महाराष्ट्राच्या पुढाऱ्यांना मरणचिठ्ठीतून सणसणीत चपराक

  • पुरोगामीत्वाचा डांगोरा पिटणाऱ्या पुढाऱ्यांना सणसणीत चपराक लावून सुनील ईरावर गेला

विनायक ढेरे

पुरोगामीत्वाचा डांगोरा पिटणाऱ्या महाराष्ट्राच्या पुढाऱ्यांना सणसणीत चपराक लावून सुनील ईरावर गेला आहे. निबर राजकीय कातडीच्या पुढाऱ्यांच्या पाठीवर त्याने आसूड ओढला आहे. त्याने लिहिलेली मरणचिठ्ठी महाराष्ट्राचे आपल्या पुढाऱ्यांनी निर्माण करून ठेवलेले “राजकीय चारित्र्य” उघडे नागडे करून सांगतीय. नामदेव ढसाळासांच्या गोलपिठासारखी ही आग भगभगीत आहे. “मेनहोलमधून सगळे साहित्य गटारात फेकून द्या,” ही त्यावेळची नामदेव ढसाळांची बंडखोरीची आग सुनील ईरावरने मृत्युनंतर पेटवली आहे.

सुनील अवघा २७ वर्षांचा होता. राज ठाकरेंवर निस्सीम प्रेम करणारा होता. नांदेड मनसेचा शहराध्यक्ष होता. जिद्दी होता. मेहनती होता. त्याच्याकडे नव्हता फक्त पैसा, आणि जात…!! या “दोनच” गोष्टी पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात त्याला फासाच्या दोरीपर्यंत खेचून घेऊन गेल्या.

एकीकडे आजोबाने कवडीचीही किंमत न ठेवलेल्या नातवाची समजूत काढण्यासाठी बारामतीत बैठकांवर बैठका आणि स्नेहभोजने होताहेत आणि दुसरीकडे एकाच घराण्यातूनच दोन मुख्यमंत्री दिलेल्या नांदेडसारख्या शहरात २७ वर्षांचा तरूण “राजकारणासाठी माझ्याकडे पैसा आणि जात नाही” असे लिहून आत्महत्या करतोय. ही मरणचिठ्ठी म्हणजे पुरोगामीत्वाचा डांगोरा पिटणाऱ्या या महाराष्ट्राच्या पुढाऱ्यांच्या तोंडात ही सुनील ईरावरने मारलेली ही सणसणीत चपराक आहे.

पुरोगामी पुढाऱ्यांनी तयार करून ठेवलेले महाराष्ट्राचे राजकीय संचितच त्याने आत्महत्येच्या चिठ्ठीतून उघडे नागडे करून सांगितले आहे. पुरोगामीत्वाचा डांगोरा पिटण्यात याच बारामती आणि नांदेडचे पुढारी अग्रेसर होते आणि आहेत. जेवणात तोंडी लावल्यासारखे लोणची, पापडासारखी शाहू – फुले – आंबेडकरांची नावे हेच पुढारी घेत असतात. त्यांची नावे घेणाऱ्या बारामती आणि नांदेडच्या पुढाऱ्यांनी महाराष्ट्राची ही काय अवस्था केली आहे, हेच सुनील ईरावरच्या बोटभर चिठ्ठीतून दिसते. या पुढाऱ्यांनी महापुरूषांची नावे घेऊन घेऊन घासून ती गुळगुळीत करून टाकली.

ही नावे जसजशी गुळगुळीत होत होती, तसतशी या पुढाऱ्यांची राजकीय कातडी निबर आणि जाड होत राहिली. आज ती एवढी जाड झालीय की फक्त राजकीय घराण्यांमधला कोणी तरूण नातू नाराज झाला तर आणि तरच बैठका वगैरे घेतल्या जातात. एरवी एखाद्या सुनील ईरावरने “पैसा आणि जात नाही” म्हणून आत्महत्या केली तर त्याकडे ढुंकूनही बघण्याची गरज वाटत नाही, या निबर आणि जाड कातडीच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या पुढाऱ्यांना…!!

नामदेव ढसाळांनी महाराष्ट्राच्या तथाकथित साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक पुरोगामीत्वाची अशीच लक्तरे गोलपिठातून काढली होती. साहित्यक्षेत्रात त्याने खळबळ माजली पण राजकीय आणि सामाजिक क्षेत्र “तस की मस” हालले नव्हते त्याने. तोपर्यंत महाराष्ट्राची राजकीय कातडी जबरदस्त कमवून ठेवली होती या पुढाऱ्यांनी. सामनातला मारूती कांबळे अाणि सिंहासनमधला दिगू यांनी थोडी झलक दाखवली होती, या पुढाऱ्यांच्या राजकीय निबर कातडीची. महाराष्ट्राचे प्रेक्षक हे सिनेमे चवीने पाहून नंतर आपापल्या कामाला लागले होते, तर पुढारी आपली राजकीय कातडी कमवायच्या उद्योगाला लागले होते.

आजची सुनील ईरावरची आत्महत्येची चिठ्ठी महाराष्ट्राच्या पुढाऱ्यांची राजकीय कातडी किती निबर आणि जाड झालीय हेच दाखवतीय…!! पुरोगामीत्वाचा डांगोरा पिटत पैसा आणि जातीवर राजकारण खेळणाऱ्यांचे बुरखे फाडतीय. अपेक्षा आहे, महाराष्ट्राच्या जनतेने हे भेसूर चेहरे नीट ओळखून त्यांचे राजकारण कायमचे संपवावे याची…!!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*