पवारसाहेब, फडणवीसांना झटकलेत, पण त्यांच्या मुद्द्यांना उत्तरे का नाही देत..??

  • फडणवीस खरे बोललेत… प्रत्युत्तर दिले तर आणखी कटू सत्य बाहेर येईल…म्हणूनच पवार “पंगा” टाळताहेत…!!
  • गोपीचंद पडळकरांच्या टीकेवरून राष्ट्रवादीच्या राजकारणाचे हेच खरे इंगित

विनायक ढेरे

गोपीचंद पडळकरांच्या शरद पवारांवरील टीकेचे राजकारण करताना राष्ट्रवादीवाले भाजप विरोधात आक्रमक होताहेत. पण शरद पवार हे देवेंद्र फडणवीसांनी इनसायडर मुलाखतीत उपस्थित केलेल्या मूळ मुद्द्यांना उत्तरे कुठे देताहेत?

देवेंद्र फडणवीस यांनी राजू परूळेकरांना दिलेल्या मुलाखतीत बरेच खुलासे केले. भाजपबरोबर सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव स्वत: पवारांनीच भाजपला दिला होता. अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर सत्तेमध्ये सामील झाली तरी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी/तपास थांबणार नाही. शिवसेनेला वगळून फक्त राष्ट्रवादी बरोबर सरकार स्थापन करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोध केला. पवारांना शिवसेनेला सरकारमधून वगळायचे होते. ही आणि अशी अनेक quote – unquote विधाने फडणवीसांनी “इनसायडर” मुलाखतीत केली होती.

पवार या मुद्द्यांवर भाष्य करणार आणि फडणवीसांना फटकारणार असे वाटून पवारभक्त मीडिया “कान टवकारून” बसला होता. पण पवारांनी साताऱ्यात “फडणवीस प्रसिद्धीसाठी काहीही बोलतात.”, असा फुसका बार काढला. पवारभक्त मीडियाला यातही पवारांची घासून गुळगुळीत झालेली मुत्सद्देगिरी दिसली. पवारांनी फडणवीसांना ignore केले, असा “जावई शोध” मीडियाने लावला. पण यातले कटू सत्य मीडियाने सांगितले नाही.

फडणवीस यांनी उपस्थित केलेले सगळे मुद्दे गंभीर आणि पवारांची पुरती गोची करणारे आहेत. त्यामुळेच पवार काही बोलू शकले नाहीत ही राजकीय वस्तुस्थिती आहे…!!

आणि समजा पवार काही बोलले तर ते फक्त फडणवीसांना प्रत्युत्तर असणार नाही कारण यात मोदी – शहा involved आहेत. फडणवीसांनी स्वत:च्या मुद्द्यांना पुस्ती जोडण्यासाठी मोदी – शहांचा हवाला दिला आहे. तो पवारांनी उत्तरे द्यावीत एवढा “सोपा हवाला” नाही. त्यामुळेच आपण काहीही प्रत्युत्तर दिले तर फडणवीसही त्यावर काही बोलणार. आणि ते एकटे नाहीत बोलणार. शहा – मोदी “बोलायला” लागतील. आणि तिथे आपली पंचाईत होईल, याची पवारांना पुरती जाणीव झाली आहे.

म्हणजे फडणवीसांना टोला लावल्याने महाराष्ट्रात मीडियाचे स्तुती मायलेज मिळेल पण तोच टोला लावण्याच्या नादात शॉट त्या मोदी – शहांच्या दिशेने गेला तर कंबख्ती ओढवेल. हे पवार पक्के ओळखून आहेत. आणि इथेच खरी पवारांच्या फडणवीसांना प्रत्युत्तर “न देण्यातली” मेख आहे. पण पवारभक्त मीडिया ही मेख उलगडून दाखवणार नाही. कारण पवारांच्या त्यांनीच उभ्या केलेल्या मुत्सद्देगिरीचे मुसळ केरात जाईल ना…!!

म्हणूनच मग पवारांनी फडणवीसांच्या मुलाखतीतले मुद्दे पडळकरांच्या टीकेच्या निमित्ताने deflect केलेले दिसताहेत. आधी त्यांनी फडणवीसांनीच नाराज करून ठेवलेल्या अनिल गोटेंना भाजपवर “सोडले” नंतर हसन मुश्रीफांना “सोडले”; जितेंद्र आव्हाड तर नेहमीचे “बांधीव सोडलेले” आहेतच. त्यातून मग पडळकर प्रकरण पेटवण्याचा प्रयत्न झाला. तो अजून सुरूच आहे.

पडळकर प्रकरण पेटले तर फडणवीसांच्या मूळ मुद्द्यांना उत्तरे देणे टाळता येईल असा पवारांचा राजकीय होरा आहे… पण तो चुकतोय…!! कारण फडणवीस जरी एक मुलाखत देऊन सध्या गप्प राहिले असले तरी शहा – मोदी अजून “बोलायचे” आहेत… आणि एकदा या जोडगोळीने काही “बोलायला” आणि काही “करायला” सुरवात केली…तर…!! त्यापेक्षा नकोच भानगड म्हणून पवार “नेमक्या” मुद्द्यावर गप्प आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*