राणी कर्णावती : “शत्रूला दया नाही!”

  • नाक काटनेवाली रानी

शत्रूला दया दाखवून पुन्हा त्याला आक्रमणाची संधी देणारी सद्गुण विकृती राणी कर्णावतीने मोडून काढली. गढवालला मुघलांच्या आक्रमणातून मुक्त केले आणि “नाक काटनेवाली रानी” म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाली…!!


हिमालयाच्या रांगांनी सजलेल्या आणि महादेवाच्या उपासनेने पावन झालेल्या गढवाल भूमीचं तितक्याच समर्थपणे रक्षण करणारी अदम्य साहसी योद्धा म्हणजे राणी कर्णावती! गढवाल वर हल्ला करणार्‍या हजारो मुघल सैनिकांचं नाक कापून त्यांना परत पाठवत “नाक काटनेवली रानी” म्हणून इतिहास घडवणारी ही राणी! शत्रूला अभय देण्याचा शिरस्ता हिमतीने बदलून शत्रूवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही असा कडक संदेश देणारी राणी कर्णावती! राज्याच्या रक्षणासाठी जे जे म्हणून आवश्यक तोच धर्म असं मानणारी राणी! सगळी आक्रमणं परतवून राज्याच्या सीमा सुरक्षित करत एक कुशल प्रशासिका म्हणून गढवाल भूमीला समृद्ध करणारी माता राणी कर्णावती!

गाढवालचा शूर राजा महिपत शहा १६३१ साली एका लढाईत मारला गेला. पतीच्या अशा जाण्याने खचून न जाता राणी कर्णावतीने लगेच आपला अवघा ७ वर्षांचा मुलगा पृथ्वीपत शहा याला गादीवर बसवून राज्यकारभार स्वत:च्या हाती घेतला. माधव सिंह भंडारी, रिखोला लोदी आणि बनवारी दास या निष्ठावान त्रिकुटाने दूरदर्शी आणि धाडसी राणीला हर प्रकारे साथ दिली आणि प्रत्येक आक्रमणावर मात करत विजयश्री खेचून आणली. महापराक्रमी आणि साहसी सेनापती माधव सिंह भंडारी जो आधी महिपत राजाचाही ऊजवा हात होता, तिबेटींशी लढतांना १६४० मधे धारातीर्थी पडला. मोठीच हानी होती ही!त्यानंतर राणीने तिच्या तोफखान्याचा प्रमुख “दोस्त बेग” याला हेरून नवीन सेनापती म्हणून नियुक्त केलं. या परिस्थितीचा फायदा मुघलांनी न घेतला तरच नवल! शहाजहानने नजिबत खानच्या नेतृत्त्वाखाली ३०,००० मुघल सैन्य गढवालची राजधानी श्रीनगरच्या दिशेने रवाना केलं. सिंहासनावर बसलेला एक ७ वर्षांचा राजा आपल्याला अशी काय हानी पोचवणार म्हणून गढवाल हडपण्याच्या खात्रीने हा हल्ला झाला होता!

राणी कर्णावतीला गुप्तचरांद्वांरे हा सुगावा लागताच राणी सज्ज झाली. मुघल सैनिक भरपूर शस्त्रास्त्रांनी युक्त असूनही त्यांना उंच डोंगरी भागांत लढण्याचा अनुभव नव्हता, ज्याला युद्धाच्या आधुनिक भाषेत गोरीला वॉरफेअर म्हणतात. परिणामी मुघलांची पिछेहाट झाली. तरी राणी कर्णावती अस्वस्थ होती.पृथ्वीराजाने अभय दिलेला घौरी असेल किंवा आसामचा उदार राजा पृथू याने अभय दिल्याने तिथेच वसणारे शत्रू असतील , याची पुढे खूप मोठी किंमत राजांना मोजावी लागली. म्हणून शत्रूला अभय देण्याचं सोडाच पण पुन्हा असा हल्ला होऊ नये यासाठी कठोरतम पाऊल उचललं पाहिजे आशा निश्चयाने तिने मुघल सेनापतीसह वाचलेल्या सगळ्या सैनिकांचं नाक कापून “जर आम्ही यांचं नाक कापू शकतो तर मानही उडवू शकतो ” असा संदेश देत त्यांना परत पाठवलं. त्यांनी परत जाऊन राणी बरोबरचा युद्धाचा हा थरार शहाजहान ला वर्णन केला! नजिबत खानची चांगलीच बदनामी झाली. आजूबाजूच्या राज्यांमध्ये आणि शत्रू सैन्यामधे या “नाक काटनेवाली रानी” चा प्रचंड दबदबा निर्माण झाला ज्याचा परिणाम म्हणून परत कोणीही गढवाल वर डोळे वर करून बघण्याची हिम्मत केली नाही. राणीच्या या कठोर शासनाची मुघल इतिहासात सुद्धा नोंद केली गेली.

गढवाल प्रदेश राणीची निष्ठा, दूरदृष्टी आणि शौर्याचा साक्षी होताच पण पुढे त्यांनी तिच्यातला एक कुशल प्रशासकही अनुभवला! जलशक्तीवर चालणारे अनेक प्रकल्प तिने त्याकाळी उभारले. पहाडावरून खाली येणार्‍या पाण्याचा उपयोग शेतीसाठी व्हावा यासाठी जलसंधारणाच्या आधुनिक व्यवस्था सुरू केल्या. महत्वाचा उल्लेख म्हणजे आत्ताच्या देहरादून आणि आजूबाजूच्या प्रदेशांमधला जुना राजपूर कालवा राणीने बांधला ज्याद्वारे रिस्पना नदीपासून आत्ताच्या देहरादून शहरांत पाणी आणलं गेलं. पुढे राणीने मुलगा पृथ्वीपत यांकडे राज्य सोपवलं आणि राज्यांत उत्तम प्रशासन, बळकट सैन्य आणि प्रभावी न्यायव्यवस्था टिकून राहावी यासाठी मोठं योगदान दिलं. अशा वीरांमुळेच कदाचित आजचे चारीधाम सुरक्षित राहिले!
राणीच्या या अतुलनीय शौर्यासाठी गढवाल आणि संपूर्ण भारतच तिचं सदैव स्मरण करत राहील!नवरात्रीच्या निमित्ताने या रणरागिणीला मानवंदना!

(सौजन्य : फेसबूक)

mohinigarge.blogspot.com

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*