गेम चेंजर शेगडी; गोष्ट एका साध्या शेगडीने आणलेल्या आमूलाग्र परिवर्तनाची


म्हटले तर साधी गॅसची शेगडी. तंत्रज्ञानाच्या या युगात तिचे काय मोल असणार असा प्रश्न कोणाच्याही मनात येईल. पण श्रीमंत, मध्यमवर्गीय कुटुबांत लहानाचे मोठे झालेल्यांना याचे मोल कदाचित कळणार नाही. ते जाणून घ्यायचे असेल तर पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून गॅस शेगडी मिळालेल्या माता – भगिनींना आवर्जुन भेटा. गॅसच्या निळाशार ज्योतीवर स्वयंपाक करताना त्यांचा चेहरा कसा आनंदाने फुलून जातो, हे पाहणे खरेच एक सुखद असा अनुभव असतो. गॅससारखी म्हटले तर एक छोटीशी बाब महिलांसाठी कशी गेमचेंजर ठरू शकते हे उज्ज्वला योजनेने दाखवून दिले आहे.


कलावती नाशिककर

भारतात प्रत्येक ठिकाणचीच नव्हे तर प्रत्येक घरातली पहाटही वेगवेगळी उजाडते. शहरातली आणि गावाकडची पहाट वेगळीच असते. शहरातील चांगल्या चार भिंतीच्या घरातील महिला सकाळी लवकर उठली की तीची धावपळ सुरू होते. घरात असणाऱ्या काचेच्या काळ्या चकचकीत चार बर्नरच्या गॅस शेगडीवर चहाचं पातेलं ठेवलं आणि खालचं बटन फिरवलं की आपोआप निळी ज्योत येते आणि चहा उकळू लागतो. अशाच पद्धतीनं चारही शेगड्यावर पोळी, भाजी कुकर आणि दुधही पटकन गरम होतं. स्वयंपाक आवरल्यावर त्या घरातली महिला संसारासाठी चार पैसे कमवायला बाहेर जायला पटकन मोकळी होते. हीच परिस्थिती संध्याकाळचीही. आल्या आल्या डाळ भाताचा कुकर लावला की एकीकडे गरम पोळी प्रत्येकाच्या ताटात पडली की हिच महिला मनोरंजनासाठी टिव्हीसमोर बसू शकते किंवा विश्रांती घ्यायला रिकामी होते. हे सारं झटपट काम कशामुळं शक्य होतं. तर तीच्या घरात असणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या शेगडीची ही कमाल असते. घरातील गॅसशेगडी सारखी वस्तू सुद्धा इतकी महत्त्वाची असू शकते की ज्यामुळे घरातल्या महिलांचे जीवन समृद्ध होवू शकते. याची कल्पना ज्यांच्या घऱात पहिल्यापासून गॅस आहे त्यांना कदाचित येणार नाही.

आता एखाद्या ग्रामीण भागातील महिलेच्या घरात जरा डोकावा. काय करते ही बाई उठल्या उठल्या हे पहा. आदल्या दिवशी  रानावनात लांबवर जाऊन आणलेला काट्या कुटक्या मोडायला सरू करते. जर घरात एखादी गाय, म्हैस असेल तर त्याच्या शेणापासून केलेल्या गोवऱ्या घरात असतात. जर घरात गाय, म्हशीसारखी जनावरे नसतील तर शेताकडे जाता येता रस्त्यावर पडलेले शेण ती गोळा करते आणि त्याच्या गोवऱ्या करते. यातली एखादी गोवरी घेते आणि त्याची खांडे करून चुलीत ठेवते. त्यावर चुलीच्या शेजारीच ठेवलेल्या चिमणीतले केरोसिनचे दोन चार थेंब टाकते. त्यावर काटक्या ठेवते. काडेपेटीतल्या एक दोन काड्या ओढते आणि चूलीत टाकते. तेव्हा कुठे थोडा जाळ लागतो. हा जाळ विझू नये म्हणून हाताशी फुंकणी घेऊन जोरा जोराने यातून फुंकते तेव्हा कुठे चुलीतल्या सरपणाने पेट घेतलेला असतो. हे सारे होईतोपर्यंत अर्धवट पेटलेल्या जाळामुळे तिचे सारे घर धुराने भरलेले असते. चुलीपुढे बसून खोकता खोकताच बुड काळ्या झालेल्या पातेल्यात ती चहाचे आंदण ठेवते आणि मग कुठे चहा पिते. हे सगळे होईपर्यंत अजून पहाटही झालेली नसते. बाहेर काळोखच असतो. चांदणेही दिसत असतेच. तीने केलेल्या धुरामुळे तीच्या घरातले तीचे पोर किंवा नवरा खोकतच जागे होतात आणि कुस बदलून उजेड आला कि नाही याचा अंदाज घेत झोपी जातात. घरातली ही कर्ती सवरती बाई वाईलावर भाजी आणि चुलीवर भाकरी टाकता टाकताच हाताने चुलीतला जाळ पुढे सरकवत असते. मध्ये कुणी उठले तर त्याचे चहा पाणी. हे सारे करू तोपर्यंत दिड दोन तास जातात. स्वयंपाक संयम बघत संपतो. मात्र आता त्या चुलीच्या धूरामुळे झालेली काळी कुट्ट भांडी घासायची वेळ असते. ही भांडी स्वच्छ करण्यासाठीही बळ आणि वेळ दोन्ही खर्ची पडते. दिवस सुरू व्हायच्या आधीच दमलेली ही बाई दमलेपणीच कामाला बाहेर पडते. कष्ट मात्र पिच्छा सोडतच नाहीत. रात्रीच्या जेवणालाही हा सोपस्कार ठरलेलाच. त्यातून जर पावसाळा असेल तर मग विचारायलाच नको. पावसाळ्यात लागणाऱ्या जळणाचीही तजवीज तिलाच करावी लागते. विचार केला तर लक्षात येते की कुटुंबाच्या तोंडात दोन घास पडण्यासाठी तिची किती करसत होते.

असा हा कष्टमय दिवस तीच्या वाट्याला एकदा दोनदा नाही तर आयुष्यभर व्यापून राहिलेला असतो. २४  तासांपैकी हिचे पाच ते सहा तास तरी या जगण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक गोष्टीतच जातात. मग तिने स्वतःचे आणि कुटुंबीयांचे राहणीमान उंचवण्यासाठी कष्ट तरी किती आणि कधी करावेत?

जगाचा विचार केल्यास तब्बल दोन अब्ज 70 लाख लोक म्हणजे ४० टक्के लोकसंख्या आजही स्वयंपाकाच्या इंधनासाठी लाकूड, कोळसा आणि गोवऱ्या यांच्यावरच अवलंबून आहे. हातावर पोट असलेल्या या लोकांच्या हाती चांगले इंधन विकत घेण्याइतका पैसाच नसतो. त्यामुळे नाईलाजाने ते हे इंधन वापरतात. आजही भारताच्या दहा कोटी कुटुंबांकडे स्वयंपाकासाठी लागणारे स्वच्छ इंधन उपलब्ध नाही. केंद्रिय सांखिकी विभागाच्या आकडेवारीनुसार भारतातील ग्रामीण भागात तब्बल ६७ टक्क्यांहून जास्त घरात आजही चुलीवरच स्वयंपाक होतो. २०११ च्या जनगणनेनुसार ग्रामीण आणि शहरी क्षेत्राचा विचार करता दोन्ही मिळून ४९ टक्के घरात लाकूडफाटा जळणासाठी वापरला जातो. १६.८ टक्के घरात पिकांची धाटे, मागे उरलेल्या मुळ्या आदींचा वापर केला जातो. एलपीजी गॅसचा विचार करता ६५.७ टक्के लोक एलपीजीवर अवलंबून आहेत. म्हणजेच पुन्हा एकदा आपण ६५.८ टक्क्यांपर्यंत पोहोचतो.

रोजच्या वापराची इंधनाची ही कमतरता महिलांवर मात्र सूडच उगवणारी ठरते. जळण काटूक गावाजवळ मिळत नाही, म्हणून तासन् तास उन्हातान्हात पायपिट करावी लागते. जळण शोधण्यासाठी जायचे म्हटलं तर घरचे काम लवकरात लवकर उरकावे लागते. त्यासाठी भल्या पहाटेच उठावे लागते. घरातला कर्ता माणूस कामाला जायचा असतो. पुरूषप्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळे घरात मुलगा असला तरी तो ही पायपीट करायला तयार नसतो, किंबहुना घरच्यांना वाटत असते कि तो शिकायला हवा. तेव्हा ही सारी जबाबदारी घरात असणाऱ्या लहान मोठ्या पोरींवर येऊन पडते. वीज, उर्जा उपलब्ध नसेल तर तुमच्या जगण्याची प्रतच बदलून जाते. खेड्यातील कुटुंबे आपल्या मुलींना शाळेत पाठवत नाहीत. कारण या मुलींना लाकूडफाटा जमवण्यासाठी दिवसभर वणवण फिरावे लागते.

इंधन, महिला आणि कामाचे तास 

  इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे कष्ट मोजण्याची समाजाची रित. जर एखाद्या पुरूषाने कष्ट केले तर ते आपल्या समाजात ते काम ठरते. पण एखाद्या महिलेने काम केले तर ते मात्र ते काम ठरत नाही तर तिचे ते घरासाठीचे कर्तव्य असते. आजही बाईमाणसाने केलेले काम आणि पुरूषाने केलेले काम जोखण्याचीही वेगवेगळी रित आहे. हा दुजाभाव प्रत्येक घरात पहायला मिळतो. महिलांसंबंधी विविध बाजूने साकल्याने विचार करणाऱ्या तज्ञांच्या मते जोपर्यंत कष्टाच्या मूल्याचे मापन होत नाही तोपर्यंत त्याची नोंद घेतली जात नाही.

कर्नाटकातल्या ग्रामीण भागाचा अभ्यास असे सांगतो की ग्रामीण भागातल्या महिला या दिवसातले 8 तास 73 मिनिटे केवळ घरचे काम करण्यासाठी वापरतात. त्यापैकी प्रत्येक दिवशी 55 ते 171 मिनिटे त्या स्वयंपाकासाठी घालवतात. दोन अडीच तास जळण वेचण्यात तर बाकीचा वेळ पिण्याचे पाणी, खर्चाचे पाणी, घरातल्या मुलाबाळांची देखभाल, इतर कामे करण्यासाठी वापरतात. याशिवाय घरात जनावरे असतील तर त्यांच्या देखभालीसाठी, त्यांना चारा पाणी घालण्यासाठी, दुध दुभत्यासाठी दोन अडीच तास देतात. हा अभ्यास एका विरोधाभासावर चपखलपणे बोट  ठेवतो. तो सांगतो की जेव्हा घरातल्या कर्त्या पुरूषांचे कामाचे १०० तास मोजले जातात तेव्हा त्यातले ७४ तास खरंतर बाईमाणसाने केलेल्या कामाचे असतात.

तमिळनाडूमध्ये नुकत्याच झालेल्या अभ्यासात असे दिसून आले की महिला या सर्वसाधारणपणे स्वयंपाकासाठी दोन ते पावणे तीन तास स्वयंपाकासाठीच्या कामात वेळ घालवतात. याशिवाय सरपण गोळा करण्यासाठी म्हणून दोन अडीच तास घालवतात. शहरातही ही स्थिती आढळते. शहरातील गरिब महिलांना याचा फटका बसतो. दिल्लीसाठी केलेल्या एका अभ्यासावरून  दिल्लीत झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलासुद्दा इंधनासाठी लागणारे सरपण गोळा करण्यावर दर दिवशी दोन तास घालवतात.

वरील सर्व संदर्भांचा विचार केला तर लक्षात येईल की ग्रामीण भागातील जवळपास ८० टक्के महिलांचा वेळ सरपण गोळा करण्यात जातो. महिलांचा मूळातला प्रश्न आहे, तो म्हणजे वेळेची गरीबी. विकसनशील देशांतील महिला या रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या कामातच इतक्या बेजार असतात की त्यांना शिक्षण, आरोग्य, काही छंद जोपासायला वेळच मिळत नाही.

चूलीचा धूर धोकादायक 

चुलीत जळणा-या या अस्वच्छ इंधनातून निघणा-या धुराचा महिला व आणि त्यांच्या लहान मुलांच्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो. जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवाल सांगतो की हा धूर श्वसनाद्वारे शरीरात जाणे म्हणजे एका तासात ४०० सिगारेट ओढण्यासारखे आहे. महिला किमान दोन तास सकाळी आणि दोन तास रात्री या धुराच्या सानिध्यात येतात. म्हणजे एका दिवसात १६०० आणि वर्षाला ५ लाख ८४ हजार सिगारेट ओढणे होय. याचाच परिणाम म्हणून  दमा आणि श्वसनाच्या इतर आजारांना महिला बळी पडतात.

लॅन्सेट या वैद्यकिय क्षेत्रात दबदबा असलेल्या मासिकाने  बनवलेल्या अहवालानुसार भारताचा विचार करता पाच वर्षाच्या आतील चाळीस लाख बालकांचा मृत्यू स्वयंपाकाच्या इंधनाच्या धुराने झालेला आहे, असे आकडेवारी सांगते. घराच्या आतील असणारे हे हवेचे प्रदुषण मुख्यत  पाच वर्षाच्या वयोगटातील मुलांमध्ये  तीव्र श्वसनासंबंधीत आजार, महिलांना फुफुसाचे रोग आणि जे कुणी कोळसा इंधन स्वरूपात वापरत असतील त्यांच्यात फुप्फुसाचा कर्करोगला आमंत्रण देणारे ठरते. याशिवाय वेळेच्या अगोदर मुल जन्माला येणे,  मुलाचे वजन कमी होणे, मोतीबिंदू, दमा, क्षयरोग यासारखे आजारही  या घरातल्या हवेच्या प्रदुषणामुळे होऊ शकतात. यामुळे आता स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनासंबंधीही विचार व्हायला हवा.

सरकारचे महत्वाकांक्षी पाउल

महिला आणि चूल शिवाय तीचे या चूलीला लागणाऱ्या इंधनासाठीचे कष्ट लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अत्यंत महत्वाकांक्षी अशी पंतप्रधान उज्वला योजना सुरु केली. 1 मे 2016 रोजी उत्तर प्रदेशातील बलिया येथे या योजनेचा प्रारंभ करताना मोदीजी म्हणाले होते, “देशवासियांपुढे आज मी नतमस्तक होऊन सांगू इच्छितो, तुम्ही गॅसचे अनुदान सोडल्यास ते मी त्या गरीब आईला देईन, ज्या गरीब आईला चुलीतील धुराच्या सान्निध्यात मुलांसोबत रहावे लागत आहे. त्या गरीब आईच्या शरीरात एका दिवसात ४०० सिगारेटी इतका धूर जातो. त्या आईच्या आरोग्याचे काय होत असेल.. तुम्ही तुमचे अनुदान सोडा मी ते सिलेंडर त्या गरीब आईला देऊ इच्छितो. जी तुम्हा आम्हासाठी चुलीवर जेवण बनवते तीचे आरोग्य सांभाळले जाईल.”

उज्वला योजनेचा उद्देश

 या महत्त्वाकांक्षी योजनेचा उद्देश  महिला आणि समाज यांच्या उत्थानाशी निगडीत आहे. अगदीच नेमकेपणाने सांगायचे तर उज्वला योजनेची उद्दीष्ट्ये समजून घ्यावी लागतील. ती अशी:

  1. महिलांना शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या आरोग्याची परिस्थिती सुधारणे.

  2. जैविक इंधनामुळे होणारे आरोग्यासंबंधीत गंभीर आजार आणि मृत्यूदर कमी करणे.

  3. भारतात स्वयंपाकासाठी लागणाऱे इंधन अशुद्ध स्वरूपात वापरल्याने  होणा-या मृत्यूंची संख्या कमी करणे.

  1. खेड्यामध्ये ब-याचदा आई स्वयंपाक करताना तीची मुलेही तीच्या शेजारीच असतात. त्यामुळे ती सुद्धा घराच्या आत धुरामुळे होणा-या प्रदुषणामध्येच श्वास घेतात.  यातून श्वसनासंबंधी आजार होऊ शकतात. तेव्हा लहान मुलांना श्वसनासंबंधी होणा-या अनेक विकारांपासून वाचवणे हा सुद्धा महत्त्वाचा उद्देश या योजनेपाठी आहे.

  2.  याचबरोबर ही योजना सामाजिक आणि कल्याणकारी योजना आहे. भारताचा विकास करण्यात आणि भारताला सक्षम करण्यास ही योजना मदत करेल.

        आज या योजनेच्या माध्यमातून अवघ्या चार-साडेचार वर्षांत दारिद्र्यरेषेखालील सव्वा आठ कोटींहून अधिक कुटुंबांना गॅस जोडण्या मोफत देण्यात आल्या आहेत. योजनेचे स्वागत फक्त दारिद्य रेषेखालील लोकांनी केले असे नाही तर श्रीमंत आणि मध्यमवर्गानेही याचे कौतुक केले. महिलांचा, त्यांच्या आरोग्याचा आणि त्यांच्या कष्टाचा कालावधी याचा विचार केलेल्या या योजनेला सर्वांनीच आपापल्या परीने पाठिंबा दिला.  स्वच्छ शुद्ध हवा, पर्यावरणचा मुद्दा या योजनेच्या पाठीमागचा विचार आहे. तसा महिलांच्या कामांच्या तासाचा हिशेबही यापाठीमागे आहे. तेव्हा कधी नव्हे इतकी बाईमाणसाच्या कष्टाची दखल या योजनेमागे घेण्यात आली आणि तीच्या कष्टाचा भार काही प्रमाणात का होईना या योजनेमुळे कमी होईल, याची काळजी योजनेच्या दृष्टीने घेण्यात आली.

 ही योजना अनेकांगाने महत्त्वाची आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीबांना मदत करण्यासाठी समाजातल्या अनेक मध्यम, उच्चमध्यमवर्गीयांनीही या योजनेला हातभार लावला आहे. दारिद्य रेषेखालच्या कुटुंबांना लाभ मिळावा म्हणून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी गरज नसेल त्यांनी एलपीजी गॅसवरील सबसिडी सोडण्याचे आवाहन देशातील सर्व नागरिकांना केले. मोदींनी आवाहन केल्यानंतर, देशभरातील १ कोटी वीस लाख कुटुंबांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल १६ लाख ४२ हजार कुटुंबांनी एलपीजी गॅसचे अनुदान न घेण्याचा निर्णय घेतला. मोदींजींच्या आवाहनाला देशभरातील जनतेसोबतच महाराष्ट्रातील जनतेनेही मोठा प्रतिसाद दिल्याचं समोर आलं.

या निमित्ताने इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसली. पंतप्रधानांनी आवाहन करावे आणि जनतेने त्यांना भरभरून प्रतिसाद द्यावा असे पुन्हा एकदा घडले. पुन्हा एकदा म्हणण्याचे कारण असे की तत्कालीन पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या कार्यकाळात अन्नधान्याची कमतरता निर्माण झाली होती. यावर अमेरिकेकडे मदत मागितली असता अमेरिकेने काही अटी समोर ठेवल्या. मात्र या अटी स्वीकारल्या असत्या तर भारताचा स्वाभिमान दुखावला गेला असता.  त्यावेळी शास्त्रींजींनी एक दिवसाचा उपवास स्वत: केला आणि आपल्या कुटुंबाला करायला लावला. एक दिवस आपण भूक सोसू शकतो याची खात्री पटल्यावर त्यांनी पुर्ण देशाला आवाहन केले. ते म्हणाले, आपल्या देशाला संकटातून वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने एक दिवसाचा उपवास करा. यामुळे आपण पुढची सुगी येईपर्यंत तग धरू शकू. या आवाहनाला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. लहान –थोरांनी, गरीब -श्रीमंतांनी या आवाहनाला अनुसरून एक दिवसाचा उपवास केला. त्यामुळे भारताला दुसऱ्या कोणत्याही देशाकडून अन्न धान्य घेण्याची गरज भासली नाही आणि भारताचा स्वाभिमान राहिला.

अंत्योदयची अंमलबजावणी 

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी अंत्योदयाचा विचार मांडला. खऱ्या अर्थाने मदतीची ज्याला गरज आहे, जो मदतीपासून वंचित आहे त्याला सर्वप्रथम मदत केली पाहिजे हा या विचाराचा मुळ गाभा आहे. या दृष्टीने उज्ज्वला योजना अत्यंत महत्त्वाची ठरते. ही योजना महिलांसाठी तर महत्त्वाची आहेच पण समाजाच्या सर्वांत गरजू व गरीब वर्गाच्यादृष्टीनेही ती अत्यंत महत्त्वाची आहे.

उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने खऱ्या अर्थाने दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदयाच्या विचाराची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या योजनेमुळे समाजाच्या शेवटच्या घटकाला विकासाची फळे चाखायला मिळू लागली आहेत. आज देशात सुमारे २७ कोटी कुटुंबे आहेत. उज्ज्वला योजना सुरू होण्याआधी सुमारे तेरा कोटी कुटंबाकडे गॅसची शेगडी होती. किंवा स्वयंपाकासाठी ते गॅस वापरत होते. उरलेली बारा कोटी कुटुंबे लाकूडफाटा वापरून दिवसाची गुजराण करीत असत. यातील अधिकांश कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील असल्याने त्यांची गॅस विकत घेण्याची क्षमताच नव्हती. त्यामुळे त्या कुटुंबांचे त्याहीपेक्षा त्या घरातील महिलांचे आयुष्य अत्यंत कष्टमय असे बनले होते.

एकंदरीत या योजनेतले अत्यंत महत्त्वाचे मुद्दे हे आरोग्य, पर्यावरण आणि आर्थिक वाढीशी निगडीत आहेच शिवाय एकमेकात गुंतलेले आहेत. या योजनेमुळे महिलेच्या हाती स्वयंपाकासाठी स्वच्छ आणि तात्काळ उपलब्ध होणारी उर्जा येते. धूररहित इंधन हाती आल्याने महिलांचे पर्यायाने समाजाचे स्वास्थ्य तर टिकतेच, शिवाय त्यांची प्राथमिक कामे झटपट आवरतात. उरलेल्या वेळेचा त्या सदुपयोग करू शकतात. त्या आपल्या वेळाचा उपयोग कुटुंबासाठी, कुटुंबाच्या आर्थिक वाढीसाठी देऊ शकतात. म्हणजेच पर्यायाने ही योजना महिला सशक्तीकरणासाठी अत्यंत महत्त्वपुर्ण ठरते. या योजनेमुळे महिलांचे सारे जीवनच खऱ्या अर्थाने बदलून गेले आहे. त्यांच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन झाले आहे.खरंच गॅसच्या या निळ्या ज्योतीने कोटयवधी महिलांच्या आयुष्यात कमाल केली आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात