बिहार निवडणुकीमुळे औद्योगिक कामगारांची टंचाई

विशेष प्रतिनिधी

नाशिक : कोरोनाचा विळखा घट्ट होत असतांना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे बिहारी मजूर गावी परतले. आता या कामगारांना कामावर न येण्यास निवडणुकीचे निमित्त मिळाले आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होत असल्याने उत्तर महाराष्ट्रातील सध्या औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांसह बांधकाम क्षेत्र हवालदिल झाले आहे.

ज्या ज्या शहरांत औद्योगिक वसाहतीत उत्तर भारतीय कामगार आहेत. त्या त्या भागात राष्ट्रीय जनता दल, जनता दल,युनायटेड, समाजवादी पार्टी,बबहुजन समाज पार्टी यांसारख्या उत्तर भारातील पक्ष आहे. या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर राज्याबाहेर गेलेल्या कामगारांना मतदानासाठी आणण्यासाठी संपर्क केला जात आहे, त्यामुळे अनेक कामगार बिहारहून परतले नाहीत. जे आहेत त्यांना देखील गावी जाण्याची ओढ लागली आहे.

मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्यात सर्वच खासगी, सरकारी आस्थापना बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अर्थचक्र मंदावले, तब्बल दोन महिने कारखान्यांची चाके न फिरल्याने हातावर पोट असलेल्या कामगारांचे हाल झाले. हाताला काम नाही तर दुसरीकडे कुटुंबाची काळजी, लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्पपणे बंद असल्याने गावाकडे जाण्यासाठी कोणी पायी,सायकल किंवा मिळेल त्या वाहनाने गाव गाठले.

अनलॉक प्रक्रीया सुरु झाल्यानंतर परतीचा मार्ग मोकळा झाला तरी लाखो कामगारांनी परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यत गावाकडेच राहणे पसंत केले. त्यात बिहार विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्याने कामगारांना दिवाळी साजरी करण्याबरोबरच निवडणूकीचे निमित्त मिळाले. नोव्हेंबर महिन्यात निवडणूक प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर वर्ष संपण्यासाठी डिसेंबर एकमेव महिला शिल्लक राहत असल्याने नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यातच कामावर परतण्याची मानसिकता बिहारी कामगारांमध्ये निर्माण झाल्याने त्याचा परिणाम औद्योगिक उत्पादनावर होतांना दिसत आहे

नाशिक शहरात सातपूर,अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये साडेतीन हजार छोटे मोठे कारखाने आहेत, इगतपुरी, सिन्नर, गोंदे, वाडीवर्ङे, मालेगाव, जळगाव, धुळे, साक्री येथील औद्योगिक वसाहतीमध्ये छोट्या कारखान्यांची संख्या सहा हजाराच्या आसपास आहे. साडे नऊ लाख कामगारांना कारखान्यातून रोजगार मिळतो. मोठ्या कंपन्यांमधील कायमस्वरूपी कामगार स्थानिक आहे तर छोट्या युनिटमध्ये कामगार कंत्राटी असून यातील साठ टक्के कामगार उत्तर प्रदेश,बिहार,झारखंड, उत्तराखंड व पश्चिम बंगाल राज्यातील आहे. बिहार राज्यातील कामगार मुख्यत्वे छोट्या कामांमध्ये आहे. त्याचबरोबर बांधकाम व्यवसायातील लेबरची संख्या मोठी असल्याने उत्तर महाराष्ट्र आणि परिसरातील व्यवसाय अडचणीत सापडले आहे

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*