राज्यात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती, चंद्रकांत पाटील यांचे निरिक्षण

महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे ही वेळ ओढवली असल्याचे निरिक्षण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नोंदविले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये समन्वय नसल्याने ही वेळ ओढवली असल्याचे निरिक्षण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नोंदविले आहे.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, मध्यावधी निवडणूक ही खरंतर कुणालाच नको असते. कारण एक निवडणूक लढणं पक्षाला काय आणि उमेदवाराला काय अवघडच असते. पैसे किंवा खर्च हा एकमेव मुद्दा नसतो तर खूप वेळ जातो, अनिश्चितता असते.

आज निवडून आलेले आमदार उद्या असतील की नाही ते ठाऊक नसतं. त्यामुळे मध्यावधी निवडणुका कुणालाच नको आहेत. पण अस्थिरतेमधून मार्ग कसा काढायचा हे पण लक्षात येत नाही. मध्यावधी निवडणूक होऊ नये म्हणून सगळेच प्रयत्न करतील. पण शेवटी कुणाचीच कॉम्बिनेशन जुळली नाहीत, तर काहीही पर्याय उरणार नाही.

शिवसेना खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मुंबईत झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वतुर्ळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. मात्र ही भेट सामनाच्या मुलाखतीसाठी होती हे भाजपातर्फे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणूक होऊ शकते अशी परिस्थिती आहे असे म्हटले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*