नाही ऐकणार, नाही पाहणार, नाही मानणार बंद तोंड, बंद डोळे, बंद कान; १० जनपथच्या हट्टाने केली पुरती घाण…!!


बुद्धिमान काँग्रेस नेत्यांनी कानी कपाळी ओरडून सांगितले, सुधारा. आता तरी सुधारा. पण नाही. १० जनपथकडून प्रतिसाद आला, “मोठ्ठा नाही.” “आम्ही सुधारणार नाही.” तरूण नेतृत्वाला काँग्रेसमध्ये संधी नाहीच. पण खरी मेख पुढची आहे, काँग्रेसमधले तरूण नेते पक्षाबाहेर पडून जिंकतात. नेहरू – गांधी परिवाराला हरवतात.


विनायक ढेरे

नाही  ऐकणार, नाही पाहणार, नाही मानणार; बंद तोंड, बंद डोळे, बंद कान अशी काँग्रेसची आणि काँग्रेसजनांची अवस्था झाली आहे. त्यामुळे कोणीही कितीही कानी कपाळी ओरडले तरी काँग्रेस हायकमांडला ऐकूच जात नाही. आता हेच पाहा ना….. किती तरी काँगेस नेते हायकमांडच्या कानी कपाळी ओरडून सांगताहेत, सुधारा… आता तरी सुधारा. नव्या कल्पनांच्या नव्या नेतृत्वाला संधी द्या.

काँग्रेसचे संघटनात्मक पुनरूज्जीवन करण्यासाठी नवे नेतृत्व तयार करा. मध्यम वयाच्या नेतृत्वाच्या हाती जिथे मिळेल तिथे सत्तेची चावी द्या. यातूनच पक्षाला पुन्हा उभारणी येईल. हे आधी जयराम रमेश, शशी थरूर यांनी सांगून झाले. एमकेएन सिंह यांनी प्रत्यक्ष काँग्रेस कार्यकारिणीत सांगून झाले…..कपिल सिबल यांनी अगदी उधळलेल्या घोड्यांचा भाषेत सांगून झाले तरी  पण नाहीच. “मोठ्ठा नाही.” काँग्रेस हायकमांडकडून त्याला प्रतिसादच मिळला नाही. कारण एकच….. बंद डोळे, बंद तोंड, बंद कान; १० जनपथच्या नेतृत्वाने केली पुरती “घाण”…!!

यातूनच सचिन पायलट एपिसोड घडतो आहे. आधी मध्य प्रदेशात ज्योतिरादत्य एपिसोड सत्तांतरापर्यंत पोहोचला. राजस्थानात पोहोचण्याच्या मार्गावर आहे.

एरवी १० जनपथच्या कंपाऊंड वॉलला देखील तिखट कान असतात, पण युवराज राहुल गांधींच्या बाबतीत कोणताही विषय आला की वर वर्णन केल्याप्रमाणे बंद तोंड, बंद डोळे, बंद कान अशी काँग्रेस हायकमांडची अवस्था होते. आणि ते नाही ऐकत, नाही पाहात, नाही मानत…!! या कुंठीत अवस्थेतून आधी मध्य प्रदेशात सत्तांतर घडले. आता राजस्थानात घडतेय. राजस्थानात अशोक गेहलोतांनी सरकार वाचविण्याचा केलेला दावा लवकरच पोकळ ठरण्याची चिन्हे आहेत.

मुख्य म्हणजे मध्य प्रदेश आणि राजस्थानात दोन्हीकडे comman factor एकच आहे….. दीर्घकालीन भविष्यात राहुल गांधींना दूरान्वये देखील पक्षातच राजकीय स्पर्धक ऊभा राहता कामा नये….. यासाठी मग तरूण, प्रतिभावान नेतृत्वाचे खच्चीकरण करायचे. ज्या नेत्यांचे राजकीय भवितव्य स्वत:च्या राजकीय, सामाजिक गुणवत्तेतून उज्ज्वल आहे, त्या नेतृत्वाला कायमचे झाकोळून टाकायचे. हा प्रयोग काँग्रेस हायकमांडने मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बाबतीत केला. तो राजस्थानात सचिन पायलट यांच्या बाबतीत केला.

अशोक गेहलोतांशी भांडणात काँग्रेस हायकमांडने तरूण सचिन पायलट यांना गमावले आहे. ज्योतिरादित्य आणि सचिन दोन्ही नेत्यांना त्यांच्या राजकीय प्रतिभा आणि कुवतीनुसार हायकमांडने कामच मिळू दिले नाही. जुनाट खुडूक नेत्यांकडे नेतृत्व सोपविले. ज्यांच्या राजकीय कारकिर्दी अंतिम टप्प्यात आल्यात त्या कमलनाथ, अशोक गेहलोत यांच्यावर विश्वास ठेवला.

त्यातही या दोन्ही राज्यांमधील काँग्रेसच्या विजयाचे वैशिष्ट्य असे की दोन्ही ठिकाणी ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांनी जीवापाड मेहनत केली. काँग्रेस संघटनेत जान फुंकली. भाजपसमोर तगडे आव्हान उभे करून विजय अक्षरश: खेचून आणले. पण या तरूण कर्तृत्ववान नेत्यांच्या नशिबी काँग्रेस हायकमांडने वाढून ठेवले काय…?? तर जुनाट खुडूक नेत्यांच्या हाताखाली दुय्यम भूमिकांमधील पदे. ही पदे स्वीकारून या दोन्ही नेत्यांनी काँग्रेस हायकमांडची हुजरेगिरी करायची. या दोन्ही नेत्यांनी काही काळ ऐकलेही. पण जेव्हा अगदीच असह्य झाले तेव्हा बंड करून उठले हे दोन्ही नेते. काँग्रेस नेतृत्वाने या दोघांच्या कर्तृत्वावर केलेल्या अन्यायाविरोधात आहे, हे बंड…!!

ज्योतिरादित्य यांचे ट्विट याच मुद्द्यावर नेमके निशाणा साधते. सचिन पायलटांनी राहुल गांधींची भेट टाळली. पण अहमद पटेल आणि के. सी. वेणूगोपाल यांना भेटून हेच सांगितले, गेहलोतांशी झालेले मतभेद मिटण्यापलिकडचे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणे शक्य नाही. जेव्हा या निर्वाणीच्या निरोपालाही हायकमांडने वाटाण्याच्या अक्षता लावल्या तेव्हा सचिन पायलटांनी बंडाचे निशाण अधिकृतपणे फडकवले. आणि आज सचिन पायलटांना हायकमांडने बाहेरचा रस्ता दाखविला.

आता दोन्ही राज्यांमधल्या सत्तांतर एपिसोडमध्ये भाजपच्या नावाने काँग्रेस नेते कितीही खडे फोडत असले तरी त्यात भाजपचे राजकीय कर्तृत्व कमी, पण काँग्रेस हायकमांडचा करंटेपणा जास्त आहे. हे विसरता येणार नाही. मध्य प्रदेशातल्या सत्तांतराआधीच हायकमांडने धडा शिकायला हवा होता. तो शिकला नाही. मध्य प्रदेशात जे झाले ते नर्मदेला मिळाले. पण त्यानंतरही हायकमांडने काही सुधारणा दाखविली नाही. म्हणून आज राजस्थान घडतेय. याला कारण एकच, बंद तोंड, बंद डोळे बंद कान; पप्पूच्या “कर्तृत्वाने” केली सगळी घाण…!! बाकी काही नाही.

राजस्थानात अशोक गेहलोतांनी “जितं मया” म्हणून जयपूरच्या हॉटेलातून घोषणा केली असली तरी सचिन पायलटांचे सत्याला त्रास दिला जाऊ शकतो, पराभूत नाही करता येत हे ट्विट बरेच काही सांगून जाते. लढाई मोठी आणि दीर्घकाळाची आहे.

आंध्रमध्ये ही लढाई जगनमोहन रेड्डी यांनी पाच वर्षे लढून जिंकली. ज्योतिरादित्यांनी सहा महिन्यांमध्ये जिंकली. सचिन पायलट जिंकण्याच्या मार्गावर आहेत. यातही एक common factor आहे, काँग्रेसमधले तरूण नेते पक्षाच्या बाहेर पडल्यावर नक्की जिंकतात…!! नेहरू – गांधी घराणेशाहीला हरवतात…!!

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था