सामनाकारांचा पार्थला गीता उपदेश

विनायक ढेरे

इतरांनी शरद पवारांच्या तालेवार राजकीय घराण्यात नाक खुपसू नये, असे सांगत कार्यकारी सामनाकारांनी स्वत: मात्र पवार घराण्यात positive नाक खुपसून घेतले आहे. शरद पवारांनी कवडीचीही किंमत न ठेवलेल्या नातवाला पार्थ पवारांना गीता उपदेशाचे डोस पाजले आहेत. आजोबांनी खायला घातलेली कडू कारल्याची भाजी नातू पार्थ पवारांनी “गोड” मानून खावी, असा कार्यकारी सामनाकारांचा उपदेश आहे. पण या सर्व प्रकारात कार्यकारी सामनाकारांनी एक प्रकारे पार्थ पवारांची पाठराखणही केली आहे.

राम जन्मभूमी प्रकरणात पार्थने घेतलेली भूमिका कार्यकारी सामनाकारांना मान्य आहे. यात त्यांनी राम जन्मभूमी मंदिराच्या बाजूने लोकभावनेचा उल्लेख केला आहे. अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचाही आवर्जून उल्लेख केला आहे आणि राष्ट्रवादीची विशेषत: शरद पवारांची भूमिका लोकभावनेविरोधात असल्याचे सूचित केले आहे. पण मग यात पार्थची immaturity कुठून येते? फक्त त्यांनी पत्र लिहून आनंद व्यक्त केला म्हणून? की त्याने आणखी कुठे दुसऱ्या दुखत्या नसेवर हात ठेवला म्हणून? नेमकी येथेच आजच्या गीता उपदेशाची “राजकीय मेख” दडली आहे.

यात आणखीही एक उपमुद्दा आहे. दरवेळी कोणत्या ना कोणत्या मुद्द्याच्या निमित्ताने शरद पवारांची तळी उचलून धरायची आणि पवारांच्या तालेवार राजकीय घराण्यात आपल्यालाच नाक खुपसण्याची मूभा आहे, हे दाखविण्याची ही मशक्कत आहे.

वास्तविक कार्यकारी सामनाकार स्वत:च म्हणतात त्या प्रमाणे तेज, २४ तास वगैरे वाहिन्यांनी मीठ – मिरची – मसाला लावून सुशांत सिंह राजपूत प्रकरण लावून धरले आहे. मग स्वत: कार्यकारी सामनाकार रोज रोज सामनातून किंवा वाहिन्यांना बाईट देऊन तेच मीठ – मिरची – मसाला का चाखत बसतात? दुसरे काही विषय लिहावेत ना सामनात. तशी त्यांचीही लेखणी बाळासाहेबांनी “तेज” घडवलेली आहेच की. पण ते सोडून कार्यकारी सामनाकार रोज रोज सुशांत विषयीचा मजकूर “अरवून फिरवून” लिहित असतात आणि वाहिन्यांना बाईट देत असतात. मग पार्थने सीबीआय चौकशीची मागणी लावून धरल्याने कार्यकारी सामनाकारांना मिरच्या झोंबायचे कारण काय? की त्यामुळे थेट पवार घराण्यातून थेट शरसंधान झाल्यामुळे आदित्य ठाकरेंभोवती संशयाचे ढग अधिक गडद होताहेत याची त्यांना शंका आहे?

कार्यकारी सामनाकारांनी पार्थला गीता उपदेश देत असताना एक अफलातून शोध पत्रकारिता केली आहे… त्यांना म्हणे पार्थचा कोणी राजकीय वापर तर करून घेत नाही ना…!!, अशी शंका आहे. आँ… पवारांच्या तालेवार राजकीय घराण्यातील तालेवार राजकीय आजोबांच्या राजकीय नातवाचा “इतरांकडून” वापर…?? महाराष्ट्राच्या राजकीय गणितात हे कुठेतरी बसते का? काही तरी भलतेच. अहो, राजकारणात “इतरांचा” वापर करवून घेणे ही तालेवार पवारांची तालेवार खासियत आहे. “इतर लोक” कोणत्याही पवारांचा, मग तो पार्थ का असेना कसा काय वापर करून घेणार? कार्यकारी सामनाकारांनी अलिकडच्या शोध पत्रकारितेपैकी हा एक नवाच जावई शोध लावला आहे, असे म्हणावे लागेल.

कार्यकारी सामनाकार सध्या शरद पवारांना बाळासाहेब ठाकरेंच्या “जागी स्थापित” करायला निघाल्याची महाराष्ट्रात चर्चा आहे. पार्थला आज केलेला गीता उपदेश त्याच दिशेने निघाल्याचे दिसतेय. कारण अनेक ठिकाणी कार्यकारी सामनाकारांनी बाळासाहेबांचा उल्लेख केलाय. बाळासाहेबांनी अनेकदा स्वकीयांना असेच कडवट डोस पाजले होते. पुतण्याला असेच फटकारले होते, वगैरे वगैरे. पण बाळासाहेबांनी पुतण्याची किंमत कवडीपेक्षाही कमी केल्याची घटना ना कोणाच्या एेकीवात. ना कोणाच्या वाचनात. बाळासाहेबांच्या सामनातले फटकारे नेहमी “अस्सल” असायचे. सिल्वर ओकच्या स्पर्शाने दूषित झालेले नसायचे…!!

बाकी कार्यकारी सामनाकारांनी शरद पवारांना थेट महात्मा गांधी, नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांगेत मोठ्या राजकीय शिताफीने नेऊन बसवलेय. या सर्व नेत्यांनी म्हणे कधी ना कधी स्वकीयांना कडू कारल्याची भाजी खाऊ घातलीय… पण या नेत्यांपैकी कोणी कधी नातवाला निवडणुकीत उभे करून पाडून दाखवलेय? कधी कोणाची किंमत कवडीपेक्षाही कमी असल्याचे बोलून दाखवलेय? या नेत्यांपैकी कधी कोणी sigle digit खासदार संख्येच्या “बळावर” थेट पंतप्रधान पदावर दावा ठोकलाय? हे पहिल्या फळीतले नेते कायमच स्व कर्तृत्वावर भारताच्या केंद्रीय स्तरावर राजकारणात पाय रोवून उभे राहिल्याचा नजीकचा इतिहास आहे. या रांगेत पवार कुठे आणि कसे बसू शकतात? ही रांग शरद पवारांसाठी “अस्थानी” आहे.

हा आता कार्यकारी सामनाकारांसारखे काही मराठी पत्रकार कोणत्या ना कोणत्या निमित्ताने शरद पवारांना त्या पहिल्या रांगेत अधून मधून “घुसवत” राहतात ही गोष्ट निराळी. पवारांनी कवडीचीही किंमत न ठेवलेल्या नातवाला गीता उपदेश करण्याच्या निमित्ताने कार्यकारी सामनाकारांनी ही राजकीय शिताफी साधून घेतली आहे, एवढे मात्र नक्की.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*