पोर झाले दुसऱ्याच्या घरात, हे खाताहेत आनंदाच्या घुगऱ्या!!

अमेरिकेतल्या बायडेन – हँरीस विजयाच्या आनंदाची उकळी इकडे डाव्या – लिबरल्सना फुटली आहे. आपल्याला जे करावेसे वाटते पण जमत नाही, ते दुसऱ्याने केले की आनंद होतो. पण हे पोर दुसऱ्याच्या घरात झाले तर आपण आनंदने घुगऱ्या खाण्यासारखे आहे. डावे – लिबरल्स सध्या तेच करत आहेत. २०२० मध्ये अमेरिकेत घडले ते २०२४ मध्ये भारतात घडण्याची वाट पाहात “बौद्धिक पारावर” बसले आहेत. biden-victory-news


तिकडे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पराभूत झाल्याने आपल्याकडे लिबरल – डाव्यांना कालपासून आनंदाची उकळी फुटली आहे. काल बायडेन विजयाचा आनंद साजरा करून झाला. पण आनंदांच्या उकळीला काही मर्यादा राहिलेली नाही. काल राष्ट्रवादीने बायडेनच्या विजयावर शरद पवारांना सुभेदार बनवले. आज डाव्या – लिबरल्सनी त्याच्या पुढची पायरी गाठत अग्रलेखांमधून वेगवेगळे बौद्धिक तारे तोडले आहेत. त्यालाही मर्यादा उरलेली नाही. त्यातच जगातल्या सगळ्या जगाची बौद्धिक मक्तेदारी आपल्याकडेच आहे, असा समाज झालेल्या संपादकांनी सुतावरून स्वर्ग गाठत २०२४ च्या पराभवाचे बंगले आपल्या बौद्धिक हवेत बांधायला सुरवात केली आहे. मान्य… एकदाम मान्य विजयाला हजार नवरे असतात आणि पराभूताच्या भाळी वैधव्य. पण म्हणून अमेरिकेतल्या विजयाचा एवढा आनंद भारतातल्या डाव्या लिबरल्सना होणे हे म्हणजे पोर दुसऱ्याच्या घरात झाल्यावर आपण स्वखर्चाने गावात घुगऱ्या वाटण्यासारखा आहे. biden-victory-news

तिकडे ज्यो बायडेन – कमला हँरीस यांच्या विजयाची आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाची लाख कारणे आहेत. त्याचे बौद्धिक आंबोण बरेच दिवस चघळले जाईल. पण त्यावरून भारतात मोदींना आणि त्यांच्या उजव्या टीमला चिडवून आणि डिवचून घेण्याचे जे उद्योग चाललेत ना… ते खुळचट आणि हास्यास्पद वाटायला लागलेत. काय आर्ग्युमेंटस् आहेत त्यांची?, म्हणे, बायडेन जिंकल्याने तिकडे अमेरिकेत मानवता, लोकशाही मूल्य, सहिष्णुता दुसऱ्यांच्या मतांचा आदर करणारी प्रवृत्ती जिंकली. ट्रम्प यांच्या पराभवाने हुकूमशाही, एककल्ली मनोवृत्ती पराभूत झाली….. आता या पराभवाची “मोठ्ठी सावली” भारतात पडून २०२४ मध्ये भारतातल्याही तशाच प्रवृत्तीचा पराभव होईल, म्हणे…!!

व्वा रे… आर्ग्युमेंट… यालाच म्हणतात… हवेतल्या हवेत बौद्धिक बंगले बांधणे…!! किंवा दुसऱ्याच्या घरात पोर झाल्यावर घुगऱ्या स्वतःच गावभर वाटणे. २०२० ते २०२४ अजून तब्बल साडेतीन वर्षे बाकी आहेत. बरेच पाणी बऱ्याच ठिकाणांहून वाहून जायचे आहे. दोन देशांमधल्या परिस्थिती, लोकसंख्या, नेतृत्वाचे स्वरूप पूर्णतः भिन्न आहे…. डाव्या – लिबरल्सनी कितीही ट्रम्प – मोदी जोड्या लावण्याचा एका मार्काचा प्रश्न सोडवला तरी त्याचे उत्तर चुकीचे आहे. कारण दोन्ही व्यक्तींची मूलभूत व्यक्तिमत्त्वे भिन्न आहेत. त्यांचा बादरायण संबंध डाव्या – लिबरल्सनी लावण्याचा प्रयत्न केला तरी तो सगळ्या भारतीयांना निरपवादपणे मान्य होणारा नाही. त्यामुळे देखील बायडेन विजयाच्या आनंदाच्या उकळ्या फुटायला हरकत नाही. पण त्यालाही मर्यादा हव्यात, हे नक्की…!!

डाव्या – लिबरल्सचे आणखी एक आर्ग्युमेंट आहे, ते तर आणखी विनोदी आहे. म्हणे, बायडेन – हँरीस जोडीचे राज्य आले की अमेरिकेच्या भारत विषयक परराष्ट्र धोरणात मोठा बदल होईल. कारण बायडेन – हँरीस यांची काश्मीर, मानवाधिकार, अणुकरार, भारतातील धार्मिक स्वातंत्र्य या विषयांवरील मते वेगळी आहेत. त्याचा परिणाम म्हणून ते भारताचे विशेषतः मोदी सरकारचे महत्त्व कमी करतील… वगैरे, वगैरे… आणि काही विदतमन्य तर हाऊडी मोदी, नमस्ते ट्रम्प यांच्यासारखे कार्यक्रम मुत्सद्देगिरी कशी नसावी याची पश्चातबुद्धीने प्रवचनेही झोडत आहेत. याच्या एवढा तर बौद्धिक खुळचटपणा दुसरा नाही.

biden-victory-news

एकतर अमेरिकेची धोरणे एका अध्यक्ष – उपाध्यक्ष निवडणुकीनुसार हेलकावे खात नाही. त्यांची धोरणे दीर्घकालीन, फक्त आणि फक्त स्वहित जपणारी असतात. यात इतर देशांचा ते अपवादानेच विचार करतात. मानवाधिकार, अँम्नेस्टी इंटरनँशनल, धार्मिक स्वातंत्र्य या त्यांच्यासाठी बोलायच्या, फारतर दुसऱ्या देशाविषयीचे पर्सेप्शन तयार करायच्या गोष्टी असतात. या पेक्षा त्यांना अधिक महत्त्व नाही. अमेरिकेची सगळी धोरणे संरक्षण, व्यापार आणि जागतिक वर्चस्ववाद या तीन खांबांवर मजबूतीने उभी असतात. “त्यात भारत कुठे बसतो” याचा विचार करूनच बायडेन – हँरीस हे भारत विषयक धोरण ठरवतील हे उघड आहे आणि भारताचे सध्याचे आंतरराष्ट्रीय स्थान, चीनचे आ वासून उभे असलेले आव्हान, चीनविरोधात भारताची असलेली उपयुक्तता आणि अमेरिका – भारत स्ट्रँटेजिक पार्टनरशीप या बाबी लक्षात घेतल्या तर बायडेन – हँरीस प्रशासनाच्या भारत विषयक धोरणामध्ये आधीच्या धोरणापेक्षा फारसा बदल संभवत नाही.
पण हे आनंदाची उकळी फुटणाऱ्यांना सांगणार कोण आणि सांगितले तरी पटणार आणि पचणार कोणाला?, कारण सगळ्या जगाची बौद्धिक मक्तेदारी स्वीकारलेले ते स्वनामधन्य लोक आहेत ना…!!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*