बाबरी मशिद निकालावरून शिवसेनेची कोंडी, सत्तेच्या लाचारीमुळे धड आनंदही व्यक्त करता येईना

बाबरी मशिद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे, अशी जाहीर भूमिका घेतल्यानंतर केवळ देशातच नव्हे तर जगभरच्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये ज्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले त्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची अवस्था केवीलवाणी झाली आहे. बाबरी पाडण्याच्या खटल्यातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर या निकालाचा जल्लोष करायचा तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी नाराज होतील, या भीतीमुळे हिंदुह्रद्यसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची ठाम भूमिका झाकून ठेवण्याची पाळी शिवसेनेवर आली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बाबरी मशिद प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर शिवसेनेची कोंडी झाली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी नाराज होईल या भीतीतून शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी मौन बाळगणे पसंत केले आहे. यामुळे कडवे शिवसैनिक मात्र मनातून दुखावले असून त्यांच्यापुढे स्वर्गीय बाळासाहेबांच्या आठवणी काढण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी किती आनंद व्यक्त केला असता, याची चर्चा निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये दबक्या आवाजात रंगू लागली आहे.

बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी थेट भूमिका घेतली होती. शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान वाटतो, असे म्हटले होते. जाहीर भाषणात ते म्हणाले होते की, साडेतीन हजार हिंदूंची देवळ पाडण्यात येऊन त्यांच्या मशिदी बांधण्यात उभ्या राहिल्या. आम्ही काय म्हणतो आम्हाला साडेतीन हजार मशिदी पाडायच्या नाहीत. आम्हाला आमच्या फक्त तीन मशिदी द्या. बाबरी जी पडली. दोन पाडायच्या आहेत आणि त्या म्हणजे काशी आणि मथुरा. बाकी ठेवा तुमच्याकडे. घाला लोटांगण.

याबाबत एका मुलाखतीत शिवसेनाप्रमुख म्हटले होते की, बाबरी पाडली ही गौरवाचीच गोष्ट आहे. त्यात लाजण्यासारखं काही नाही. बाबरी मशीद पाडली गेली, कारण त्या खाली राम मंदिर होतं. इतिहास असं म्हणतो की, बाबरानं हिंदू देवळं पाडली. आता आम्ही स्वतंत्र झालो आहोत, मशिदीच्या जागी देवळं उभी करू.

शिवसेनाप्रमुखांच्या या भूमिकेमुळेच त्यांना हिंदूह्रदयसम्राट ही उपाधी मिळाली होती. मात्र, आता राज्यातील सत्तेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांबरोबर महाविकास आघाडी केल्याने शिवसेनेला त्यांच्या बेगडी निधर्मीवादाची री ओढण्याची वेळ आली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मिळमिळीत प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, बाबरी विध्वंस प्रकरणात न्यायलायाने जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाचं मी, माझा पक्ष, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे स्वागत करतो.

न्यायालयाने सांगितलं आहे की हा पूर्वनियोजित कट नव्हता. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जो निर्णय दिला आहे. त्यावर शिवसेनेकडून लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, सतिश प्रधान जे-जे त्यावेळी तेथे उपस्थित होते त्या सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन. मात्र, केवळ तोंडदेखलं अभिनंदन करणाऱ्या शिवसेनेने निकालावर चुप्पीच साधली आहे. तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र बाळासाहेब ठाकरे यांची भूमिकाच जोरकसपणे पुढे नेत आता काशी, मथुरा बाकी हैचे फलक झळकावले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे वैचारिक वारस राज ठाकरे हेच असल्याचे यातून ध्वनीत झाले आहे. यामुळे कडवे शिवसैनिक मात्र मनातून सुखावले आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*