“इनसायडर चाणक्य” आणि “भिंतीवरचे चाणक्य”


… पण मूळात शरद पवारांवर विश्वास ठेवलातच कसा…!!


विनायक ढेरे

देवेंद्र फडणवीस यांनी सनसनाटी मुलाखत देऊन पहाटेच्या सत्तानाट्याचे मूळ स्क्रिप्ट सगळे उलगडून दाखवले आहे. पण त्यांच्या मुलाखतीतून वैयक्तिक सल वगैरे जाणवण्यापेक्षा पूर्ण बहुमत मिळवलेल्या महायुतीच्या नेत्यांचे ऐक्य टिकविण्यात आलेले दुर्दैवी अपयश ठळकपणे जाणवते. त्याही पेक्षा या मुलाखतीतून दिसतात ते मुत्सद्देगिरीत कमी पडलेले त्यांचे “चाणक्य”… आधी पवारांवर विश्वास ठेवणारे आणि नंतर विश्वासघात करवून घेणारे तथाकथित “चाणक्य”.

पण मूळात प्रश्न हा आहे, ज्यांच्या ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा इतिहास विश्वासघाताचा आहे त्या शरद पवारांवर विश्वास ठेवलाच कसा? म्हणे मोदींनी निरोप दिला होता काँग्रेसला एकाकी पाडा म्हणून… मग पडली का काँग्रेस एकाकी? शरद पवारांनी पाडले का काँग्रेसला एकाकी? केली का “विश्वासू गुरू” पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा पूर्ण?

नरेंद्र मोदींनी बारामती दौरा केला. त्यांना “गुरूपद” बहाल करून झाले. अरूण जेटलीही बारामतीत जाऊन आले. मग वळले का शरद पवार भाजपच्या बाजूने? शरद पवारांसारख्या विश्वासघातकी नेत्याला convince करायला मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी जेवढी political energy खर्च केली, त्याच्या निम्मी जरी लावली असती ना महाराष्ट्रात पुन्हा सत्ता आणायला आणि उद्धव ठाकरे यांना convince करायला तर ही वेळच आली नसती फडणवीसांवर तथाकथित इनसायडरला मुलाखत देण्याची…!!

बाकी “इनसायडर” हे नाव मुलाखत घेणाऱ्याने आणि मुलाखत देणाऱ्याने निवडलेय ना… ते त्या दोघांनाही शोभणारे नाही. कारण “इनसायडर” हे नाव भारतीय राजकारणातील खऱ्या आधुनिक चाणक्याने आपल्या आत्मचरित्रासाठी निवडले होते, पी. व्ही. नरसिंह राव यांनी…!! पवारांची शामत होती का? या “इनसायडर”चा विश्वासघात करायची? या आधुनिक चाणक्याने पवारांना असे काही जमालगोटे दिले की ते पंतप्रधानपद कायमचे विसरून गेले.

पवारांनी बंडखोरीची थोडी मान उचलताच या चाणक्याने त्यांना दिल्लीतून महाराष्ट्रात पाठवून दिले. महाराष्ट्रात आल्यावर दोन वर्षांत पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा पराभव झाला होता. तरीही पवार करू शकले का त्या चाणक्याचे काही वाकडे..?? होती का हिंमत आणि कुवत त्यांची..?? मग भाजपच्या सर्वोच्च नेत्यांचा ते कसा काय करू शकतात विश्वासघात? याला कारण एकच पवारांवर त्यांनी अतिरिक्त विश्वास ठेवला आणि त्यांना राजकीय लायकीपेक्षा जास्त किंमत दिली. म्हणून आणि म्हणूनच पवार आपल्या मूळ राजकीय स्वभावाप्रमाणे भाजपच्या सर्वोच्च नेत्यांचा विश्वासघात करू शकले.

घरातल्या दिवाणखान्याच्या भिंतीवर चाणक्याचे नुसते चित्र लावून नाही होता येत आधुनिक चाणक्य…!! हेच खरे. पवारांकडून हरताहेत; उद्धव ठाकरेंकडून टोपी घालून घेताहेत… आणि म्हणे चाणक्य.

फडणवीसांच्या मुलाखतीवर राष्ट्रवादीवाले हसताहेत. फडणवीसांच्या प्रत्येक विधानातून ते पवारांच्या ” राजकीय कर्तृत्वाचा” उदोउदो करणारे अर्थ काढताहेत. महायुतीला संपूर्ण बहुमत जनतेने दिल्यानंतर महायुती टिकवण्याची जबाबदारी मोठा भाऊ म्हणून भाजपची होती. उद्धव ठाकरेंना कोणत्याही प्रकारे, अगदी कोणत्याही प्रकाराने convince करण्याची जबाबदारी घराच्या दिवाणखान्यात चाणक्याचे चित्र लावणाऱ्या भाजपच्या “चाणक्यांची” होती. नीट पार पाडली का ती त्यांनी? आता सहा महिन्यांनी मुलाखती देऊन काय उपयोग?

इथे भाजपच्या चाणक्यांच्या अन्य राजकीय कर्तृत्वाला अजिबात कमी लेखण्याचा प्रश्न नाही. ३७०, ट्रिपल तलाक, CAA – NRC, उत्तर प्रदेशाचे निवडणूक व्यवस्थापन, २०१९ लोकसभा निवडणूक व्यवस्थापन हे सगळे राजकीय कर्तृत्व मंजूर… हजार जान से मंजूर. पण मग हेच राजकीय कर्तृत्व महाराष्ट्राच्या बाबतीत कुठे जाते? का पवारांवर जादा विश्वास ठेवतात हे चाणक्य? पवारांचा पुरता मोहळा मोडायला अडचण काय आहे त्यांना? या प्रश्नांची तोंडी नव्हे, राजकीय कृतीतून उत्तरे दिली पाहिजेत चाणक्यांनी… तर मानू…!!

देवेंद्र फडणवीसांचे सरकार पूर्ण पाच वर्षे चालले होते. भले शिनसेनेने भरपूर कुरबुरी केल्या असतील, त्यांनी मधूनच नव्हता घेतला सरकारचा पाठिंबा काढून. पण पवारांनी पाठिंबा दिलेले एकतरी सरकार टिकलेय का संपूर्ण काळ? विचारा पृथ्वीराज चव्हाणांना. तरीही भाजपवाले पवारांवर विश्वास ठेवायला निघाले होते म्हणे… कमाल आहे, त्यांच्या राजकीय जाणकारीची…!!

आणखी एक कमाल, या भाजपवाल्यांना म्हणे राहुल गांधींचे कान टोचायला शरद पवार लागतात. पवारांनी सर्वपक्षीय बैठकीत राहुलचे कान टोचले. त्यांना आंतरराष्ट्रीय करार वगैरे समजावले की झाले हे भाजपवाले खुष. वा रे आमचे संपूर्ण बहुमतातले राज्यकर्ते. १४% वाल्या राहुलला वठणीवर आणायला ७२% वाल्या मोदींना या टक्केवारीत कुठेच नसणारे शरद पवार लागतात. वा रे मुत्सद्दी…!!

नरसिंह रावांकडून मुत्सद्देगिरीचे धडे घेणे तर दूरच. त्यांच्या चाणक्य कॉलेजमध्ये जायला अजून भरपूर वेळ आहे. आधी निदान प्रणवदांच्या चाणक्य शाळेत तरी प्रवेश घेऊन शिका थोडी मुत्सद्देगिरी आणि सरकार स्थापन करायची आयडिया… ते आणि अशोक चव्हाण देतील तुम्हाला २००४ सारख्या टिप्स…!! कशी हेकडी काढली होती त्यांनी त्यावेळी पवारांची… हे समजावून घ्या. बघू या ते तरी जमतंय का “भिंतीवरच्या चाणक्यांना…!!” हे जमले तर इनसायडर मुलाखती देण्याची वेळ नाही यायची फडणवीसांवर…!!

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था