‘चिराग’पुढे तेवण्याचे आणि तेजस्वीला ‘तेज’ दाखविण्याचे आव्हान

चिराग पासवान आणि तेजस्वी यादव या दोघांसमोर दिवसेंदिवस बिहारमध्ये सामर्थ्यवान होणाऱ्या भाजपाचे आव्हान आहे. त्यातही अमित शाहा बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जदयुचा नजिकच्या भविष्यात घास घेणार, हे नक्की. आणि एकदा तो घास घेतला की त्यांचे लक्ष जाणार ते चिराग आणि तेजस्वीकडे. आता जेथे नितीश कुमारांसारख्या सामर्थ्यवान नेत्याला अमित शाहा लक्ष्य करू शकतात, तर तुलनेने लहान मुलेच असलेल्या चिराग आणि तेजस्वी यांच्या राजकारणाला आळा घालणे हे त्यांना काहीच अवघड नाही. त्यामुळे बिहारमध्ये सत्ता नाही, पण किमान उपद्रवमूल्य शाबूत ठेवणे या दोघांसाठी अत्यंत गरजेचे झाले आहे.


ऋग्वेद

बिहार विधानसभा निवडणुकीला आता रंग चढण्यास प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांना २३ तारखेपासून सुरूवात होत आहे, दुसरीकडे महागठबंधनही आता आक्रमक होत आहे. मात्र, या निवडणुकीत बिहारची सत्ता कोणाला मिळते, केवळ हेच महत्वाचे नाही. तर लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान यांचा राजकीय वारसा त्यांच्या मुलांना सांभाळता येणार की नाही, याचाही निर्णय या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे तेजस्वी यादव आणि चिराग पासवान यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय निर्णायक ठरणार आहे. जर या निवडणुकीत ते कमी पडले तर त्यांचे राजकीय भवितव्य जोरदार आपटू शकते, यात शंका नाही.

बिहारमध्ये यावेळी प्रथमच तेजस्वी यादव आणि चिराग पासवान हे आपापल्या पक्षांचा प्रमुख चेहरा म्हणून निवडणूक लढवित आहेत. दोघांकडेही पक्षाची पूर्ण सूत्र आहेत; आघाडी कोणाशी करायची, तिकीटवाटप कसे करायचे याचे निर्णय स्वतंत्रपणे घेण्याची संधी त्यांना मिळाली आहे. दोघांनीही आपापल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना व्यवस्थित बाजुलाही सारले आहे. आणखी एक साम्य म्हणजे दोघांना आपल्या पित्यांच्या राजकीय कारकिर्दीचा वारसा लाभला आहे. त्यामुळे बिहारमध्ये आजही त्यांची ओळख अनुक्रमे लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान या आपल्या पित्यांमुळेच आहे.

मात्र, बिहारच्या राजकारणात पाय रोवायचे असल्यास आता दोघांनाही वडिलांच्या वारशाच्या बाहेर येऊन स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे लागणार आहे. कारण या दोघांसमोर दिवसेंदिवस बिहारमध्ये सामर्थ्यवान होणाऱ्या भाजपाचे आव्हान आहे. त्यातही अमित शाहा बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जदयुचा नजिकच्या भविष्यात घास घेणार, हे नक्की. आणि एकदा तो घास घेतला की त्यांचे लक्ष जाणार ते चिराग आणि तेजस्वीकडे. आता जेथे नितीश कुमारांसारख्या सामर्थ्यवान नेत्याला अमित शाहा लक्ष्य करू शकतात, तर तुलनेने लहान मुलेच असलेल्या चिराग आणि तेजस्वी यांच्या राजकारणाला आळा घालणे हे त्यांना काहीच अवघड नाही. त्यामुळे बिहारमध्ये सत्ता नाही, पण किमान उपद्रवमूल्य शाबूत ठेवणे या दोघांसाठी अत्यंत गरजेचे झाले आहे.

लालूप्रसाद यादव यांनी यापूर्वी २०१५ साली आपल्या मुलाला २६ व्या वर्षी उपमुख्यमंत्रीपद मिळवून दिले होते. नितीश कुमारांना सेक्युलॅरिझमची मात्रा चाटवून लालू आणि काँग्रेसने महागठबंधनद्वारे सत्ता मिळविली. मात्र, आपण कोणत्या जाळ्यात अडकलो आहोत, याची नितीश कुमारांना जाणीव झाली आणि त्यांनी महागठबंधनचा कणा मोडून भाजपसोबत जाणे श्रेयस्कर मानले.

त्यामुळे आपल्या मुलाद्वारे बिहारमध्ये राजकारण करण्याचा लालूंचा प्रयत्न तेथेच संपुष्टात आला. मग लालूप्रसाद यादव यांच्या तुरुंगवासामुळे तेजस्वी यांच्याकडे राष्ट्रीय जनता दलाची सूत्रे आली. त्यांनी आतापर्यंत जरी पक्ष सांभाळला असला तरी खरी कसोटी निवडणुकीत असणार आहे. कारण लालूंप्रमाणे प्रत्येकाला धरून चालण्याची वृत्ती तेजस्वी यांच्याकडे नाही, त्यातच हेकेखोर स्वभावामुळे मित्रपक्षांसह पक्षातील अनेक ज्येष्ठ नेतेही त्यांच्यापासून दूर गेले आहेत, किंबहुना ते दूर जावे यासाठीच तेजस्वी कार्यरत होते.

