राम मंदिरावरून बुद्धीभेद करताना संत परंपरेला वेठीस का धरता?


धर्मस्थळ विकास ही तर समस्त संतांना आनंद देणारी बाब म्हणावी लागेल. कारण वारकरी तत्वज्ञान आणि संतांची भूमिका तर हेच सांगते. मंदिरांच्या विकासाने संतमंडळी आनंदी होईल की तो त्यांचा पराभव असेल? Why hostage traditions of great Saints for opposition of Ram Temple?


जयंत देशपांडे

श्री. विश्वंभर चौधरी हे राममंदिर निधी संकलनासंदर्भात काही दिवसापूर्वी फेसबुकवर व्यक्त झाले आहेत. त्यांना मंदिर निधी संकलनाबद्दल काय वाटते ते त्यांनी लिहिले आहे. त्याचा प्रतिवाद करण्याची गरज नाही. कुणाच्या व्यक्तिगत मताचा आदर केला पाहिजे कारण ते मत त्याच्या बुद्धीच्या मर्यादेत असते आणि बुद्धी निसर्गाकडून मिळते. माझा आक्षेप त्यांचा मंदिर निधी बद्दलच्याभूमिकेला अजिबात नाही. त्या विषयात मला येथे पडायचेही नाही.त्यांनी पोस्टच्या शेवटी गरज नसताना संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांचा याहून मोठा पराभव कोणता? असा जो प्रश्न विचारला आहे त्याबद्दल आक्षेप आहे. Why hostage traditions of great Saints for opposition of Ram Temple?

राम मंदिराला लोक निधी देतात यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचा पराभव कुठल्या अर्थाने श्री. विश्वंभर यांना दिसतो? या संदर्भात एक वारकरी प्रतिनिधी या नात्याने काही स्पष्टीकरण देण्याची गरज वाटली म्हणून हा लेखन प्रपंच. धर्मस्थळ विकास ही तर समस्त संतांना आनंद देणारी बाब म्हणावी लागेल. कारण वारकरी तत्वज्ञान आणि संतांची भूमिका तर हेच सांगते. मंदिरांच्या विकासाने संतमंडळी आनंदी होईल की तो त्यांचा पराभव असेल?

१. धार्मिक स्थळांच्या उभारणीसाठी सामान्यांनी निधी देवू नये, असे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनी कुठे म्हटले आहे ? धार्मिक स्थळांच्या उभारणी सोबतचांगल्या वर्तनाचा, कर्तव्याबद्दल जागरूक राहण्याचा आणि धर्म संमत वर्तन समजून घेण्याचा, करण्याचा सल्ला संतानी दिला. किंबहुना, धर्मस्थळे ही प्रेरणा देवूशकतात आणि त्यासाठीचती उभारावीत असा त्यांचा आग्रह होता. म्हणूनच फारशी आर्थिक श्रीमंती नसताना आणि प्रापंचिक गरजा दूर सारूनसंत तुकारामांनी आपल्या स्वत:च्या खर्चाने देहू गावात श्रीविठ्ठल मंदिर बांधले. समर्थ रामदासस्वामीनी गावोगाव श्रीमारुती मंदिरांची उभारणी केली. श्रीएकनाथांनी आळंदीयेथे जावून केवळ श्रीज्ञानेश्वरी प्रत शुध्द केली नाही तरश्रीसिद्धेश्वर मंदिर नीट नेटके करून समाधीसह मंदिराच्यादेखभालीची व्यवस्था केली. धर्म कार्यात आणि धर्मस्थळ उभारणीत खर्च न करण्याची शिकवण कुठल्याही वारकरी संतांच्या रचनेत दिसून येत नाही. आता धार्मिक स्थळाचा आणखी विस्तार होत असेल तर त्यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांचा पराभव कसा ?

श्रीज्ञानेश्वर आणि श्रीतुकाराम यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या श्रीमंत मातोश्री अहिल्यादेवींनी हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला, व्यवस्था लावल्या. आयुष्यातील अनेक वर्षे या कामाला अर्पण केली. त्यांच्या या कर्तृत्वामुळे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांचा पराभव झाला असे श्री विश्वंभर यांना म्हणायचे आहे का ?

