“पवार स्कूल”च्या जातीय धड्यातूनच पडळकरांचे “गणित” चुकले…!!

साहेबांचं राजकीय ताट हे चाणाक्षपणा, अभ्यासूवृत्ती, कोणताही विषय झपाट्याने समजून घ्यायची हातोटी, प्रशासनावर पकड यासोबतच चवीपुरते पुरोगामीत्व, निधर्मवाद, जातीयवाद, पेशवे, पळी-पंचपात्र असे भरलेलेअसते. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी अशा हिन दर्जाच्या टिकेची प्रेरणा शरद पवारांकडूनच तर घेतली नाही ना, अशी शंका येण्यास जागा आहे.


युगंधर

भाजपचे विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री (आणि विद्यमान मुख्यंत्र्यांचा लगाम हाती ठेवणारेही) अशा शरद पवार   च्याविषयी  “महाराष्ट्राला  झालेला कोरोना” अशा अतिशय हिन शब्दप्रयोग केला. त्याबद्दल पडळकर यांचा करावा तेवा निषेध कमीच आहे. कारण कोरोना संसर्गाने सध्या अवघ्यास जगाला वेठीस धरले आहे, असे असतानाही कोरोनाचा वापर राजकीय साठमारीसाठी करणे यातून पडळकरांचा अननुभव दिसून येतो. अर्थात, आपले विधान हे भावनेच्या भरातून केल्याचेही पडळकरांनी सांगितले.

भावनेच्या भरात का असेना, पडळकरांनी पवारांसारख्या वयोवृद्ध तरीही कामाचा प्रचंड झपाटा असलेल्या नेत्याबद्दल असे विधान करायला नको होते. कारण महाराष्ट्राला फुले – शाहू – आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा लाभला आहे. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृततेचे वळण लावले आहे आणि यशवंतरावांच्या शिष्याबद्दलच असे हिन विधान करणे हे अतिशय दुर्देवी आहे.

मात्र, राजकारणात अशी हिन दर्जाची टिका करणारे पडळकर काही पहिलेच नाही आणि शेवटचेही नसतील. पडळकरांनी ज्या शरद पवारांवर हिन शब्दात टिका केली, त्याच शरद पवारांनी किमान डझनभरवेळा तरी भान सोडून अतिशय घाणेरड्या शब्दाच आपल्या राजकीय विरोधकांवर टिका केली आहे. त्याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे गतवर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार.

प्रचारात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे एकमेकांवर जोरदार टिका करीत होते. एका प्रचारसभेत शरद पवारांचे तोल ढळला आणी त्यांनी “कुस्ती करायची तर ती पैलवानासोबत करतात, ‘तसल्या’ लोकांसोबत कुस्ती करत नाहीत” असे विधान करीत विशिष्ट पद्धतीने ‘हातवारे’ केले. तसे हातवारे करण्यामागे पवारांचा रोख हा तृतीयपंथीयांकडे होता. पवारांसारख्या पुरोगामी नेत्याने राजकीय तृतीयपंथीयांचा असा अपमान करणारे हिन दर्जाचे हातवारे करून पुरोगामी महाराष्ट्राच्या मान वाढविला होता का ?

आज ज्या शिवसेनेसोबत पवार सत्तेत आहेत, त्या शिवसेनेला आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तर पवारांनी चक्क कुत्र्याची उपमा दिली होती. झाले असे की गतवर्षी झालेल्या निवडणूक प्रचारात सभेमध्ये एक कुत्रं अचानक घुसलं, त्यानंतर सभास्थानी थोडी चुळबूळ झाली असेल. त्यावर पवारांनी “मला वाटलं की शिवसेनेची माणसं आली” अशी अगदी ‘सुसंस्कृत’ टिप्पणी केली होती.

पवारांचा उल्लेख त्यांचे कार्यकर्ते आधारवड असा करीत असतात. पवारांची दीर्घ राजकीय कारकिर्द पाहता ते योग्यच आहे. मात्र, नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना यशवंतरावांच्या सुसंस्कृत राजकारणाचे धडे देण्यात आधारवड पवार अपयशी ठरतात की मुद्दाम तसे करतात, हे कळायला मार्ग नाही. कारण गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुक प्रचाराच्या एका सभेत व्यासपीठावर आधारवड पवार साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे आणि अजितदादा पवार उपस्थित होते.

सक्षणा सलगर नामक कोण्या युवतीने अगदी धडाडीने भाषण केले. मात्र, त्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘तो फुटाण्या’ असा त्या मुलीने केला. खरे तर मोदींचा राजकीय अनुभव त्या मुलीच्या वयाच्या किमान तिप्पट तरी असेल, असे असतानाही अगदी बेताल वक्तव्य ती मुलगी करीत होती. व्यासपीठावर असलेले पवार आणि सुप्रियाताई ते सर्व एन्जॉय करीत होते. अखेर त्याबद्दल अजितदादांनी जाहिरपणे त्या मुलीचे काम उपटले. खरे तर ते काम पवारांनी करायला हवे होते.

अशी वक्तव्ये करणे आणि समाजात अस्वस्थता पसरविणे हा पवारांचा जुना छंद. त्यामुळेच भाजपने कोल्हापूर गादीचे युवराज संभाजी छत्रपती यांना राज्यसभेवर पाठविल्यावर ‘पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायचे, आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करतात.‘ असे ‘निखळ ऐतिहासिक‘ विधान पवारांनी केले होते. सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले हेही भाजपवासी झाल्यानंतर पवारांनी किती खालच्या दर्जाची विधाने केली होती, ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे.

महाराष्ट्रात सत्ताबदल झाला आणि ब्राह्मण व्यक्ती मुख्यमंत्री झाला की एरवी पुरोगामी असलेले पवार साहेब अचानक ‘जातीयवादी‘ होतात, त्यांचा असा रंग बदलणे हे तर शॅमेलिऑन सरड्यालाही लाजवणारे असते. यापूर्वी युतीचे सरकार आल्यावर मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांना असंच ‘पळी-पंचपात्र‘ वगैरे आठवले होते. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर पुणेरी पगडी विरुद्ध फुले पगडी असा प्रकार पवारांनी केला होता. पुरुषोत्तम खेडेकर, आ. ह. साळुंखे यांना हाताशी धरून ‘संभाजी ब्रिगेड‘ या तद्दन जातीयवादी संघटनेस असलेला पवारांचा आशिर्वाद कधीही लपून राहिलेला नाही. पवारांचे सध्याचे ’ब्ल्यू आइड बॉय’  आणि राज्य सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड तर ’पवार स्कूल ऑफ जातीयवाद’चे खास विद्यार्थी. असे अनेक विद्यार्थी पवारांनी घडवले आहेत.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ’महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर झाल्यावर निर्माण झालेला तणाव राजकीय फायद्यासाठी कोणाच्या आशिर्वादाने तयार करण्यात आला होता, हे सांगायला कोणा तज्ज्ञाची गरज नाही. अर्थात पवार हा फंडा फक्त विरोधकांसाठी वापरतात, असे नाही. पक्षाचा ओबीसी चेहरा असलेले छगन भुजबळ डोईजड ठरु लागताच ‘बजाओ टाळी हटाओ माळी’ या घोषणेचे जनक कोण, या प्रश्नाच्या उत्तरात पवारांच्या कथित सुसंस्कृत राजकारणाचा खरा चेहरा लपलेला आहे.

तर अशा या शरद पवारांना अळणी राजकारणाची अजिबात सवय नाही,  त्यांना लागतो तो मसालेदारपणा. म्हणूनच साहेबांचं राजकीय ताट हे चाणाक्षपणा, अभ्यासूवृत्ती, कोणताही विषय झपाट्याने समजून घ्यायची हातोटी, प्रशासनावर पकड यासोबतच चवीपुरते पुरोगामीत्व, निधर्मवाद, जातीयवाद, पेशवे, पळी-पंचपात्र असे ‘भरलेले‘ असते. मग साहेब हव्या त्या पदार्थांचा मुक्तपणे आस्वाद घ्यायला मोकळे. शिवाय काही कमी जास्त पडायला नको म्हणून तमाम पुरोगामी लेखक, विचारवंत, पत्रकार आणि आणखी काही काही असणारे लोक तर सदैव दिमतीला असतातच. एकूण काय ती ज्याप्रमाणे सुखवस्तु घरातील कर्ता पुरुष ज्याप्रमाणे पोटभर जेवण वगैरे करून, ओसरीवरच्या बंगळीत बसून सुपारी (अथवा अन्य काहीही..) कातरता कातरता जे काही करतो, तशीच पवारांची अशी अचानक येणारी विधानं असतात. अर्थात त्याला विशेष अशी ‘साधना’ लागते. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी अशा हिन दर्जाच्या टिकेची प्रेरणा शरद पवारांकडूनच तर घेतली नाही ना, अशी शंका येण्यास जागा आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*