कामाचं बोला, आणखी शोभा टाळा


दरवेळी यायचे आणि काहीतरी बोलून जायचे, त्यानंतर सोशल मिडीयावर भाट मंडळींनी वाहवा करायची सेलिब्रिटी मंडळींकडून समर्थनाचे ट्विट्स करवून घ्यायचे, कोणी विरोधात बोलला तर त्याला ‘महाराष्ट्रद्रोही’ वगैरे म्हणून ट्रोलिंग करायचे एवढेच काम सध्या उरले आहे का, असा प्रश्न पडतो.


युगंधर

“अनेक जणं आता म्हणायला लागले आहेत की कोरोना सोबत जगायला शिका. म्हणजे काय करायचे?? बरं आमची तयारी आहे कोरोना सोबत जगायची, पण कोरोनाची तयारी आहे का आम्हाला त्याच्यासोबत जगु द्यायची??, कोरोना जर का तयार नसेल तर आपण तरी कसं त्याच्या सोबत जगणार ?”

हे वाक्य एखाद्या स्टँडअप कॉमेडी किंवा विनोदी चित्रपटातील नाही. महाराष्ट्राचे आजवरच्या इतिहासातील सर्वांत सुसंस्कृत, संयमी, संयत, शांतपणे बोलणारे, मोठ्या भावाप्रमाणे धीर देणारे, दिलासा देणारे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे आहे. विश्वास बसत नाही ना…, आमचाही बसत नाही.

कोरोना संकटाचा सामना करताना ते राज्यातील जनतेशी ठराविक कालावधीनंतर संवाद साधतात. आता सोमवारी म्हणजे काल रात्री साडेआठ वाजताही त्यांना जनतेशी संवाद साधला. खरे तर आजवर बऱ्याचदा झालेल्या त्यांच्या या कथित संवादातून नेमका मुद्दा समजलेला नाहीच. मात्र, आता तरी त्यात बदल झाला असावा, म्हणून रात्री साडेआठ वाजता त्यांचा हा संवाद ऐकला आणि त्यांना आणखी किती शोभा करणार आहात, हा प्रश्न विचारण्याची इच्छा झाली.

संकटाच्या काळात नेतृत्वाने जनतेशी संवाद साधणे अत्यंत गरजेचे असते, यात कोणतीही शंका नाही. कारण त्यामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण होऊन कोणत्याही परिस्थितीचा समान करण्याची जिद्द निर्माण होत असते. मात्र, त्यासाठी नेतृत्वाला आपण काय बोलतो आहोत, याचे भान बाळगणे अत्यंत गरजेचे असते. दुर्दैवाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या संवादात ते भान अद्यापपर्यंत तरी जाणवलेले नाही. कोरोनाबद्दल विनाकारण पॅनिक व्हायचे नाही, हे सर्वांनाच मान्य आहे. मात्र, ते करताना मुख्यमंत्रीपदावर बसून असंबद्ध डायलॉगबाजी करून महाराष्ट्राची शोभा करण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे ते करताना आम्ही किती कार्यक्षम आहोत, असा आणला जाणारा आव जास्त घातक ठरतो आहे.

दरवेळी यायचे आणि काहीतरी बोलून जायचे, त्यानंतर सोशल मिडीयावर भाट मंडळींनी वाहवा करायची सेलिब्रिटी मंडळींकडून समर्थनाचे ट्विट्स करवून घ्यायचे, कोणी विरोधात बोलला तर त्याला ‘महाराष्ट्रद्रोही’ वगैरे म्हणून ट्रोलिंग करायचे एवढेच काम सध्या उरले आहे का, असा प्रश्न पडतो. कारण देशातील अन्य राज्यांच्या विचार करता महाराष्ट्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही एका विशिष्ट समुदायाला त्यांचा सण साजरा करण्यासाठी सवलती देण्याचा प्रकार सरकारने केला आहे ते करताना गुढीपाडवा, रामनवमी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हे एका मोठ्या समाजाने आपल्या घरातच साजरी केली, याचा विसर सरकारला पडला आहे.

सुरूवातीला ‘महाराष्ट्रात चाचण्या जास्त म्हणून रुग्णसंख्या जास्त’ असा प्रचार सरकारच्या भाटांकडून जोरजोरात करण्यात आला. मात्र, अन्य राज्यांच्या चाचण्यांची संख्या समोर आल्यावर त्यातला फोलपणा लक्षात आला. मग जनतेचा रोष वाढू नये, यासाठी केंद्र सरकारवर खापर फोडून झाले, ‘केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत दुजाभाव करते’, हे नेहमीचे कार्डही खेळून झाले. म्हणजे राज्याच्या परिस्थितीचा जबाबदारीच घ्यायची नाही, असे उध्दव ठाकरे यांनी ठरवले असेल तर त्यांनी तसे स्पष्ट सांगावे. म्हणजे सर्वसामान्य जनता त्यांच्याकडून भल्याची अपेक्षा करणे सोडून देईन

उध्दव ठाकरे यांना प्रशासकीय अनुभव नाही, याबद्दल आता सहानुभूती वाटण्याऐवजी चीड वाटायला लागली आहे. मुख्यमंत्र्यांचे संबोधन म्हणजे तर कॉमेडीची फॅक्टरीच झाली आहे. देशातील अन्य मुख्यमंत्री म्हणजे केरळचे पिनरायी विजयन, ओडिशाचे नवीन पटनायक, उत्तर प्रदेशचे योगी आदीत्यनाथ, राजस्थानचे अशोक गेहलोत, आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी हे आपापल्या राज्यांमध्ये अतिशय सकारात्मक काम करीत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व करताना कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, केंद्र सरकार, अन्य राज्ये यांच्यावर आरोप नाही, स्वत:ला चमकावून घेण्याची पीआरगिरीही नाही. त्यामुळे अननुभवी उध्दव ठाकरे यांनी आता महाराष्ट्राची आणखी शोभा न करता जबाबदारीने वागावे, असेच त्यांना सांगावेसे वाटते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात