भारतीय लोकशाहीच्या भाळी आज विरोधकांचे कुंकू नाही…!!


  • विरोधकांनी गुणवत्ता गमावलीय; उरलीय फक्त आक्रस्ताळी आदळआपट

विरोधी पक्षांची अवस्था कधी नव्हे एवढी गलितगात्र झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड प्रश्नांची सरबत्ती करून त्यांना निरूत्तर करण्याची गुणवत्ता विरोधकांनी गमावली आहे. मोदी “जागतिक पटावर” बुद्धिबळ मांडून बसले असताना विरोधक जुनाट बुद्धिबळाच्या पटावर भाषा आणि जातीयवादाचे प्यादे – मोहरे हालवत बसले आहेत.


विनायक ढेरे

How can opposition catch up with the role of opposition? हा प्रश्न आताच पडायचे कारण चिदंबरम आणि कनिमोळी यांची ट्विटस्. या दोन्ही दाक्षिणात्य नेत्यांनी हिंदी – इंग्रजी हा जुना पुराणा, घिसापिटा वाद उकरून काढलाय. तोही फार serious level ला नाही तर त्यांना आलेल्या व्यक्तिगत अनुभवातून. कुठेसे कनिमोळींना विचारले गेले, तुम्हाला हिंदी येत नाही मग तुम्ही भारतीय आहात का? चिदंबरम यांनी कनिमोळींचा अनुभव शेअर करून आपणही त्यातून गेल्याचे “टिवटिवाट” करून सांगितले.

कसले हे विरोधी नेते? आत्ता कोणते वाद उकरून काढताहेत? समोर कोण आहेत? मोदींचे केवढे तगडे आव्हान उभे आहे? आणि हे नेते करताहेत काय? मोदी ट्रिपल तलाकपासून राम मंदिरापर्यंतचे सगळे विषय एकेका झटक्यात मार्गी लावताहेत. त्यांच्याशी समोरून सोडा पण siding राहूनही हे विरोधी नेते मुकाबला करू शकत नाहीत, अशी अवस्था स्वत:हूनच विरोधकांनी ओढवून घेतली आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर मीडियात, सोशल मीडियात सर्वत्र चर्चा होती, मोदी पुढे काय करणार? काशी – मथुरापासून समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा हे सगळे विषय ट्रेंडिग होते आणि आहेत. पण विरोधकांचे या मुद्द्यांवर काय चालले आहे? टीव्ही डिबेटमध्ये दुय्यम दर्जाचे प्रवक्ते या चर्चेत भाग घेऊन मतमतांतराच्या पिंक टाकत होते, यापेक्षा विरोधकांपैकी कोणीही प्रमुख नेता या विषयांवर चकार बोलायलाच तयार नव्हता आणि आजही नाही. राहुल गांधी मोदींना दररोज outdated प्रश्न विचारतात. ना मोदी त्याची दखल घेतात, ना लोक त्यांना seriously घेतात. या case मध्ये संसदीय लोकशाहीतली विरोधी पक्षाची खरी जागाच कोणी भरून काढायला तयार नाही. मोदींना संसदेत धाक वाटावा असा नेता समोरच्या बाकावर नाही.

याचा अर्थ असा अजिबात नाही, की देशापुढे serious मुद्दे नाहीत. मुद्दे भरपूर आहेत आणि अधिक serious आहेत. कोरोनापासून अर्थव्यवस्थेपर्यंत त्याच्या हाताळणीचे अनेक मुद्दे विरोधकांनी आक्रमकपणे धसाला लावले पाहिजेत. मोदी सरकार सांगत असलेली आकडेवारी cross check करून तिच्यावर ठळक प्रश्नचिन्ह उमटवली पाहिजेत. पण दुर्दैवाने डॉ. मनमोहन सिंगांसारखे एखादे किंबहुना एकमेव अपवाद वगळता कोणीही विरोधी नेता अर्थव्यवस्थेसंबंधी महत्त्वाचे आणि गंभीर मुद्देच उपस्थित करताना दिसत नाही.

कोरोनानंतर आर्थिक मंदी अपरिहार्य असल्याचे सांगून डॉ. मनमोहन सिंग यांनी तीन उपाय सूचविले आहेत. मोदी सरकारने त्याचा आवश्य विचार केला पाहिजे. पण हा अपवाद वगळला तर राहुल, सोनिया, प्रियांका गांधी, अखिलेश यादव, मायावती, शरद पवार, चिदंबरम हे नेते विरोधक म्हणून seriously करतात काय? हा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. शरद पवारांची महाराष्ट्राच्या राजकीय भटारखान्यातली “खिचडी” हा वेगळा विषय आहे. केंद्रातल्या विरोधकांशी त्याचा थेट संबंध नाही आणि मोदी सरकारला पवार हे serious opposition leader वाटतच नाहीत. काँग्रेसला अधून – मधून ठोकण्यासाठी ते एक हत्यार आहेत, एवढेच.

या पार्श्वभूमीवर आठवण होते ती १९८५ च्या विरोधकांची. राजीव गांधींसमोर संसदेत होते ते मूठभर. पण त्यात मधू दंडवते होते. पी. उपेंद्र होते. वाजपेयी – अडवानी संसदेत नव्हते तरी राजकीय मैदानात होते. दीड दोन वर्षांतच त्यांना विश्वनाथ प्रताप सिंह येऊन मिळाले. पाशवी बहुमताची मिजास त्यांनी एकत्र येऊन पाच वर्षांच्या आत संपवली होती राजीव गांधींची…!!

मोदी खरोखर “भाग्यवान”; पण भारतीय लोकशाही “अभागी” तिच्या कपाळी लावायला विरोधकांचे कुंकू नाही.

मोदींसमोर विरोधी बाकांवर लोहिया, दीनदयाळ, मधु दंडवते, मधु लिमये, जॉर्ज फर्नांडिस तर नाहीतच. पण मुलायम, लालूही नाहीत. उरलेत फक्त, राहुल, सोनिया, खरगे आणि सुरेश.

उत्तर प्रदेशात योगी २/३ बहुमताने सत्तेवर आहेत आणि अखिलेश – मायावती ११% ब्राह्मण मतांसाठी भगवान परशूरामांचे पुतळे उभारण्याच्या स्पर्धेत मग्न आहेत. योगी उत्तर प्रदेशात “न भूतो” अशा राजकीय पटाची मांडणी करण्यात मग्न आहेत आणि त्यांचे आव्हानवीर अखिलेश आणि मायावती जुन्याच ६४ घरांच्या पटावर “जातीय बुद्धिबळ” खेळण्यात मग्न आहेत. “जातीय टक्के” जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या या नेत्यांना योगी नवेच “टोणपे” देण्याची तयारी करत आहेत.

दक्षिणेतील विरोधी नेते “भाषावादाचा पट” आणि उत्तरेतील विरोधी नेते “जातीयवादाचा पट” यातून बाहेरच पडायला तयार नसल्याचे मोदी – योगींच्या रथाला आडवायला कोणी शिल्लक नाही. आणि असलेच तर तेवढे ताकदवान कोणी उरले नाही. हे गुणवत्ता नसलेल्या विरोधकांचे लक्षण आहे. ही विरोधकांनी स्वत:वर ओढवून घेतलेली अवस्था आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती