मजबुरीचे रूपांतर पश्चातापात आणि पश्चातापाचे रूपांतर प्रायश्चित्तात झाले तर महाराष्ट्रासाठी फार बरे होईल!!

महाराष्ट्राचे राजकीय वातावरण सध्या एवढे तापले आहे, की दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांना एकत्र येऊन राज्यात पुन्हा एकदा सत्ताबदल बदल घडवून आणणे शक्य आहे. सव्वा वर्ष अलग झालो, हा राजकीय अपवाद होता, हे सिध्द करण्यासाठी हिंदुत्ववादी पक्षांना संधी आली आहे. महाराष्ट्राला जीर्ण काँग्रेसी राजकारणाच्या सरंमजामशाहीतून कायमचे बाहेर काढण्यासाठी दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांनी एकमेकांना पुरेसा प्रतिसाद दिला पाहिजे… राजकारणात आपापल्या वाट्यासाठी भांडत राहूनही हे शक्य आहे. पण त्यांनी ते करून दाखविले पाहिजे. BJP – shiv sena has a chance once again to come together for recapturing power in maharashtra!!


बरे झाले… संजय राऊत खरे बोलून गेले… महाविकास आघाडी ही शिवसेनेची मजबूरी होती, असे मराठी संजय राऊत हिंदी दैनिक भास्करच्या मुलाखतीत सांगून गेले…  पण त्याचवेळी ते महायुती तुटल्याचे आणि सरकार गमावल्याचे खापर भाजपवरही फोडून गेलेत… कदाचित खरेही असेल, त्यांचे… युती तोडायला आणि मोडायला एक भाजप नेतेच पुढे आले होते… हे खरेच आहे… पण आज तेच भाजपचे नेते आता भाजपच्या नेतृत्वावर आगपाखड करून राष्ट्रवादीच्या तंबूत गेले आहेत.

पण संजय राऊतांच्या वक्तव्याचा रोख त्यांच्यावर नाहीए, त्यांचा रोख अर्थात मोदी – शहा – फडणवीसांवर आहे… आणि तो खराही असेल, कदाचित… कारण या नेत्यांनी २०१४ ते २०१९ या पाच वर्षांमध्ये शिवसेना नेतृत्त्वाला असे चेपून घेतले होते की ज्याचे नाव ते… पण त्याचवेळी शिवसेना नेतृत्त्वाने आपल्या कृतीतून आणि संजय राऊतांनी सामनातल्या रोखठोक लेखातून, उघडा डोळे… बघा नीट मुलाखतींमधून नव्हते, का भाजपवर वार करून घेतले… ते संजय राऊत नाही, बोलले मुलाखतीत… कारण ते त्यांच्या सोयीचे नव्हते ना…

हरकत नाही… देर आये दुरूस्त आये… संजय राऊतांनी शेवटी का होईना खरे सांगूनही टाकले आहे… महाविकास आघाडी ही शिवसेनेची मजबूरी आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही… आणि भाजपने ही वेळ त्यांच्यावर आणली आहे… हो पण भाजपने ही वेळ का आणली त्यांच्यावर… वेळ कशी आणू शकले भाजपचे नेते त्यांच्यावर… आधी शिवसेनेच्या नेत्यांनी उत्मात केला होताच ना… भाजपला बाळासाहेब ठाकरे कमळाबाई म्हणून चिडवायचे… युतीत २५ वर्षे सडली असे उध्दव ठाकरे म्हणाले होतो… ते कसे विसरतील भाजपचे नेते…!!मोदींच्या नेत़ृत्वाखाली विस्तार केला भाजपने आपल्या यशाचा. ते सलग दोनदा १०० पेक्षा जास्त जागा मिळविणारा पक्ष बनले… हे राजकीय कर्तृत्व शिवसेनेच्या नेतृत्वाला का नाही दाखविता आले…??

आणि आता महाविकास आघाडी ही शिवसेनेची मजबूरी आहे, असे संजय राऊत म्हणाताहेत.. हे त्यांचे विधान खरे मानायचे का…?? कारण त्या विधानावर “सिल्वर ओकची सावली” नसेल कशावरून…?? की अँटिलिया स्फोटके प्रकरण “सिल्वर ओक” लावून धरतेय… म्हणून संजय राऊतांना शिवसेनेची मजबूरी आठवली… भाजपशी युती तोडली… युतीत २५ वर्षे सडली वगैरे ठीक आहे… पण “सिल्वर ओक”च्या दारात शिवसेनेला घेऊन जायला भाजपने नव्हते सांगितले संजय राऊतांना… संजय राऊत स्वतःच घेऊन गेलेत ना… मातोश्रीच्या नेतृत्वाला “सिल्वर ओकच्या” दारात…

आता “सिल्वर ओकने” अँटिलिया स्फोटके केस, सचिन वाझे – मनसुख हिरेन केस मुख्य प्रकरण आहे, असे म्हटल्यावर जाग आली संजय राऊतांना… “सिल्वर ओक”चे राजकारण कसे आहे… मित्रांना ते कसे वागवतात आणि वाकवतात हे माहिती नव्हते का संजय राऊतांना…?? “सिल्वर ओक”चा कुठला मित्र दीर्घकाळपर्यंत विश्वासघात होण्यापासून बचावला आहे, याची कल्पना नाही का राऊतांना…?? त्यांचे गुरू बाळासाहेब ठाकरेंनी “सिल्वर ओक”शी व्यैयक्तिक मैत्री राखली होती… पण राजकीय मैत्री कधीच केली नव्हती… याची कारणे नव्हती का माहिती संजय राऊतांना…?? पण तरीही राऊत गेलेच ना “सिल्वर ओक”च्या दारात मातोश्रीतील नेतृत्वाला घेऊन…!!

