अबू आझमींची मंत्रालयात आदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी

  • बाबरी निकालानंतर आझमींना संविधान आठवले

वृत्तसंस्था 

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या समाजवादी पक्षाला आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. बुधवारी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात सपाचे आमदार अबू आझमी यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मानखुर्द येथील एस.एम.एस कंपनी बंद करावी या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी अबू आझमी म्हणाले की, ठाकरे सरकारला आम्ही पाठिंबा देऊनही ते आमचे काम ऐकत नाहीत, साधा फोनही उचलत नाही. आदित्य ठाकरेंना वारंवार फोन केला मात्र ते फोनही घेत नाही. त्यामुळे नाराज होऊन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आदित्य ठाकरेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचेही आझमी यांनी सांगितले.

देशाच्या लोकशाहीसाठी आजचा काळा दिवस आहे, १९९२ बाबरी मस्जिद जबरदस्तीने पाडण्यात आली, संपूर्ण जगाने ते पाहिले. हा खटला अनेक वर्षापासून सुरु आहे. आमचा कायद्यावर विश्वास आहे, पण जेव्हा पासून दिल्लीत मोदी सरकार आले आहे. तेव्हापासून सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, पोलीस यांना मोदी आणि अमित शहांनी बाहुले बनवले आहे.

बाबरीचा निकाल आला तेव्हा न्यायाधीशांनी सांगितले बाबरी मस्जिद पडली ते चुकीचे झाले, पण इतकी मोठी मस्जिद पाडली त्यात पुरावे मिळाले नाहीत. आता या देशात हेच होणार आहे, असा आरोप आमदार अबू आझमींनी केला. त्याचसोबत बॉम्बब्लास्टमधील साध्वीला सोडण्यात आले, कर्नल पुरोहित यांना सोडले, हेमंत करकरे यांनी मेहनतीने पुरावे गोळा केले.

उद्या हेमंत करकरे अप्रामाणिक होते त्यांनी चुकीचे केले असे बोलले जाईल, जोपर्यंत हे सरकार आहे, तोवर या देशात न्याय मिळण्याची अपेक्षा नाही, सीबीआय मोदी सरकारचे बाहुले आहे हे मी उघडपणे बोलतो, या देशात कायद्याचे राज्य आणायचे असेल तर भाजपासारखा पक्ष सत्तेतून बाहेर काढला पाहिजे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला धक्का पोहचवत आहेत त्यांना सत्तेतून बाहेर काढलेच पाहिजे. बाबरी ज्यांनी तोडली त्यांच्याविरोधात पुरावे मिळाले नाहीत, हे दुर्दैवी आहे, असे अबू आझमींनी सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*