नेत्यांची बुद्धी भ्रष्टावणे ही कोरोनाची लक्षणे

एरवी sensible राजकारण करणारे नेते अचानक तर्कबुद्धीला न पटणारी विधाने कशी काय करू लागतात? कोरोनाने निर्माण केलेले आव्हान अजिबात पेलता न येण्याची ही लक्षणे आहेत का? की कोरोनाने त्यांच्यातल्या बुद्धिप्रामाण्यवादाला हरवलेय?


विनायक ढेरे

Sensible नेत्यांची बुद्धी भ्रष्ट करणे ही कोरोनाच्या अनेक लक्षणांपैकी एक लक्षण आहे काय?, असे वाटण्या इतपत आपल्या राजकीय नेत्यांची वक्तव्ये घसरायला लागली आहेत. आता हेच पाहा ना, “Act of God,” “मृत्यू कोरोनामुळे नाहीतच, नैसर्गिकच.”, “श्रीमंत लोक आयसीयू बेड अडवतात”, ही वक्तव्ये कोणा भोंदू बाबाची किंवा उपटसुंभी राजकीय नेत्याची किंवा कार्यकर्त्याची नाहीत, तर ती आहेत. भारतातल्या मान्यवर, सुशिक्षित, जनमानसात स्थान असणाऱ्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधल्या नेत्यांची…!!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन, प्रकाश आंबेडकर, राजेश टोपे हे नेते सामान्य नाहीत. ते विचित्र, अकारण वादग्रस्त किंवा अंधश्रद्ध विधाने करण्यासाठीही मशहूर नाहीत. त्यांचे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपापल्या राजकीय पक्षांमध्ये विशिष्ट स्थान आहे. हे नेते बुद्धिमान आणि कार्यक्षम आहेत. पण तरीही त्यांनी सामान्य तर्कबुद्धीला सोडून ही विधाने केली आहेत. त्यांच्या विधानांचा आगापिछा तपासला, विचारवंती भाषेत परिप्रेक्ष किंवा पार्श्वभूमी तपासली तरीही या विधानांचे सामान्य तर्कबुद्धीच्या आधारे समर्थन होऊ शकत नाही.

निर्मला सीतारामन यांनी जीएसटी बाबत राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या परिषदेत कोरोनाबाबत Act of God हे विधान केले. ते जाता जाता केले असले तरी सहज घेता येण्यासारखे नाही. असले विधान करून भारताच्या अर्थमंत्र्यांना केंद्र सरकारवरील जबाबदारी झटकता येणार नाही. त्यांनी ती झटकली, असे येथे म्हणायचे नाही. परंतु, हे विधान आपल्या भाषणात गुंफायची सीतारामन यांना गरज नव्हती. या विधानाचा काहीही relevance नाही. आणि तसे विधान करणे politically देखील चूक होते. कारण सरकारने कितीही मोठी आपत्ती आली तरी त्यावर उपाययोजना करायच्या असतात. त्यात कमी पडायचे नसते. Act of God सारखी विधाने करून विरोधकांच्या हाती कोलीत द्यायचे नसते. एवढे तरी दोन टर्म सरकारमध्ये राहिलेल्या सीतारामन यांनी लक्षात घ्यायला हवे. त्यांनी भाजपच्या प्रवक्तेपदाच्या “वर्तुळाला” भेदायला हवे.

तसलेच विधान प्रकाश आंबेडकरांचे. त्यांनी तर अजब तर्कट लढवून कोरोनालाच खोटा ठरवले. ज्या साथीने जगभर थैमान घातले आहे. लस शोधण्यासाठी सगळे वैद्यकीय जग उलथे पालथे होत आहे, तो म्हणे कोरोनाच खोटा. कोरोना नावाचे काही अस्तित्वातच नाही. रोज माणसे मरताहेत. ती कोरोनामुळे नाहीत. त्यांचे मृत्यू नैसर्गिक आहेत, म्हणे. प्रकाश आंबेडकर वकील आहेत.

बुद्धिप्रामाण्यवादी आहेत. त्यांनी असली वैद्यकीय शास्त्र विरोधी खुळचट विधाने करावीत? आधुनिक वैद्यकीय शास्त्र त्यांना मान्य नाही काय? की प्रश्न सोडवता येत नसले किंवा प्रश्नांची मूळे शोधता येत नसली की नेते असली तर्कटी विधाने करायला लागतात, त्यातलेच एक प्रकाश आंबेडकर आहेत? also ran मधले? त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? बुद्धिप्रामाण्यवाद त्यांनी सोडला आहे काय? प्रकाश आंबेडकरांनी दोन्ही सरकारांवर टीका जरूर करावी. वाभाडे काढावेत. पण कोरोनाच खोटा? हे काय आहे? “नव्या बाळासाहेबांचे?” एबीपी माझाने दिलेल्या पदवीला तरी जागा बाळासाहेब…!!

आणि तिसरे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे. श्रीमंत लोक म्हणे लक्षणे नसताना आयसीयू बेड अडवतात, राजेश टोपेंनी पुण्याच्या पत्रकार परिषदेत अजब तर्कट लढवलेय. कोरोना चाचण्या कमी केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला काय आणि टोपे श्रीमंत लोकांवर घसरले. राष्ट्रवादीला निवडणूक निधी देणाऱ्या श्रीमंत लोकांवर असे घसराल काय, टोपे साहेब?

पण त्याही पेक्षा गंभीर मुद्दा दडलाय टोपेंच्या विधानात. जर खरेच श्रीमंत लोक पैशाच्या बळावर आयसीयू बेड अडवत असतील तर त्यावर उपाय कोण करणार?, कोणाच्या चिठ्ठ्या, मेसेजेस घेऊन हे श्रीमंत लोक आयसीयू बेड अडवत असतील?, शहानिशा करायची जबाबदारी कोणाची? कोणत्या आणि कोणाच्या हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड अडवतात हे श्रीमंत लोक? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची जबाबदारी सरकार म्हणून तुमची आहे, टोपे साहेब. नुसती तर्कटी, खळबळजनक विधाने करून, आरोपांची राळ उडवून होणाऱ्यातली ही कामे नव्हेत. पांडुरंग रायकरचा मृत्यू तुमच्या आरोग्य यंत्रणेची पुरती पोल खोलून गेलाय…!!

पण एकूणच सीतारामन काय, आंबेडकर काय किंवा टोपे काय हे उथळ विधाने करणारे नेते नव्हेत की अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे बाबा – बूवा नव्हेत. त्यांच्यासारख्या नेत्यांनी बुद्धिप्रामाण्यवादाला सोडून विधाने करणे हे शोभादायक नाही. पटणारे आणि पचणारे नाही, एवढे मात्र खरे…!!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*