दुसरीकडे रामविलास पासवान यांनीही अधिकृतपणे चिराग यांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवून लोकजनशक्ती पार्टीची धुरा त्यांच्या हाती २०१९ सालीच दिली होती. त्यानंतर आता चिराग पासवान यांनी आता नितीश कुमारांना आव्हान देऊन एनडीएपासून फारकत घेतली आहे. त्यातही त्यांना भाजपाची फूस असल्याची उघड चर्चा आहे. अर्थात, मुरब्बी राजकारणी असलेल्या नितीश कुमारांनाही ते माहिती असणार, यात शंका नाही.

मात्र, आता स्वबळावर निवडणूक लढवितांना चिराग यांची खरी कसोटी लागणार आहे. कारण रामविलास पासवान आता हयात नाहीत, त्यांच्याविषयी जनतेत सहानुभूती निश्तितच आहे. मात्र ची सहानुभूती परावर्तित होणार का, हे खुद्द चिरागही सांगू शकत नाहीत. कारण लोजपाचा जनाधार मुळातच मर्यादित आहे. त्यामुळे या तरुण नेत्यांना जीवाचे रान करून निवडणूक लढवावी लागणार आहे.

दोघांमधील आणखी एक साम्य म्हणजे राजकारण हे दोघांचेही प्राधान्य कधीच नव्हते. चिराग पासवान यांनाही अभिनयात रस होता, त्यामुळे रामविलास पासवान यांनीही आपल्या मुलाला ‘हिरो’ बनण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. त्यासाठी चिराग बराच काळ मुंबईत होते, २०११ ‘मिले ना मिले हम’ हा त्यांचा पहिला चित्रपटही आला होता, त्यामध्ये सध्या आक्रमकपणे बॉलिवूडला तडाखे देणारी कंगना रनौत अभिनेत्री म्हणून होती. मात्र, दुर्दैवाने तो चिराग यांच्या शेवटचाच चित्रपट ठरला. अखेर, रामविलास पासवान यांनी त्यांना राजकारणात येण्याचा आदेशच दिला होता.

तेजस्वी यादव यांचे क्रिकेटवर प्रेम, त्यामुळे त्यांना क्रिकेटपटूच व्हायचे होते. लालू यादव यांनीही त्यास प्रोत्साहन दिले. मग तेजस्वी दिल्लीकडून रणजी क्रिकेट खेळले, मात्र राष्ट्रीय संघात समावेश होण्याइतपत बरी कामगिरी काही त्यांना जमली नाही. त्यानंतर मग इंडियन प्रिमियर लीगमध्ये (आयपीएल) या ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाकडूनही २००८, २००९, २०११ आणि २०१२ साली नशिब आजमावून पाहिले. मात्र, त्यातही हवे तसे यश न मिळाल्याने अखेर त्यांनी वडिलांच्या सांगण्यावरून राजकारणाचा मार्ग चोखाळला.

बिहारच्या राजकारणात लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान यांनी आपले स्थान स्वत:च्या बळावर निर्माण केले होते. ज्या काळात देशात केवळ काँग्रेस हाच एकमेव राजकीय पक्ष बळकट होता, त्या काळात म्हणजे साधारणपणे साठच्या दशकात या नेत्यांनी विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रारंभ केला होता. नितीश कुमार आणि भाजपाचे सुशीलकुमार मोदी यांनीही त्याचवेळी राजकारणात प्रवेश केला होता. पुढे लालूप्रसाद यादव यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळविले, लालकृष्ण आडवाणींची राम रथयात्रा अडवून सेक्युलॅरिझमचा मुकूटही प्राप्त केला.

पुढे केंद्रातही मंत्रिपदे भुषविली. पासवान यांनीही राष्ट्रीय राजकारणात मोठी मजल मारली. पासवान तर व्ही. पी. सिंह ते नरेंद्र मोदी अशा सर्व पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात सहभागी होते. राष्ट्रीय राजकारणाचे हवामान अगदी व्यवस्थि जोखणाऱ्या पासवान यांना म्हणूनच ‘मौसम वैज्ञानिक’ म्हणून ओळखले जात होते. अर्थात, जनतेची नाडी ओळखण्यात वाकबगार असलेल्या या दोन्ही नेत्यांची पुढची पिढी मात्र तेवढी सामर्थ्यशाली आहे, असे आतापर्यंत तरी दिसलेले नाही. त्यामुळे जनता त्यांना स्विकारेल की नाही, याचा फैसला आता १० नोव्हेंबर रोजी होणार आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*