आणि आता वर्ष – सव्वा वर्षातच त्यांना अनुभव आलाय… मजबूरीचा… शिवसेनेने हिंदुत्व सोडले नाहीए असे म्हणाताहेत राऊत… पण मग राऊतांच्या या मजबूरीचे रूपांतर होणार आहे का पश्चातापात…??… आणि नजीकच्या भविष्यात त्या पश्चात्तापाचे रूपांतर होणार आहे का प्रायश्चित्तात…?? तसे झाले तर खरेच बरे होईल… सगळ्यांच्या दृष्टीने शिवसेनेच्या आणि भाजपच्याही दृष्टीने…!!

“सिल्वर ओक”च्या नादी लागून शिवसेनेचा होणारा संभाव्य ऱ्हास थांबेल… भाजपबरोबर गेल्यास सत्तेचा वाटा मिळेल… शिवाय वारंवार हिंदुत्व सोडले नसल्याची खात्री द्यावी लागणार नाही शिवसेनेला… आत्ताच्या टर्निंग पॉइंटला भाजपपेक्षा शिवसेनेला गरज अधिक आहे… आणि सव्वा वर्षापूर्वी अनावश्यक ताठरपणा दाखवून मातोश्रीतील शिवसेना नेतृत्वाने ती गरज मजबूरीच्या रूपाने ओढवून घेतली आहे. राऊतांच्या तोंडच्या मजबूरीच्या भाषेचा “गरज” असाही अर्थ आहे.

अर्थात यात भाजपचाही फायदा आहेच… मोदी – शहांच्या काळात भाजपला मित्र पक्ष सोडून जातात हा ठपका भाजपला दूर करता येईल. मोदी – शहा कितीही मोठे नेते असले, तरी एकहाती राजकीय यश त्यांना कायमचे मिळवत राहणे शक्य नाही. त्यामुळे जुन्या मित्र पक्षाला राजकीय तडजोड करून जवळ करायला काहीच हरकत नाही. तसाही विचारसरणीच्या आधारावर शिवसेना हा देशातला एकमेव पक्ष भाजपचा मित्र पक्ष होता… सत्तेच्या व्यवहारापायी तो भाजपपासून दूर गेला हे जितके खरे आहे… तसेच मोदी – शहांच्या भाजपने त्याला दूर लोटले हेही तितकेच खरे आहे.

शिवसेना – भाजप एकमेकांवर सर्वशक्तीनिशी तुटून पडणे हे दोन्ही काँग्रेस पक्षांना हवेच आहे कारण त्यांच्या भांडणातच दोन्ही काँग्रेस पक्षांचे पुनरूज्जीवन आहे. हे काँग्रेसी नेते जाणतात. ते लाख कागाळ्या लावतील, दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये… पण हिंदुत्ववादी नेतृत्वाला कळायला पाहिजे ना त्यांचा डाव आणि कट – कारस्थाने…

शिवसेना आणि भाजप या दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांनी एकमेकांशी भांडून एकमेकांची पोलिटिकल स्पेस खाण्यापेक्षा त्यांनी दोन्ही काँग्रेस पक्षांची पोलिटिकल स्पेस पोखरली पाहिजे. अनेक राज्यांमध्ये भाजपने हा प्रयोग यशस्वी केला आहे. बंगालमध्ये याच प्रयोगाला लोकसभा २०१९ निवडणूकीत यश आले आहे… याच प्रयोगाचे विधानसभा निवडणूकीतील यश २ मे २०२१ रोजी दिसणार आहे… तोच प्रयोग महाराष्ट्रात केला, तर भाजप – शिवसेनेला दीर्घकालीन यश दूर नाही… पण मोदी – शहांच्या भाजपने आणि मातोश्रीने ते समजून घेतले पाहिजे…

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत आमूलाग्र बदलासाठी हे आवश्यक आहे. महाराष्ट्राला जीर्ण काँग्रेसी राजकारणाच्या सरंमजामशाहीतून कायमचे बाहेर काढण्यासाठी दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांनी एकमेकांना पुरेसा प्रतिसाद दिला पाहिजे… राजकारणात आपापल्या वाट्यासाठी भांडत राहूनही हे शक्य आहे. आणि ते त्यांनी करून दाखविले पाहिजे.

मग सिल्वर ओक काही का करेना… त्यांच्या भवितव्याची चिंता त्यांच्यावरच सोडावी. मोराला दाणे खाऊ घालणाऱ्यांनी त्याची चिंता करू नये…!!

BJP – shiv sena has a chance once again to come together for recapturing power in maharashtra!!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*