हिंदुत्ववादी पक्षांनो, सत्तेच्या माजात राहू नका, अन्यथा…!!

कंगनाच्या निमित्ताने भांडण दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये लागलेय. जनतेने आज हिंदुत्ववादी पक्षांना डोक्यावर घेतलेय. पण भांडण विकोपाला नेले तर हीच जनता पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही. “बारा कळी” लावणाऱ्या छद्म धर्मनिरपेक्ष नेत्यांना नेमके हेच हवे आहे. सत्तेच्या माजात राहुन हिंदुत्ववादी पक्षांनी हे घडू देऊ नये. वेळीच सावरावे, ही हिंदुत्ववादी मतदारांची अपेक्षा आहे.


विनायक ढेरे

दोन हिंदुत्ववादी पक्षांना सत्तेचा माज आलाय का? काय त्या कंगना राणावतच्या ट्विटवरून गदारोळ चाललाय? काय तिची किंमत भारतीय राजकारणात एवढी आहे, की दोन दोन दिवस सगळा मीडिया आणि सोशल मीडिया तिच्या उथळ आणि उठवळ ट्विटसने भरून जावा? संजय राऊत, आशिश शेलार, राम कदम, अमृता फडणवीस काय सांगताहेत यांची ट्विट? आणि महाराष्ट्रात हे कमी पडले की काय म्हणून मग हरियाणाचे गृहमंत्री अनिल विजही या भांडणात मध्ये पडले. त्यांनी ट्विटरवरून शिवसेनेचा “बाप” काढला. कंगनाच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेनेतले हे भांडण दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांच्या नेत्यांनी एवढ्या टोकाला नेलेय की ते विसरूनच गेलेत की आपण दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत आणि आपले खरे विरोधक हे छद्म धर्मनिरपेक्ष काँग्रेसी, डावे अाणि इस्लामी पक्ष आहेत. जनतेने त्या खोट्या पक्षांना लाथाडून आपल्याला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून स्वीकारले आहे आणि सत्तेवर बसवले आहे.

पण शिवसेना काय किंवा भाजप काय, या दोन्ही पक्षांना सत्तेचा एवढा माज आलाय की आता ते एकमेकांचा “बाप” काढताहेत. केंद्रात मोदींच्या करिष्म्याच्या बळावर दुसऱ्यांदा संपूर्ण बहुमत मिळाले म्हणून भाजप मस्तीत आहे. आणि महाराष्ट्रात बहुमत मिळूनही भाजपला फसवून मुख्यमंत्रीपद हडपल्यानंतर शिवसेनेला सत्तेची मस्ती आली आहे. म्हणून हे दोन्ही पक्ष एकमेकांवर “बाप” काढत तुटून पडले अाहेत. दुसऱ्याचा “बाप” काढणे हे भाजपच्या आणि संघाच्या संस्कारात बसते काय? आणि हिंदुत्ववादी भाजपचा “बाप” काढण्याचे मुखत्यार पत्र बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिले आहे काय? सत्तेचा माज हे काँग्रेस – राष्ट्रवादीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. शिवसेना किंवा भाजपचे नाही.

पण कंगनावरून हे दोन्ही पक्ष एकमेकांवर जीव खाऊन असे काही तुटून पडलेत की सगळे प्रश्न संपलेत देशातले आणि महाराष्ट्राचेही सोडवून. दुसरे काही प्रश्न उरलेच नाहीत म्हणून भांडताहेत हे दोन हिंदुत्ववादी पक्ष एकमेकांशी. लाज वाटली पाहिजे दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आणि ट्विटरवरून एकमेकांची वाभाडी काढणाऱ्या कार्यकर्त्यांना. अहो, अवघी पाच – दहा वर्षच होताहेत, हिंदुत्ववादी राजकीय पक्षांना जनतेने संपूर्ण राजकीय बहुमताच्या रूपात स्वीकारून. त्याआधी काँग्रेसी राजवटीत पोलिसी लाठ्या, संघर्ष आणि फक्त संघर्षच होता, हिंदुत्ववादी पक्षांच्या नशिबात. जनताही वर्षानुवर्षे नाकारत होती त्यांना. काँग्रेसने ग्रासून टाकले होते संपूर्ण देशाचे जनमत. त्या प्रतिकूल काळात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घाम आणि रक्त गाळलेय या दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांच्या वाढीसाठी. त्यातून आजची सत्ता दिसतीय हिंदुत्ववादी पक्षांच्या आजच्या नेत्यांना. पण जे पक्षवाढीसाठी राबलेत त्यांच्या घामाची आणि रक्ताची किंमत ठेवा, उपटसुंभांनो…!!

तुम्हाला उपटसूंभ मनापासून म्हणावेसे नाही वाटत कारण तुमचाही आपापले हिंदुत्ववादी पक्ष वाढविण्यात काही वाटा जरूर आहे. पण तुम्ही मर्यादा सोडलीय. तुमची भांडणे तुम्हीच एवढ्या टोकाला नेताय की जणू काही तुम्ही विसरालच आहात की तुम्ही एकाच हिंदुत्वाचे घटक आहात. तुमचे एकत्र बळ पाहूनच तुमच्या कपट कारस्थानी विरोधकाने तुमच्यात “बारा कळी” लावल्यात. पण तो कळी लावू शकला कारण तुमच्यात खोट होती. तुम्हीच तुमची मर्यादा ओलांडण्याची तयारी दाखवलीत. जनतेने एकत्रित तुम्हाला बहुमत दिले. पण सत्तेच्या मस्तीपायी आणि पोकळ अहंकारापायी तुम्हाला हे बहुमत पचवता नाही आले. जनतेने आपणहून हिंदुत्ववादाला दिलेले बहुमत तुमच्या अहंकारामुळे सत्तेत रूपांतरित नाही करता आले तुम्हाला…!!

आणि आता तर काय, कंगनाच्या निमित्ताने कमरेचे सोडून एकमेकांवर तुटून पडले आहात तुम्ही. पण या सगळ्याचा फायदा कोणाचा होतोय, याचे भान तरी आहे का तुम्हाला? जे तुमच्या विरोधात सलग दोन निवडणूकांमध्ये जनतेकडून सपाटून मार खाऊन हरले, ते छद्म धर्मनिरपेक्ष, डावे, इस्लामी विचारसरणीचे पक्ष याचा लाभ उपटणार आहेत. जनतेने त्यांना दोनदा लाथाडून तुम्हाला स्वीकारलेय, याची हीच किंमत ठेवणार आहेत का हे हिंदुत्ववादी पक्ष? जनता हे सगळे पाहतीय.

आणि कंगना तरी काय? तिने इस्लामी डॉमिनेटेड बॉलिवूडमध्ये मराठ्यांचा इतिहास दाखविणारी फिल्म बनविली. होय, खरेच आहे ना ते. पण म्हणून मुंबईचा बाप काढण्याचा अधिकार तिला कोणी दिला? ती विचारांनी हिंदुत्ववादीच आहे ना? मग तिने पार “बाप” काढून दुसऱ्या हिंदुत्ववादी पक्षावर टीका करायची? हा अधिकार तिला दिला कोणी? असली टीका करून ती स्वत:ची आणि हिंदुत्वाची प्रतिमाहानी करवून घेती आहे. ज्यांनी तिची झाशीची राणी फिल्म उचलून धरली, ते प्रेक्षक मराठी आहेत. हिंदू आहेत. हे तिला समजत नाही का?

शिवसेना काय किंवा भाजप काय? दोन्ही हिंदुत्ववादीच आहेत ना. पाच – दहा वर्षांपूर्वीपासूनच जनतेने बहुमत देऊन स्वीकारल्याचा एवढा माज? पण लक्षात ठेवा, समोर असलेले छद्म धर्मनिरपेक्ष पक्ष दबा धरून बसलेत. ते वाटच पाहाताहेत तुम्ही आपापसांत भांडून कधी मरताय, याची. आणि जनता तरी काय करेल? तिने वेळ येताच भल्याभल्यांना सरळ केलेय. आज तिने हिंदुत्ववादी पक्ष म्हणून तुम्हाला डोक्यावर घेतले अाहे. पण असेच सत्तेच्या माजातून “बारा कळी” लावणाऱ्याच्या नादी लागून भांडत राहिलात तर हीच जनता तुम्हाला पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही. पण त्यावेळी दोष जनतेचा नसेल. तुमच्या नालायकीचा असेल…!!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*