२. धार्मिक स्थळी गेल्या हजारो वर्षांपासून समाज स्वास्थ्याचा विचार देणारे अनेक ग्रंथ निर्माण झाले. किंबहुना त्या ग्रंथांच्या लेखकांनी लेखनासाठी धार्मिक स्थळांची मुद्दाम निवड केली.आद्य शंकराचार्यांनी आपल्या धार्मिक स्थळ भेटी दरम्यानचअसंख्य स्तोत्रांची निर्मिती केली.त्यांच्या दृष्टीने ते इष्ट देवतेच्या सानिध्यात होते आणि ती ती देवता त्यांना सृजनाच्या निर्मितीसाठी बळ देत होती. ग्रंथांच्या आरंभी हे उल्लेख आढळतात. काही रचना बाबत असेही झाले की, कुठलीही भौतिक व्यवस्था नसणाऱ्या ठिकाणी ही ग्रंथ निर्मिती झाली. मात्र अलौकिक अर्थाने ती धर्मस्थळेच होती, त्यांचा परिचयही ग्रंथकर्त्याने आदराने करून दिला आणि पुढे परंपरेतील संतांनी त्या ठिकाणी सामान्याला अनुभव घेता येईलअशी भौतिकरचना करून त्या धर्मस्थळाला उजागर केले (शिवथरघळ जेथे समर्थांनी दासबोधाची रचना केली).असंख्य रचनांचा स्रोत असणारी ही मंदिरांची मालिका वृद्धींगत होत असेल आणि त्यासाठी कुणी पुढे येत असेल तर त्यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांचा पराभव कसा ?

श्रीज्ञानेश्वरी, नेवासा गावाबाहेरील मंदिराच्या परिसरात लिहिली गेली, श्रीव्यासांनी बद्रीनाथच्या गणेश गुंफा (मंदिर) येथे अनेक शास्त्र आणि पुराणांचे लेखन केले. समस्त वारकरी संतांनी त्याच्या सर्वोत्कृष्ट रचना श्रीपांडुरंग मंदिरात केल्या (श्रीज्ञानेश्वरांचा योगिया दुर्लभ तो म्या …., श्रीतुकारामांचा वचन एका हो कमलापती …… हे अभंग इत्यादी.)अशा संत आणि पुराण साहित्य निर्मितीला पुरस्कृत करण्यात धर्म स्थळांचासहभाग असेल तर त्यांचा विस्तारात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांचा पराभव कसा ?

३. समाजात आजही मंदिरांच्या पावित्र्याबद्दल सजगता आहे. मंदिरात चूकून कुणी वेडे वाकडे वागले तर त्याला अपराध समजल्या जातो आणि समाज त्याची दखल घेतो. अर्थात, मंदिरे ही पवित्र वास्तू असून तेथील वर्तन मर्यादेत असावे असे याही काळात लोकांना वाटते (श्रीविठ्ठल मंदिरातील असंगत वर्तनाचे वृत्त आणि त्याबद्दलच्या प्रतिक्रिया). मंदिरात खोटे बोलू नये, निंदा करू नये, कलह निर्माण करणारे विषय बोलू नयेत, भेदाचा विचार करू नये अशी भूमिका असणारे अनेकजण आजही आवर्जून भेटतात. असे असंमत काही घडले तर खेद व्यक्त करतात. याचा अर्थ मंदिरे ही मनुष्यत्वाचा गौरव करायला प्रेरणा देणारी जागा आहे. अशा समाज स्वास्थ्याला पूरक जागा विस्तारत असतील तर त्यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांचा पराभव कसा ?

४. माणसाच्या दैनंदिन जीवनात ताण तणाव असणारच. ताणाच्या या क्षणात तो ताण स्वत: सावरतायायला हवा पण येत नाही. काहींना त्या स्थितीत मंदिरे आश्रयस्थान वाटतात. धार्मिक स्थळी केलेल्या साधनात्यांचा ताण हलका करतात. काहींच्या बाबतीत ताणाचे निवारण करण्यासाठी त्यांना दारूचा गुत्ता सोयीचा वाटतो. समाज तणाव निवळण्यासाठी कुठे जाणे योग्य होईल याचे उत्तर धार्मिक स्थळ हेच असणार आहे. मानसिक स्वास्थ्य वृद्धिंगत होण्यात सहाय्यभूत ठरणारी धार्मिक स्थळे विस्तारत असतील तर त्यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांचा पराभव कसा ?

५. आपण ज्या संतांची नावे घेवून त्यांच्या पराभवाचे सोहळे साजरे करीत आहात ते दोन्ही संत कुठल्या एका धर्माचा विचार करणारे संत नाहीत. अखिल विश्वाचे स्वास्थ्य चिंतणारे संत आहेत. त्यांच्या ठिकाणी वृथा धर्म अभिमान नाही. इतर धर्मियच काय पण प्राण्यांशीही त्यांनी कधी वैर केले नाही. किंबहुना, त्यांच्यातही देवच पाहिला. त्यांना ही प्रेरणा कदाचित अशाच पवित्र स्थळी मिळाली आणित्यांनी देखील त्यांच्या कल्याणाचा मार्ग धार्मिक स्थळातच शोधला. आजन्म मंदिरांची वारी करीत राहिले. वारी करावी अशी काही धर्मस्थळे विस्तारत असतील तर तो संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांचा पराभव कसा ?

६.कुणी कदाचित काही प्रसंग सांगून मंदिराच्या उपयुक्ततेबद्दल प्रश्न उपस्थित करतील. काळाचा म्हणून एक महिमा असतो. त्याचा इष्ट अनिष्ट परिणाम सगळीकडे होतो. सुधारणा होते, पुन्हा बिघडते आणि पुन्हा सावरते. हे निसर्ग चक्र आहे. त्याकडे तसेच पाहिले पाहिजे. या चक्राच्या वाईट फेऱ्यातही चांगले दिवस येतील असा विश्वास देणारी व्यवस्था म्हणून भारतीय समाज धार्मिक स्थळांकडे, मंदिरांकडे पाहतो. त्या आधारावर आजचे कष्ट सोसतो. ही समाजाला जगण्याचे बळ देणारी व्यवस्था विस्तारत असेल तर त्यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांचा पराभव कसा ?

श्री. विश्वंभर चौधरी आणि त्यांच्या या भूमिकेचे समर्थन करणाऱ्या सर्वांकडून उत्तराची अपेक्षा आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे श्री.चौधरींनी उठसुठ वारकरी संप्रदाय आणि त्यातील संत परंपरेला कुठेही ओढू नये. हा संप्रदाय काळाच्या कसोटीवर तावून सुलाखून निघाला आहे. मराठी माणसात असणाऱ्या चांगुलपणाचे संवर्धन या संप्रदायाने केली आहे. सन्मार्गाने वागणाऱ्या सामान्य माणसाला तू असा वागलास तर त्याने तुझे हितच होणार आहे असा विश्वास देवून समाजातील सज्जनता टिकवण्यात या संप्रदायाने मोठे योगदान दिले आहे.

वारकरी संप्रदायाला कुणी वाली नाही आणि कसेही झोडले तरी चालते, कुठेही वापरले तरी चालते असेही समजू नये. अतार्किक विधानाकडे दुर्लक्ष करण्याची हा संप्रदाय शिकवण देतो म्हणून कुणी फारसा प्रतिवाद करण्याच्या भानगडीत पडत नाही. अन्यथा, प्रत्येक घरात या संप्रदायाचा विचार जगणारा वारकरी आहेच. अगदी टीकाकारांच्याही घरात. किमान या सरळमार्गी समाजाला तथाकथित विचारवंतांनी आपल्या गुप्त कटात सोयीच्या वेळी वापरायला सोबत घेवू नये. बुद्धीभेद करायला लाख विषय पडले आहेत, त्यातील काही निवडावेत आणि विशेषत: समाज स्वास्थ्याला, चांगल्या कामांना बाधा आणणारे टाळावेत ही अपेक्षा.

Why hostage traditions of great Saints for opposition of Ram Temple?

मी वारकरी परंपरेतला… तो संस्कार झालेला त्यामुळे विषय समजावून सांगताना उदाहरण देण्याचा मोह टाळत नाही. अलीकडे चांगल्या घरातले मूल उनाड निघाले की त्याच्यासाठी बापाला दोष दिल्या जाणे थांबले आहे. नवा जमाना आहे. तरुण आहे. त्याची जगण्याची स्वतंत्र रीत आहे अशी टिपणी सर्रास केली जाते. जन्मदाते जबाबदारीतून दूर जातात . या पार्श्वभूमीवर, सात आठशे वर्षापूर्वीचा या संतांचा काळ, त्यांनी ना आम्हाला जन्म दिला ना आम्ही त्यांचे श्राद्ध घातले. आजच्या समाजाच्या तुम्हाला वाटणाऱ्या चुकांसाठी या संतपरंपरेला वेठीला धरणे थांबवा. त्यांच्या कर्तुत्वाची खिल्ली उडवणे थांबवा. बिचाऱ्यांना जिवंतपणी समाजाकडून सातत्याने अवहेलना वाट्याला आली. आता तुम्हीतरी त्यांना यातना होतील असे उल्लेख करू नका. पाहिजे तर बेदखल करा. वारकरी विचार, ज्याच्या सानिध्यात आपण आपले जगणे सुसह्य होत आहे, तो अधिक समजून घ्या.

जयहरी !

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती