इंदिराजींचे विश्वासू ते मोदींचे मार्गदर्शक; राजकीय उदारमतवादाचे प्रतिक

पंतप्रधान इंदिरा गांधींचे विश्वासू सहकारी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दिल्लीतले मार्गदर्शक असा प्रणवदांचा संपन्न राजकीय प्रवास राहिला आहे. राजकीय उदारमतवाद आणि गुणवत्ता राखून काम हे त्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य ठरले आहे.


विनायक ढेरे

राजीव गांधींच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीतला पाच वर्षांचा राजकीय विजनवास सोडला तर प्रणवदा कायम दिल्लीतील राजकारणाचा एक ध्रुव राहिले. मध्यवर्ती भूमिकेत अर्थात पंतप्रधानपदी दीर्घकाळ राहण्याची क्षमता असूनही ते पद त्यांच्यापासून दूर ठेवण्यात आले. काँग्रेसी दरबारी राजकारणाचा तो अस्सल नमूना होता. प्रणवदा काँग्रेसनिष्ठ होते, पण दरबारी नव्हते. अंगभूत राजकीय गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी पदे भूषविली. त्या पदांचा राजकीय सन्मान आणि गरिमा वाढविली.

पाच दशकांहून अधिक त्यांची राजकीय कारकीर्द आहे. इंदिराजींसारख्या कसलेल्या पंतप्रधानांचा विश्वास कमावणे सोपी गोष्ट नव्हती. ती त्यांनी राजकीय गुणवत्तेच्या जोरावर वयाच्या चाळीशी – पन्नाशीत साध्य केली होती. १९८२ पासून कायम केंद्रीय राजकारणात राहिलेल्या प्रणवदांनी परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, वाणिज्य मंत्री आणि अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. इंदिराजींच्या मंत्रिमंडळातील ते तरूण सदस्य होते.

इंदिराजींनी आपल्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कारकिर्दीत मागील पिढीतील यशवंतराव चव्हाण, स्वर्णसिंग, बाबू जगजीवन राम यांना बाजूला सारायचे ठरविले त्यावेळी त्यांच्या समोर प्रणवदांच्या रूपात समर्थ पर्याय उभा राहिला होता. त्यामुळेच प्रणवदांना वयाच्या ४५ व्या वर्षी इंदिराजींनी अत्यंत विश्वासाने अर्थमंत्रीपद दिले. आर्थिक शिस्तीला प्रणवदांनी प्राधान्य दिले होते. डॉ. मनमोहन सिंग त्यावेळी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर होते.

इंदिराजींच्या हत्येनंतर काँग्रेसमध्ये नेतृत्व प्रणवदांकडे येणे अपेक्षित होते. पण त्यावेळी कोलकत्यात असलेले प्रणवदा यांना दिल्लीतील “घडामोडींमुळे” संधी देण्यात आली नाही. काँग्रेसमधील “कोटरीने” राजकीय कौशल्य वापरून राजीव गांधींना पंतप्रधान केले. प्रणवदांना बाजूला करण्यात आले. प्रणवदांची राजकीय नेतृत्व करण्याची क्षमता राजीव गांधी आणि कोटरीने जोखली होती म्हणूनच त्यांना बाजूला करण्यात आले. ही दारूण असली तरी राजकीय वस्तुस्थिती होती.

राजीव गांधींच्या रोषामुळे सुमारे पाच वर्षे प्रणवदांना राजकीय विजनवास सहन करावा लागला. राजीव गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी प्रणवदांची गुणवत्ता ओळखून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले. त्यांना नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष केले. नंतर वाणिज्य मंत्रीही केले. या काळानंतर मात्र प्रणवदांनी काँग्रेस संस्कृतीनुसार काँग्रेसच्या वेळोवेळी आलेल्या नेतृत्वाशी राजकीयदृष्ट्या जमवून घेतले.

२००४ मध्ये यूपीए सरकार आल्यानंतर प्रणवदांना पंतप्रधानपद मिळण्याची अटकळ बांधली जात होती. परंतु, सोनिया गांधी या राजीव गांधींचा प्रणवदांवरचा रोष विसरल्या नाहीत. पुन्हा एकदा प्रणवदांची राजकीय नेतृत्व करण्याची गुणवत्ता डावलण्यात आली. ही कडू राजकीय गोळीही प्रणवदांनी पचविली. सोनियांनी डॉ. मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून निवड केली. त्यावेळी प्रणवदांना दोन नंबरचे पद मिळाले पण त्यावेळी त़्यांना अर्थखाते देण्यात आले नाही. ते खाते त्यांना यूपीए २ मध्ये देण्यात आले. प्रणवदांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी उत्तम जुळवून घेतले. त्यांनी काँग्रेस संस्कृतीप्रमाणे गांधी घराण्याचे लांगुलचालन केले नाही. पण गांधी घराण्याशी त्यांनी “राजकीय पंगा” घेणे टाळले. ही देखील राजकीय वस्तुस्थिती आहे.

२००९ नंतर यूपीए २ च्या कारकिर्दीत प्रणवदांवर एक कामगिरी सोपविण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी जपानच्या रेंकोजी मंदिरात ठेवण्यात आल्याचे मान्य करून त्या स्वीकाराव्यात यासाठी त्यांनी सुभाषबाबूंच्या पत्नी एमिली शेंकेल यांना convince करण्याचा प्रयत्न केला. सुभाषबाबूंच्या मृत्यूसंबंधीचा वाद मिटविण्यासाठी त्यांना ही भेट घेण्यासाठी सांगण्यात आले होते. २०१२ मध्ये त्यांना यूपीएने सन्मानाने राष्ट्रपती केले. डॉ. मनमोहन सिंग मंत्रिमंडळातील सहकारी आणि नंतर राष्ट्रपती या दोन्ही भूमिकांमध्ये प्रणवदांनी कामाचा ठसा उमटवला.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर भारताचा राजकीय पट बदलला. या राजकीय पटावर देखील प्रणवदांनी उत्तम भूमिका वठवली. नरेंद्र मोदींना “दिल्ली” समजावून सांगत त्यांना दिल्लीत establish करण्याचे काम प्रणवदांनी केले. दिल्लीचे राजकीय, प्रशासकीय, नोकरशाहीचे ताणेबाणे प्रणवदांनी मोदींना सांगितले. मोदींनी याबद्दल त्यांना कायमच सन्मान दिला.

देशाच्या राजकारणाचा काटा उजव्या विचारसरणीकडे झुकल्यावर नव्या राजकीय पटावर नव्या भूमिकेतून प्रणवदांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग मुख्यालयाला भेट दिली. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या जन्म स्मारकात जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली.

संघाच्या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी काँग्रेस – गांधी – नेहरू विचारांचाच पुरस्कार केला. पण संघाविषयीचे काँग्रेसचे “राजकीय दूरीकरण” त्यांनी स्वीकारले नाही. काँग्रेसमधून झालेली टीका सहन केली. प्रगल्भ राजकीय विचारांचा तितक्याच प्रगल्भ राजकीय विचारांनी विरोध हे सूत्र प्रणवदांनी अंगिकारले. आक्रस्ताळा आणि उथळ विरोध मान्य नसल्याचे प्रणवदांनी न बोलता राजकीय कृतीतून दाखवून दिले. आपले ठाम राजकीय विचार संघाच्या व्यासपीठावर येऊन मांडणारे ते पहिले माजी राष्ट्रपती ठरले. राजकीय उदारमतवादाचे ते सध्या दुर्मिळ झालेले उदाहरण होते. मोदी सरकारने त्यांचा भारतरत्न देऊन गौरव केला. हा या उदारमतवादाचाच पुढचा टप्पा होता.

प्रणवदांचा भारतरत्न किताबाने सन्मान होत असताना राष्ट्रपती भवनातील सोहळ्यात गांधी परिवार उपस्थित नव्हता ही घटना बरेच काही “राजकीय संचित” मागे सोडून गेली आहे. देशाच्या इतिहासात त्याची नोंद होईल.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*