ममता जिंकाव्यात असे खरेच काँग्रेस – डावे – पवारांना वाटते?


जिंकून किंवा अगदी हरूनही संपूर्ण राज्य आपल्या राजकीय प्रभावात ठेवण्याची ममता बॅनर्जींची क्षमता काँग्रेस – डावे पक्ष आणि शरद पवारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ममता हराव्यात असे कितीही विरोधकांना वाटत असले, तरी ममतांचे राजकीय अस्तित्व त्यांना भारीच ठरणारे आहे, येत्या काही वर्षांमधील ही राजकीय वस्तुस्थिती आहे. मोदींसमोर काँग्रेस – डावे – पवार टिकणारे नाहीत… ममता टिकतील की नाही… हे येणारा काळ ठरवेल. congress, left parties and sharad pawar eyes mamata banerjee as their opponent in the centre


विनायक ढेरे

बंगालच्या निवडणूकीत भाजप आणि तृणमूळ काँग्रेस यांचा राजकीय संघर्ष होताना तो हिंसक टोक गाठतो आहे. दोन्हीही बाजू एकमेकांवर जीवघेण्या पद्धतीने तुटून पडत आहेत. या लढाईचे दोन पक्षांमध्ये ध्रुवीकरण होताना काँग्रेस आणि डावे पक्ष संदर्भहीन होताना दिसत आहेत. याची चाहूल काँग्रेससह डाव्या पक्षांना लागली आहे. त्यामुळेच काही प्रश्न तयार झाले आहेत. याची उत्तरे नजीकच्या काळात विरोधी पक्ष शोधताना दिसतील. यातील एक प्रश्न मोलाचा आहे, तो म्हणजे……पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या निवडणूकीत जिंकाव्यात, असे खरेच विरोधी पक्षांना वाटते आहे का?; केंद्रातल्या नेतृत्वाच्या स्पर्धेत अजून एका प्रबळ नेत्याची भर काँग्रेस पक्ष सहन करेल का? हे प्रश्न बंगालच्या निवडणूकीतील ममतांच्या संभाव्य यशाच्या निमित्ताने पडताना दिसताहेत. याला कारणेही तशीच आहेत. ममतांच्या निवडणूक परफॉर्मन्सवर काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांच्या पुढच्या चाली खरोखरच अवलंबून आहेत.

भाजपचे आव्हान मोडून ममता खरेच बंगाल तिसऱ्यांदा जिंकल्या तर तो त्यांच्या नेतृत्वाचा केवळ बंगालमध्येच मोठा विजय ठरेल असे नव्हे, तर केंद्रातही विरोधकांचे नेतृत्व म्हणून त्यांचे स्थान जबरदस्त मजबूत होईल. एवढेच नाही, तर त्या खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय टकरीत येतील… आणि नेमकी इथेच विरोधकांना खरेच ममता जिंकाव्यात की हराव्यात, असे वाटण्याची राजकीय मेख देडलेली आहे.

ममतांचा बंगालचा विजय काँग्रेसच्या भावी अध्यक्षांसाठी अर्थात राहुल गांधी यांच्या नेतृत्वासाठी जबरदस्त आव्हान ठरू शकते. याकडे काँग्रेस नेते दुर्लक्ष करू शकत नाहीत. काँग्रेस कितीही दुबळी किंवा गलितगात्र झाली, तरी केंद्रीय पातळीवरचे नेतृत्व काँग्रेस सोडू शकत नाही. त्यामुळेच ममतांच्या जिंकण्यापेक्षा हरणे हे काँग्रेस नेतृत्वाच्या राजकीय पथ्यावर पडणारी गोष्ट ठरणार आहे.

जे काँग्रेसचे तेच पवारांचे

मध्यंतरी शरद पवार बंगालला जाणार होते. त्याच्या बातम्या मराठी माध्यमांमध्ये आल्या. त्यातून पवार हे फार मोठे राष्ट्रीय नेते आहेत. ममतांना त्यांची मदत होऊ शकते असे चित्र मराठी माध्यमांनी उभे केले. पण ते गेले नाहीत. अर्थात पवार जाऊन बंगालमध्ये फार मोठा राजकीय फरक पडण्याची शक्यता नाही. कारण पवार जाऊन फरक पडेल असा देशातल्या कोणत्याही राज्याचा राजकीय इतिहास नाही. अगदी केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष अस्तित्वात आहे. तरी पवारांनी तिकडचे दौरे केल्याच्या बातम्या आलेल्या नाहीत. लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीचा खासदार आहे. पण पवारांच्या प्रचारामुळे तो खासदार म्हणून निवडून आल्याच्या बातम्या आलेल्या नाहीत.

ज्येष्ठत्वाचा मान सगळे नेते पवारांना देतात तसा मान ममता देखील देतात, यापेक्षा पवारांचे जास्त राजकीय महत्त्व बंगालच्या निवडणूकीत नाही. उलट पवारांनाही ममता बंगालची निवडणूक जिंकाव्यात असे खरेच वाटते का?, हा खरा प्रश्न आहे. कारण अजूनही पवारांची केंद्रीय नेतृत्व करण्याची आशा पल्लवित आहे. केंद्रीय नेतृत्वासाठी आपणच सर्वमान्य उमेदवार ठरू शकू, अशी त्यांना आशा वाटत असल्याचे त्यांचे महाराष्ट्रातील समर्थक सांगतात. ममता जिंकल्या तर पवारांचा तो दावा फिका पडण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण “जिंकण्याची क्षमता” या निकषावर ममतांचे नेतृत्व केंद्रीय पातळीवर देखील पवारांना भारी ठरेल. ही स्थिती ओळखून पवारांनाही ममता जिंकाव्यात असे वाटण्याची शक्यता फार कमी वाटते.

काँग्रेस – डावे आणि पवार यांना ममतांच्या नेतृत्वाविषयी काय वाटते, हा भाग संबंधितांच्या मर्यादित राजकीय वकूबातून निर्माण होतो. या सगळ्यांच्या मर्यादा स्वयंस्पष्ट आहेत. पण महत्त्वाकांक्षा अमर्याद आहेत. त्यातून निवडणूका कोणीही जिंकल्या तरी तडजोडी करून जुगाडू सरकार आणण्याची या पक्षांची आणि नेत्यांची राजकीय गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ती धडपड करण्याची त्यांची क्षमता आहे. पण या क्षमतेत देखील ममता बॅनर्जी कुठे कमी पडतील, अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही.

कारण जिंकून किंवा अगदी हरूनही संपूर्ण राज्य आपल्या राजकीय प्रभावात ठेवण्याची ममतांची क्षमता काँग्रेस – डावे आणि पवारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ममता हराव्यात असे कितीही विरोधकांना वाटत असले, तरी ममतांचे राजकीय अस्तित्व त्यांना भारीच ठरणारे आहे, येत्या काही वर्षांमधील ही राजकीय वस्तुस्थिती आहे.

congress, left parties and sharad pawar eyes mamata banerjee as their opponent in the centre

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी