शी जिंगपिंग यांना २०२० च्या अखेरीस राजीनामा द्यावा लागेल; माजी परराष्ट्र सचिव दीपक वोरांचे धक्कादायक भाकित

  • चीनमधील प्रचंड असंतोष रोखण्यापलिकडचा; अमेरिका, युरोप पाठोपाठ आफ्रिकन देशही चीन विरोधात जातील; चीनी माओवादी कम्युनिस्ट पक्ष मोडून पडेल
  • भारताचे आक्रमक राजकीय नेतृत्व, नोकरशाही, सैन्य दले आणि परराष्ट्र मुत्सद्देगिरी चारही स्तंभांचा मिलाफ ४० वर्षांच्या सेवेत प्रथमच अनुभवतोय

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनच्या घसरणीला वेगाने सुरवात झाली आहे. तिथे येत्या वर्षाअखेरपर्यंत प्रचंड असंतोष उफाळून येईल. चीनी माओवादी कम्युनिस्ट पक्ष इतिहासजमा होईल… आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चीनचे सर्व शक्तिमान नेते शी जिंगपिंग यांना “प्रकृतीच्या कारणास्तव” राजीनामा द्यावा लागेल, अशी एका पाठोपाठ धक्कादायक भाकिते केली आहेत, भारताचे माजी परराष्ट्र सचिव दीपक वोरा यांनी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अचानक लेह – लडाख भेटीबाबत News x वाहिनीशी बोलताना त्यांनी आणखीही काही भाकिते केली. त्याच बरोबर आजच्या ताज्या आंतरराष्ट्रीय व्यूहरचनेवर देखील प्रकाश टाकला.

दीपक वोरा हे काही कोणी ज्योतिषी नाहीत.

परराष्ट्र सेवेतील त्यांची निम्म्याहून अधिक वर्षे काँग्रेसच्या सत्ता काळात व्यतीत झाली आहेत. तरीही “मी भाकित करण्याचे धाडस करतोय. कारण ४० वर्षांचा परराष्ट्र सेवेतला अनुभव माझ्या गाठीशी आहे”, असे त्यांनी स्वत:च नमूद केले. गरज असेल तेव्हा आणि दुसरा वरचढ ठरेल तेव्हा चीनी गुडघे टेकतात, असे अनुभवही त्यांनी कथन केले.

दीपक वोरा म्हणाले, “मी खरेच सांगतो गेल्या ३० – ३५ वर्षांच्या माझ्या अनुभवात गतिमान राजकीय नेतृत्व, नोकरशाही, सैन्य दलांची तयारी, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुत्सद्दी यांचा एवढा समन्वय आणि देशाच्या बाजूने उभे राहणारी एकजूट मी कधीही पाहिली नव्हती. या चारही पातळ्यांवर सर्वोत्तम कौशल्याच्या व्यक्तींकडे नेतृत्व आहे हे मी खात्रीने आणि अभिमानाने म्हणू शकतो. आजचे परराष्ट्रमंत्री आणि परराष्ट्र सचिव मला ज्युनिअर आहेत. त्यांनी माझ्या बरोबर काम केले आहे. ते दोघेही अतिशय उत्तम काम करताहेत. त्यांच्या मुत्सद्देगिरीचा मोठा लाभ आपल्याला नजीकच्या काळात दिसेल.”

दीपक वोरा यांनी चीनच्या नजीकच्या भवितव्याबद्दल अत्यंत अविश्वसनीय आणि धक्कादायक वाटू शकतील अशी भाकिते केली. ही भाकिते तशी वाटत असली तरी ती खरी होतील, यावर त्यांनी आवर्जून जोर दिला. ते म्हणाले, “चीनमध्ये सध्या प्रचंड असंतोष खदखदतोय. तो हाँगकाँगपुरता मर्यादित राहणार नाही. तो mainland China मध्ये पसरेल. तो आवरता येणार नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर चीन एकटा पडेल.

अमेरिका, युरोपशी त्याचे संबंध आणखी बिघडतील. आफ्रिकेत जिथे चीनची प्रचंड आर्थिक गुंतवणूक आहे, तिथूनही चीन विरोधातील आवाज बुलंद होतील. आफ्रिकन देश आता बस्स झाले हेच चीनला बजावतील. हे सगळे या २०२० वर्षाच्या अखेरपर्यंत घडत जाईल…. एवढेच नाही, तर आज चीनचे सर्वांत बलाढ्य समजले जाणारे सर्वेसर्वा नेते शी जिंगपिंग यांना “प्रकृतीच्या कारणास्तव” राजीनामा द्यावा लागेल. चीनी कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व मोडकळीत निघेल.

तो पक्ष कदाचित इतिहासजमा होईल…!! हे सगळे चीनच्या अतिरिक्त आक्रमकतेमुळे आणि भारताच्या खणखणीत प्रत्युत्तरातून घडायला सुरवात झाली आहे.” ही भाकिते ज्योतिषाची नाहीत, एका अनुभवी मुत्सद्द्याची आहेत हे दीपक वोरा यांनी पुन्हा एकदा आवर्जून सांगितले.

या पार्श्वभूमीवर भारताच्या भवितव्याबद्दलही वोरा यांनी सावध भाकिते केली. देशातल्या तरूणाईच्या हाताला कौशल्यपूर्ण कामे देऊ शकलो तर भारताचा resurgence कोणी रोखू शकत नाही. गरीबी कमी करण्यात वेगाने यश मिळवू शकलो तर भारत नक्की पुढे जाईल. समस्यांवर मात करण्याचा आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी देऊ शकतील, असे उद्गार वोरा यांनी काढले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*