मोदींचे “इंदिरा गांधीकरण” आणि पत्रवाचनाचा वावदूक सल्ला


विनय झोडगे

देशावर कोरोनाचे संकट घोंगावत असताना मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाची वर्षपूर्ती आज आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दैवतीकरण किंबहुना “इंदिरा गांधीकरण” करण्याचा चांगला मुहूर्त भाजपच्या नेत्यांनी शोधून काढलाय…!! खरंतर भाजपने या वर्षपूर्तीचा मोठा इव्हेंटच केला असता पण कोरोना आडवा आला. हरकत नाही. भाजपचे नेते आता virtual event साजरा करताहेत. मोदींवर स्तुतीसुमने उधळण्याची चढाओढ लागलीय. पण या सर्व प्रकारात history repeats असा प्रकार घडतोय हे कुणाच्या लक्षातही येत नाही. भाजपचे वरिष्ठ नेते मोदींचे सध्या दैवतीकरणापलिकडले “इंदिरा गांधीकरण” करताहेत.

अर्थात हे कुणी सामान्य नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी केले असते तर वेगळे वाटायचे कारण नव्हते. कारण आपल्याकडे नेत्याच्या दैवतीकरणाची घातक रूढी पडून गेली आहे.

पण राजनाथ सिंह आणि शिवराजसिंह चौहान यांच्या सारखे वरिष्ठ नेते स्तुतीसुमने उधळण्याच्या चढाओढीत भाग घेतात त्यावेळी इंदिरा गांधींची आणि त्यावेळच्या काँग्रेस नेत्यांची आठवण आल्याशिवाय राहात नाही. काय म्हणाले होते, काँग्रेसचे अध्यक्ष देवकांत बारूआ तेव्हा?, “Indira is India and India is Indira”, आता काँग्रेस अध्यक्षच असे म्हणताहेत हे दिसल्यावर काँग्रेसजनांमध्ये इंदिरास्तुतीची चढाओढ लागली होती. कोणी त्यांना “इंदिरा माता”, “राष्ट्र माता” असेही संबोधले होते. पण त्यावेळी केवढा गदारोळ केला होता, आजच्या भाजप नेत्यांच्या राजकीय पूर्वजांनी आणि बाकीच्या विरोधी पक्षनेत्यांनी…!! अर्थात बरोबरच होते त्यांचे. पंतप्रधान इंदिरा गांधी या कितीही कर्तृत्ववान असल्या तरी त्यांना एकदम राष्ट्रमातेचा दर्जा द्यायचा…?? त्यांची प्रतिमा प्रतिष्ठा एकदम भारतमातेशी जोडायची? चूकच होते ते. विरोधक त्यांच्या क्षीण आवाजात का होईना त्यावेळी तुटून पडले होते काँग्रेसवर आणि इंदिरा मूर्तीपूजकांवर…

पण मग आजचे काय? आज मोदी समर्थकांचे काय चालले आहे? त्याही पेक्षा राजनाथ, शिवराज सिंह यांच्या सारख्या वरिष्ठ नेत्यांचे काँग्रेसवाल्यांपेक्षा वेगळे काय चालले आहे? शिवराज सिंग चौहान यांनी म्हणे उलगडला MODIआडनावाचा अर्थ…

ते म्हणतात, मोदी हे आडनावच नाही तर तो एक मंत्र आहे… M म्हणजे Motivational, O म्हणजे Opportunity, D म्हणजे Dynamic Leadership आणि I म्हणजे Inspire India, आत्तापर्यंत त्यांनी जे काम पंतप्रधान म्हणून केलं आहे, ते आदर्शवत आहे…!! व्वा. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची केवढी ही प्रतिभा, मोदी आडनावाचा अर्थ उलगडून दाखविणारी…!!

आणि राजनाथ सिंह काय म्हणतात, “करोना संकटकाळात मोदी पंतप्रधान हे भारताचे सुदैव आहे. देशवासीय सुदैवी आहेत करोनाच्या संकटावर मात करु शकणारा नेता आज आपल्याजवळ आहे. पंतप्रधान मोदींनी योग्य विचारांनी वेळीच निर्णय घेतला नसता, तर परिस्थिती खूप वाईट असती. अमेरिकेत करोना व्हायरसमुळे काय स्थिती आहे ते आपण पाहू शकतो. लॉकडाउनचा निर्णय धाडसी होता आणि तो योग्य वेळी घेण्यात आला.” हरकत नाही मोदींची स्तुती करायला. पण एवढी? की सगळा देश “सुदैवी” आहे, असे म्हणायचे? हे म्हणण्यासारखी स्थिती आहे आज भारतात? सगळ्या समस्या मिटल्या भारताच्या मोदीरूपी नेतृत्व मिळाल्याने?… नाही मिटलेल्या. खुद्द मोदींचेही तसे मत नाही. त्यांनी जनतेला लिहिलेल्या पत्रात सरकारची कामगिरी वर्णन केली आहे. पण कुठेही आत्मस्तुतीचा वास नाहीए पत्रात. मग शिवराज सिंह आणि राजनाथ सिंह यांच्या सारखे नेते का एवढी मर्यादा ओलांडून स्तुतीसुमने उधळताहेत मोदींवर? गरज नाहीए त्याची.

अशी स्तुतीसुमने मोदींवर उधळणाऱ्यांमध्ये आणि गांधी घराण्यावर स्तुतीसुमने उधळणाऱ्यांमध्ये मग फरक तो काय राहिला? अशा अतिरेकी स्तुतीमुळे मोदींची प्रतिमाबांधणी होण्यापेक्षा प्रतिमाभंजन होते, हे समजत नाही का भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना? आधीच तथाकथित लिबरल्स मोदींच्या समर्थकांना “भक्त” म्हणून हिणवतात. त्याला राजनाथ आणि शिवराज सिंहांसारखे नेते खतपाणी का घालताहेत? कोणाचीही अतिरेकी स्तुती आणि अतिरेकी निंदा या गोष्टी संबंधित व्यक्तीचे खरे contribution नाकारतात. त्याला दैवतीकरणाच्या चौकटीत अडकवून चिकित्सा टाळतात. पण यातून त्या व्यक्तिमत्वाची आणि त्याच बरोबर देशाचीही हानी होत असते, हे स्तुतीपाठक आणि निंदा करणारे विसरतात. काँग्रेसजनांनी इंदिरा गांधीचे “तसे” केले. भाजपवाले मोदींचे “असेच” करताहेत.

दुसरीकडे प्रियांका गांधी आणि मायावती मोदींना दुसरे पत्र वाचण्याचा आणि चिंतन करण्याचा सल्ला देताहेत. प्रियांकांनी आत्महत्या केलेल्या गुप्तांचे पत्र शेअर केलयं मोदींना वाचण्यासाठी आणि मायावतींनी मजूरांची स्थिती कथन केलीय मोदींच्या चिंतनासाठी. चिंतन? आणि मायवती?… कमाल आहे. आणि प्रियांकांचे काय? गुप्तांचे पत्र दु:खद आणि हेलावणारे आहे हे नक्की. पण हे पत्र वाचायची खरी गरज आहे,जे १० जनपथच्या सावलीत आयुष्यभर राहिलेत ना त्यांनाच…!! त्यांनी नाही वावदूक सल्ला द्यायचा चहावाल्या पंतप्रधानाला. आधी सावलीतून बाहेर पडून उन्हाचा तडाखा जाऊच द्या, उन्हाची तिरीप सोसा. मग सल्ले द्या पत्र वाचनाचा…!!

अतिरेकी स्तुती आणि वावदूक सल्ले – टीका यांच्या हिंदोळ्यावर मोदींची दुसऱ्या कार्यकालाची वर्षपूर्ती virtually साजरी होतीय.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात