जमणार सगळे महत्वाकांक्षी; घसरून पडणार दिल्लीपाशी!!… सावधान, हा इतिहास आहे!!


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या राजकीय दृष्ट्या बलाढ्य भाजपला हरविण्यासाठी आता काँग्रेस पक्ष पुरा पडत नाही हे पाहिल्यानंतर विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक महाभक्कम आघाडी उभी करण्याचा मनसूबा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आखला आहे आणि मुख्य म्हणजे त्याला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची देखील साथ मिळाली आहे.All will be ambitious; It will fall near Delhi

आता पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू यांच्यासारख्या दोन मोठ्या राज्यांचे मुख्यमंत्री एकत्र येणार आहेत, म्हटल्यानंतर बाकीच्या राज्यांचे मुख्यमंत्री तरी कसे मागे राहतील? त्यामुळे तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील पुढे सरसावले आहेत. अनौपचारिकरीत्या ममता बॅनर्जी स्वतः या मुख्यमंत्र्यांच्या महाभक्कम आघाडीच्या अघोषित नेत्या आहेत, तर एम. के. स्टॅलिन हे जॉर्ज फर्नांडिस यांच्या भूमिकेतले समन्वयक दिसत आहेत. संपूर्ण देशातल्या भाजप विरोधी आघाडी मुख्यमंत्र्यांची आघाडी करण्याचा करण्याची या चार मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षा आहे.

लवकरच भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांची एक परिषद दिल्लीत घेण्याची घोषणा स्टॅलिन यांनी ट्विटर द्वारे केली आहे. याखेरीज चंद्रशेखर राव हे मुंबई देऊन उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत, तर ममता बॅनर्जी या हैदराबाद मध्ये जाऊन चंद्रशेखर राव यांना भेटून डोसा खाणार आहेत. हे स्वत: स्टॅलिन यांनी ट्विट करून जाहीर केले आहे.

हरकत नाही… अशी महत्त्वाकांक्षा आतापर्यंत अनेकांन बड्या नेत्यांनी दाखवली आहे. भारताच्या राजकीय इतिहासात अशा महत्त्वाकांक्षांच्या अनेक लाटा आल्या आणि गेल्या आहेत…!!

– सीमाप्रश्नी “आघाडी”

पण ममता बॅनर्जी यांच्या महत्त्वाकांक्षेच्या निमित्ताने सहज जुन्या दोन आठवणी जाग्या झाल्या. अशीच एक “आघाडी” एका विशिष्ट प्रश्नासाठी चर्चा करायला उभी राहिली होती. यात त्यावेळचे पंतप्रधान दस्तुरखुद्द पंडित जवाहरलाल नेहरू होते. गृहमंत्री लालबहादूर शास्त्री होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री निजलिंगप्पा होते. हे सर्वजण एकमेकांशी महाराष्ट्राच्या सीमा प्रश्नावर चर्चा करत होते. महत्त्वाचे म्हणजे ही एकपक्षीय म्हणजे काँग्रेसपक्षीयच “आघाडी” होती. त्यामुळे शास्त्री नेहरूंना भेटले. नेहरू चव्हाणांना भेटले. चव्हाण निजलिंगप्पांना भेटले. निजलिंगप्पा नेहरूंना भेटले… आणि सगळे मिळून ओरडत सुटले, “प्रश्न सुटत नाही हो…!!”, असे व्यंगचित्र 1960 च्या दशकात त्यावेळचे प्रख्यात व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांनी आपल्या सुप्रसिद्ध “मार्मिक” साप्ताहिकात काढले होते. नेहरूंपासून यशवंतरावां पर्यंतच्या दिग्गज नेत्यांना एकत्र येऊन साधा सीमा प्रश्न सोडवता आला नव्हता, यावरचे ते मार्मिक भाष्य होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या मते हा त्या आघाडीचा “राजकीय रिझल्ट” होता…!!


पहिल्या “आघाडी”चे बाळासाहेब ठाकरे यांनी “मार्मिक”मध्ये काढलेले हे व्यंगचित्र. (सौजन्य : फटकारे)


– दुसरी आघाडी अर्स काँग्रेस!!

आता दुसरी आघाडी… कर्नाटकचे एक दिग्गज नेते आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री देवराज अर्स यांनीही अशीच “महाआघाडी” उभी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये त्यांना यशवंतराव चव्हाण, कासू ब्रह्मानंद रेड्डी या एकेकाळच्या इंदिरा गांधींच्या महत्त्वाचा सहकारी मंत्र्यांची साथ लाभली होती. त्यांच्याबरोबर ओरिसाचे मुख्यमंत्री बिजू पटनाईक देखील सहभागी झाले होते. एम. करुणानिधी, रामकृष्ण हेगडे, गुजरातचे चिमणाभाई पटेल आदी बड्या नेत्यांचा त्यांना “आतून आणि बाहेरून” पाठिंबा होता. 1980 ची लोकसभेची मध्यावधी निवडणूक जणू ही “महाआघाडी” जिंकणारच, असे वातावरण तयार करण्यात आले होते…!! पण निकाल लागला. इंदिराजी पुन्हा जबरदस्त कमबॅक करत सत्तेवर आल्या आणि अर्स काँग्रेसची वाताहत झाली. यशवंतराव चव्हाण यांना पुन्हा “काँग्रेसशरण” व्हावे लागले. कासू ब्रह्मानंद रेड्डी राजकारणातून बाहेर पडले. देवराज अर्स पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. बिजू पटनाईक थोडाकाळ तरले. नंतर ते मुकाटपणे भाजपशी हातमिळवणी करून मोकळे झाले.

या दोन राजकीय आठवणी सांगण्याचे कारण असे की आत्तापर्यंत विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारला टक्कर देण्याचे असे अनेक प्रयत्न झाले आहेत. त्यात आपापल्या राज्यापुरते मुख्यमंत्र्यांना यशही आले आहे. पण राज्यापलिकडे जाऊन फार मोठे आव्हान करण्यात निर्माण करण्याचे ते फारसे यशस्वी ठरलेले दिसत नाहीत.

– एन. टी रामारावांची तिसरी आघाडी

एन. टी. रामाराव यांनी 1985 ते 1990 या कालावधीत राजीव गांधींशी याच पद्धतीशी टक्कर घेण्याचा प्रयत्न केला होता. एम. करुणानिधी यांची त्यांना साथ मिळाली होती. रामकृष्ण हेगडे, एच. डी. देवेगौडा हे त्यांच्या बरोबर होते आणि सुरुवातीच्या काळात शरद पवार हे देखील राजीव गांधी विरोधी गटात एन. टी. रामाराव यांना सामील झाले होते. पण 1986 साली शरद पवार समाजवादी काँग्रेस गुंडाळून काँग्रेसमध्ये परत गेले. महाराष्ट्रात काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले. एनटीआर यांना फारसे यश मिळाले नाही. पण 1987 मध्ये बोफोर्स प्रकरण बाहेर काढल्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंग, चौधरी देवीलाल यांचे नेतृत्व पुढे आले. त्यानंतर रामाराव यांना आंध्रमध्येच “बंदिस्त” व्हावे लागले होते. जनमोर्चा नावाच्या आघाडीत त्यांचा तेलुगू देशम पक्ष सहभागी जरूर झाला होता. परंतु एन. टी. रामाराव यांचे “अनेक नेत्यांपैकी एक मोठे नेते” असेच राजकीय स्टेटस यात उरले होते.

– ममतांचे नेतृत्व सगळे मुख्यमंत्री स्वीकारतील?

आता ममता बॅनर्जी या एम. के. स्टॅलिन, केसीआर चंद्रशेखर राव, उद्धव ठाकरे यांच्यासह एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मोठी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु यामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री सामील होणार का…??, ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक सहभागी होणार का…??, पूर्वेकडील छोट्या राज्यांमधील मुख्यमंत्री या आघाडीला कसा प्रतिसाद देणार…??, या विषयीची प्रश्नचिन्हे ठळक आहेत.

शिवाय “राजकीय स्थिरता” नावाचा घटक मुख्यमंत्र्यांच्या आघाडीला नेहमीच त्रासदायक ठरला आहे. तो काँग्रेसच्या प्रबळ राजवटीच्या वेळेस होता. आज भाजपची प्रबळ राजवट आहे, तेव्हाही तो कायम आहे. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री आहेत हे खरे. पण महाविकास आघाडीचे सरकार टिकले तर ते मुख्यमंत्री आहेत… अन्यथा त्यांचे राजकीय स्टेटस काय राहील??, हे ही प्रश्नचिन्ह ठळक आहे…!! दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीचे सरकार गडगडले तर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपकडे जाणार नाहीत, याची खात्री ममता बॅनर्जी, स्टॅलिन किंवा चंद्रशेखर राव हे देऊ शकतात का…?? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे…!!

त्यामुळे 2024 ची निवडणुक यायला अजून दोन वर्षे बाकी असताना, “जमणार सगळे महत्त्वाकांक्षी; घसरुन पडणार दिल्लीपाशी!!”, अशी अवस्था यायला नको म्हणजे मिळवलीन…!!

All will be ambitious; It will fall near Delhi

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात