काँग्रेसची वाताहत करून पंतप्रधानपदाच्या दावेदारीतील काटा काढला


विशाल थोरात 

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहूल गांधी यांनी कॉँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. कॉँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाची चर्चा सुरू झाली. या वेळी दोन नावे आघाडीवर होती. ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट. दोघांनीही आपली क्षमता सिध्द केली होती. त्यातही वय आणि अनुभवाचा विचार करता ज्योतिरादित्य यांचे पारडे जड होते. त्याप्रमाणे घोेषणाही होईल, अशी चर्चा होती परंतु सोनिया गांधी यांनीच कॉँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद स्वीकारले आणि त्यानतर सर्व चर्चाच थंडावली.
कॉँग्रेसमधील जाणकारांच्या म्हणण्यानुसार ही चर्चाच बिनबुडाची होती. याचे कारण म्हणजे कॉँग्रेसचा अध्यक्ष हाच पुढे पंतप्रधानपदाचा उमेदवार होतो, हे तर होतेच. परंतु, त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे कॉँग्रेस संस्कृतीमध्ये आणि गांधी घराण्याच्या मानसिकतेमध्ये अध्यक्षपदासाठी दुसरा कोणी चालतच नाही. पक्षामध्य दुसरे सत्ताकेंद्र निर्माण होणार नाही याची गांधी घराण्याने नेहमीच काळजी घेतली आहे. सन १९९८ मध्ये कॉँग्रेसने हा प्रयोग केलाही होता. गांधी घराण्याशी निष्ठावान समजल्या जाणाºया सीताराम केसरी यांना अध्यक्षपदी बसविण्यात आले. मात्र, त्यांच्या महत्वाकांक्षा वाढू लागल्यावर कॉँग्रेस कार्यकारिणीने ठराव करून केसरी यांची अपमानास्पदरित्या हकालपट्टी केली. केसरी यांना जनाधार नव्हताच. मात्र, ज्योतिरादित्य यांच्याबाबत हा धोका कॉँग्रेस पत्करू शकत नव्हती. याचे कारण म्हणजे ज्योतिरादित्य यांच्या व्यक्तीमत्वात करिष्मा आहे. माधवराव शिंदे यांच्यासारख्या वजनदार नेत्याचे ते वारस आहेतच; पण त्याचबरोबर या तरुण नेत्याकडे राजकीय अनुभवही आहे. २००२ पासून ते २०१९ पर्यंत ते लोकसभेचे खासदार होते. २००७ साली त्यांचा मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्रीपद त्यांनी सांभाळले आहे. व्यापार आणि उद्योग, ऊर्जा राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मध्य प्रदेशात तब्बल १५ वर्षांनी २०१९ साली कॉँग्रेसचे सरकार आले. या वेळी तरुण मतदार मोठ्या संख्येने कॉँग्रेसकडे वळला होता. याचे श्रेय ज्योतिरादित्य यांच्याकडेही जाते. मुख्यमंत्रीपदाचे सर्वात प्रबळ दावेदार तेच होते. मात्र, कॉँग्रेसने कमलनाथ यांना मुख्यमंत्री बनविले. केवळ मुख्यमंत्रीपदाबाबतच नव्हे तर मध्य प्रदेश कॉँग्रेसमधील नेमणुकांमध्येही ज्योतिरादित्य यांच्या गटाला डावलण्यात येत होते. अनेक जिल्हाध्यक्षांनी ज्योतिरादित्य यांना प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्षपद नियुक्त करावे यासाठी राजीनाम्याचा इशारा दिला होता. मात्र, मुख्यमंत्री कमलनाथ आणि ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी एकत्र करत ज्योतिरादित्य यांना एकटे पाडले. हा वाद कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडेही गेला होता. मात्र, त्यांनीही दखल घेतली नाही.
यामुळेच मध्य प्रदेशातील संघर्ष हा कमलनाथ- ज्योतिरादित्य नसून कॉँग्रेसच्या राष्टÑीय पातळीवरील नेतृत्वाचाही आहे, म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कॉँग्रेस अध्यक्षपदासाठी ज्योतिरादित्य यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि तेथेच त्यांचा घात होणार हे स्पष्ट झाल्याचेही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. कॉंग्रेसचे नेतृत्व राहूल गांधी यांच्याकडेच राहण्यासाठी एक गट प्रयत्नशील आहे. दुसरा पर्यायच ठेवायचा नसल्याने ज्योतिरादित्य यांना सतत अपमानित करण्याची रणनिती या गटाने आखली. त्यामुळे ज्योतिरादित्य यांची कोंडी झाली होती. ही कोंडी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून फोडली आहे.
कॉँग्रसने आपल्याच पक्षातील संभाव्य पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा काटा काढला आहे. मात्र, यातून केवळ मध्य प्रदेशातील नव्हे तर मध्य भारतातील कॉँग्रेसची वाताहत झाली आहे. कॉँग्रेसच्या ओसाड माळावरच्या जहागिरीची लढाई लढण्याची आता तरुण नेत्यांची मानसिकता राहिली नाही हेच यातून दिसून येत आहे.

माधवराव शिंदे यांनीही दिली होती कॉँग्रेसला
कॉँग्रेसच्या नेतृत्वाकडून शिंदे घराण्यावर डाव करण्याची परंपरा पूर्वीपासूनच आहे. याचे कारण म्हणजे माधवराव शिंदे असोत की आता ज्योतिरादित्य शिंदे, कॉँग्रेसच्या नेतृत्वाला त्यांची कायमच धास्ती वाटत आली आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतरही माधवराव शिंदे आणि राजेश पायलट या तरुण नेत्यांकडे संपूर्ण कॉँगेस पक्ष आशेने पाहत होता. तत्कालिन पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रीमंडळात माधवराव शिंदे हे नागरी विमानवाहतूक मंत्री आणि मनुष्यबळविकासमंत्री होते. इ.स. १९९६ साली त्यांचे नाव जैन हवाला डायरी प्रकरणात गोवले गेले. पक्षाकडून त्यांना कोणत्याही प्रकारचा पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. कॉँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून काँग्रेसबाहेर पडून स्वत:चा मध्य प्रदेश विकास काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष स्थापन केला. ग्वाल्हेरमध्ये असलेल्या शिंदे घराण्याच्या वलयामुळे ते १९९६ च्या निवडणुकीत निवडूनही आले. पी.व्ही. नरसिंह राव यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये परतले. त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ते काँग्रेस पक्षाच्या संसदीय दलाचे उपाध्यक्ष बनले. सप्टेंबर ३०, इ.स. २००१ रोजी ते लखनौ येथे पक्षाच्या मेळाव्यात भाषण करायला दिल्लीहून विमानाने जात असताना त्यांचे विमान उत्तर प्रदेश राज्यात मैनपुरी जिल्ह्यात कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यूही संशयास्पद असल्याची चर्चा त्या वेळी घडली होती.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात