावरच राम मंदिराचे निर्माण सुरू झाले आहे.

How construction of the Ram temple is a defeat for Dnyaneshwar and Tukaram?

म्हणजे कसा विरोधाभास आहे. जे मोदी भाजप यांच्यावर लोकशाही विरोधी असल्याची टीका करत आहेत तेच कृषी आंदोलनात लोकशाही मानायला तयार नाहीत. अवैध रित्या रस्ता अडवून बसले आहेत. सर्वौच्च न्यायालयाने नेमलेली समिती यांना नको आहे. सर्वौच्च न्यायालयात यांना जायचे नाही. याच काळात विविध राज्यांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत, बिहार सारखे राज्यही हे आंदोलन पंजाबात चालू होते तेंव्हा जिंकल्या. हैदराबाद महानगर पालिकेत 4 वरून 48 जागांवर झेप घेवून दाखवली. आता लोकशाही चौकटीत टिका नेमकी काय आणि कशी करता येईल? कुमार केतकर यांनी आरोप केला होता की निवडणुका होवू दिल्या जाणार नाहीत. पण त्या झाल्या. मोदी सत्ता सोडणारच नाहीत. पण त्यांना ती अधिकृतरित्या सोडायची वेळच आली नाही. एक जरी जागा कमी झाली तरी मोदींनी राजीनामा द्यायला हवा असे केतकर बोलले होते. पण मोदींना आधीपेक्षा जास्तीचे बहुमत मिळाले. मोदींनी काय करावे हे सांगत असताना ते तसं झालं नाही तर केतकर आणि बाकी सर्व पुरोगामी काय करणार हे नाही त्यांनी जनतेसमोर मांडले. विश्वंभर चौधरी यांनी टिका जरूर करावी. त्यांचा तो लोकशाही हक्क आहे. पण ती करत असताना वस्तुनिष्ठपणे करावी. अनाठायी करू नये इतकीच विनंती.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था