राजकीय हत्यांचे नंदनवन म्हणजे पश्चिम बंगाल- संबित पात्रा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : एकेकाळी देशाला दिशा देण्याचे काम पश्चिम बंगाल करीत असे. मात्र ममता बॅनर्जींच्या राजवटीत बंगाल हा राजकीय हत्यांचे नंदनवन झाले आहे, असा घणाघात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांना सोमवारी पत्रकारपरिषदेत केला.

गेल्या २ महिन्यात भाजपच्या ८ कार्यकर्त्यांच्या हत्या तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी केल्या आहेत. नुकतीच उत्तर २४ परगणा जिल्ह्यात भाजपचे नगरसेवक मनिष शुक्ला यांची हत्या तर पोलिस स्टेशनसमोर करण्यात आली आहे.

दररोज किमान एका भाजप कार्यकर्ता – नेत्याची हत्या करणे हेच ममता बॅनर्जींचे धोरण झाले असून आतापर्यंत भाजपच्या ११५ कार्यकर्ते आणि नेत्यांचे बळी घेतले गेले आहेत. एकेकाळी बुद्धिवाद्यांचे आणि देशाला दिशा देणारे राज्य अशी बंगालची ओळख होती. मात्र, अगोदर डावे पक्ष आणि आता तृणमूल काँग्रेसने बंगालची ओळख राजकीय हत्यांचे नंदनवन अशी केली आहे. ममता बॅनर्जींच्या राज्यात राजकीय हत्या म्हणजे ‘न्यू नॉर्मल’ ठरत आहेत. अन्य राज्यांमध्ये लक्ष घालणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी स्वत:च्या राज्यातील अराजकाबद्दल बोलावे, असा टोला पात्रा यांना लगावला.

राजस्थानमध्ये दर दोन दिवसांनी बलात्काराची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे निवडक राजकीय पर्यटन करणाऱ्यांनी राजस्थानमध्येही जावे, असा टोलाही त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी – वाड्रा यांचे नाव घेता पात्रा यांनी हाणला. बिहारमध्येदेखील शक्तीकुमार या दलित नेत्याच्या हत्येमध्ये रादजचे तेजप्रताप आणि तेजस्वी यादव यांचा हात असल्याचा आरोप शक्तीकुमार यांच्या पत्नीने केला आहे. तसे त्यांनी एफआयआरमध्येही सांगितले आहे. त्यामुळे निवडक राजकीय विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांनी अगोदर स्वत:ची स्थिती बघावी, असेही पात्रा म्हणाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*