श्रीनगरमध्ये पहिल्या महिला IG च्या हाती दहशतवाद विरोधी मोहिमेची सूत्रे

  • तेलंगण केडरच्या चारू सिन्हा CRPF च्या दहशतवाद विरोधी तुकडीचे करणार नेतृत्व

वृत्तसंस्था

श्रीनगर : देशाच्या संरक्षणार्थ तत्पर असणाऱ्या तुकडीपैकी एक म्हणजे CRPF च्या काश्मीर सेक्टरमधील तुकडीला पहिल्या महिला पोलीस अधिकारी मिळाल्या आहेत. दहशतवादविरोधातील कारवाईचे नेतृत्त्व करण्याची संपूर्ण जबाबदारी CRPF कडून महिला अधिकाऱ्यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. श्रीनगर सेक्टरची संपूर्ण जबाबदारी असणाऱ्या या महिला आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे चारू सिन्हा.

१९९६ बॅचमधील उत्तीर्ण असणाऱ्या चारू सिन्हा या आयपीएस अधिकारी आहेत. तेलंगणा कॅडरच्या सिन्हा यापुढे श्रीनगरमध्ये CRPF च्या महानिरीक्षक अर्थात आयजी म्हणून कार्यभार सांभाळतील.

सैन्य आणि काश्मीर पोलिसांनाही मदत 

श्रीनगर सेक्टरमध्ये CRPF च्या आयजीपदी यापूर्वी कधीच महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्य़ात आली नव्हती. काश्मीर सेक्टमध्ये सीआरपीएफकडून कायमच दहशतवादविरोधी कारवाया करण्यात आल्या आहेत. परिणामी येत्या काळातही दहशतवादाचं कंबरडं मोडण्यासाठी म्हणून भारतीय लष्कर आणि काश्मीर पोलिसांना सहकार्य करण्याची जबाबदारीसुद्धा चारू सिन्हा पार पाडणार आहेत.

आव्हानात्मक भागामध्ये काम करण्याची सिन्हा यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा त्यांनी बिहारमध्ये नक्षलवादाशी लढा देत असताना महानिरीक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडली होती. ज्यानंतर त्यांची बदली जम्मू येथे बीएसएफच्या आयजीपदी करण्यात आली होती. दरम्यान, सध्या त्यांची बदली करण्यात आलेल्या CRPF च्या श्रीनगर सेक्टरच्या हद्दीत काश्मीरलगत असणारे बडगाम, गांदरबाल, श्रीनगर आणि लडाखचाही समावेश होतो.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*