शेतात नाही वीज अन् २० हजारांचे बिल; ठाकरे – पवार सरकारचा “प्रताप”


  • जालना जिल्ह्यात वीज कनेक्शन नसणाऱ्या शेतकऱ्यांना पाठवले २० हजारांचे बिल
  • वीज मिळण्यासाठी २०१६ ला कोटेशन भरले; फक्त पोल उभे राहिले तारा नाही आल्या

वृत्तसंस्था

जालना : ठाकरे – पवार सरकारच्या महावितरण कंपनीचा जालना जिल्ह्यातील भोंगळसुती कारभार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील वैद्य वडगाव येथील एक दोन नव्हे तर ११ शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने वीज जोडणी न देता थेट २०-२० हजारांची वीजबिले दिल्याचे समोर आल्यानं शेतकरी संतप्त झालेत. “घरात नाही वीज अन् २० हजारांचे बिल”, अशी अवस्था या शेतकऱ्यांची झाली आहे.

जालन्यातील वैद्य वडगावच्या ११ शेतकऱ्यांना महावितरण कंपनीच्या दडपशाही विरोधात डोके फोडून घेण्याची वेळ आली आहे. २०१६ साली गावातील ११ शेतकऱ्यांनी शेतातील वीज पंपाला कनेक्शन मिळण्यासाठी महावितरणकडे पैसे भरले. शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली. सर्वच्या सर्व ११ शेतकऱ्यांच्या विहिरीपर्यंत पोल उभे राहिले.पण गेली ४ वर्ष झाली महावितरणकडून वीज जोडणी तर मिळाली नाहीच पण शेतकऱ्यांच्या हातात थेट २०-२० हजारांची बिले ठेवण्यात आली.

वीज मिळण्यासाठी आम्ही २०१६ ला कोटेशन भरले पण फक्त पोल उभे राहिले तारा आल्या नाहीत, काही नाही आणि २०-२० हजारांचे आम्हांला बिल आले. हे बिल आम्ही कोठून भरायचं, कोटेशन भरण्यासाठी आम्ही व्याजाने पैसे काढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

अगोदर आमच्या शेतात पोल वगैरे नव्हते कोटेशन भरल्यानंतर तीन महिन्यात पोल उभे राहिले. चार वर्ष होऊनही पोलवर लाईन ओढली नाही आणि कोरोना काळात आमच्या हातावर वीजबिले मात्र टेकवली. आम्ही लाईन वापरलीच नाही तर वीज बिले भरायची कशी? महावितरणने वीज जोडणी न देता थेट वीज बिले शेतकऱ्यांच्या हातावर टेकवल्यानं हे शेतकरी संतप्त झालेत. यापैकी काहींनी आत्महत्या करण्याचा इशारा दिलाय. जर महावितरणने वीज जोडणी दिली नाही.तर विजेचा वापर होईल कसा असा सवाल या शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय.

चार वर्ष झाली शेतात लाईट येण्यासाठी आम्ही व्याजाने पैसे काढून महावितरणला भरले.फक्त पोल उभे करून आम्हाला लाईन दिली नाही.हे बिल कसे भरायचे आहेत. वीज मिळाली नाही तर आम्ही जीव देऊ नाहीतर नाहीतर आत्महत्या करू, असा पवित्रा आता शेतकऱ्यांनी घेतला आहे.

शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून विजबिले देण्यात आली का याची खातरजमा करून दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांनी दिले. परंतु, महावितरण कंपनीकडे वीज कनेक्शन मिळण्यासाठी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत.पण वर्षानुवर्षे प्रतीक्षा करून अजूनही या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळाले नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या बांधावर पोल उभे राहून देखील कामं अर्धवट ठेऊन विजबिलं शेतकऱ्यांना देण्यात येतायत हा कोणता न्याय आहे, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था