काँग्रेसचा “सखाराम गटणे” आणि पक्षातले “आण्णू गोगटे…!!”

विनायक ढेरे

पु. लं.चा सखाराम गटणे वाचत होतो. त्यात पुलंनी गटणे हा वडिलांच्या आग्रहाखातर लग्न करायला तयार असल्याचा प्रसंग लिहिलाय, “आता हा वीर जर स्वत: मान कापून द्यायला तयार आहे, तर मी काय जाऊन शत्रूच्या तलवारीला धार काढून देऊ…!!”

काँग्रेसच्या ५० वर्षे वयाच्या तरूण नेतृत्वाचा असाच “सखाराम गटणे” झालाय. तो स्वकर्तृत्वाने काँग्रेसच्या थडग्यावर माती टाकायला निघालाय… तर त्याचे राजकीय विरोधक मौनेंद्र उर्फ मौत के सौदागर, चोर चौकीदार उर्फ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय माती उकरून द्यायला फावडे घेऊन उभे राहावे…?? आणि शेजारी अमित शहांना, नड्डांना कुदळी घेऊन खणायला सांगावे… समजत नाही…!!

राहुल गांधी उर्फ सखाराम गटणे यांना पक्षातले ज्येष्ठ नेते अनुक्रमे सर्वश्री जयराम रमेश, शशी थरूर, आनंद शर्मा, एस. के. एन. सिंह हे वारंवार विनंती करून सांगताहेत ना…, “नका हो, त्या मोदींना सारखे टार्गेट करू. “आपण” {म्हणजे तुम्ही… आपण हा शब्द राहुलजींना उद्देश्यून आदरार्थी वापरला आहे… कंसही मुद्दाम महिरपी वापरला आहे.} मोदींना टार्गेट करता… पण मोदी त्या “टार्गेट”चा खुबीने वापर करून स्वत:कडे जनतेची सहानुभूती वळवतात आणि लोकप्रियता वाढवून घेतात.

परिणामी काँग्रेसला फटका बसतो आणि तो “आमच्या” (म्हणजे वर उल्लेख केलेल्या सर्वश्री नेत्यांच्या… येथे कंस साधा वापरला आहे… लायकीनुसार) फार जिव्हारी लागतो. म्हणून कृपया “आपण” {आधीचे रिपीट करत नाही} मोदींना टार्गेट “करण्या”पेक्षा आपल्या “तरण्या”वर (म्हणजे तरंगत राहण्यावर… म्हणजे politically afloat… होण्यावर…येथे तरण्या या शब्दाचा अर्थ तरण्याताठ्या वगैरे अश्लील कोणी काढू नये.) लक्ष केंद्रीत करा. मोदींपेक्षा त्यांचा पक्ष भाजप, त्याची फसलेली धोरणे, जनतेचे चाललेले हाल यावर लक्ष केंद्रीत करून सरकारला अनुक्रमे सडकून, झोडून आणि ठोकून काढा… म्हणजे जनतेची सहानुभूती मोदींकडे वळणार नाही… हळुहळु का होईना जनता पुन्हा काँग्रेसकडे वळेल… निदान फक्त मोदींनाच टार्गेट केल्याने काँग्रेसचे होणारे नुकसान टळेल… किती हा मौलिक सल्ला… तोही राहुलजींना उर्फ गटणे यांना मोफत मिळालेला…!!

पण राहुलजींचा पुरता “गटणे” झालाय ना…!! त्याच्या जोडीला भगिनी प्रियांका उर्फ “गटणी” येऊन बसली कार्यकारिणीच्या बैठकीत… मग काय होणार या बैठकीत…?? राहुलजी उर्फ “गटणे” यांनी, “आपल्याला” सल्ला देणाऱ्यांचीच अशी काही काढली म्हणता की यंवं…!! म्हणाले, “मी मोदींना अजिबात घाबरत नाही. या देशात जे काही वाईट साईट घडतेय, ते मोदींमुळेच. त्यामुळे मी मोदींवर टीका करणारच… मोदी माझे काहीही वाकडे करू शकत नाहीत…!!” अरे बाप रे…!!

वर उल्लेखलेल्या सर्वश्रींनी यातले शेवटचे उद्गार एेकले मात्र… आणि या चौघांना “वैचारिक भोवळच” आली… ते सगळे एकमेकांकडे पाहात, (मनातल्या मनात) म्हणाले, “तेच तर सांगतोय आम्ही राहुलजी, मोदी तुमचे काहीच वाकडे करत नाहीत… पण ” आपल्याच” बोलण्याने काँग्रेसचे वाकडे होतेय ना… त्याचं काय कारायंच…!!”

पण या चौघांचे हे मनातल्या मनातले “बहुगत” (स्वगतचे बहुवचन… बहुगत) पूर्ण होण्यापूर्वी… या चौघांचा “अाण्णू गोगट्या” करून म्हणजे त्यांचा पोपट पाडून राहुलजी उर्फ काँग्रेसचे सखाराम गटणे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक वैचारिकदृष्ट्या “संपन्न” करून निघून गेले होते…!!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*