‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी योगींचे पोलिसांना आदेश

  • कानपूर, मेरठ, लखीमपूर खेरीमधून बळजबरीने किंवा “ब्रेन वॉश” करून स्त्रियांचे धर्मांतर केल्याची माहिती समोर
  • लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याचीही तयारी

वृत्तसंस्था

लखनौ : उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर पावले उचलली आहेत. योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी राज्याच्या गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक अनौपचारिक बैठक घेतली. उत्तर प्रदेशात वाढत्या “लव्ह जिहाद” च्या घटना रोखण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुस्लिम पुरुषाशी लग्न करण्यासाठी बळजबरीने किंवा ब्रेन वॉश करून स्त्रियांचे धर्मांतर होते. कानपूर, मेरठ, लखीमपुर खेरी येथे या घटना मोठ्या प्रमाणावर पुुढे आल्या आहेत. नागरिकांनी पोलिसांत तक्रारी देखील दाखल केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणांमध्ये लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत.

या सर्व घटनांनामध्ये महिलांना धर्मांतर करून लग्न करण्यास भाग पाडल्याचे पुरावे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. “राज्यात वेगवेगळ्या भागातून लव्ह जिहादची प्रकरणे वाढत आहेत. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटना रोखण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. लव्ह जिहाद विरोधात कायदाही केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. योगी आदित्यनाथ यांचे माध्यम सल्लागार मृत्युंजय कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

“हा सामाजिक विषय आहे. हे थांबविण्यासाठी, या घटनांना गांभीर्याने घेतले पाहिजे. आरोपींविरोधात कारवाई होण्याची गरज आहे आणि आम्हाला कठोरपणे वागले पाहिजे. या घटनांची जलदगती न्यायालयात सुनावणी करता येतील. तसेच या प्रकणांमधील आरोपींना जामीन मिळू नये.” असे अतिरिक्त मुख्य गृहसचिव अवनीशकुमार अवस्थी यांनी सांगितले.

विशेष पथकाची स्थापना

कानपूरच्या जुही कॉलनीत आंतर-धार्मिक विवाहाच्या घटनांच्याच्या तपासासाठी विशेष पथकासाठी स्थापना करण्यात आली होती. लग्नाआधीच बळजबरीने किंवा “ब्रेन वॉश” करून या स्त्रियांचे धर्मांतर केले जात होते अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. काही दिवसांपूर्वी लखीमपूर खेरी जिल्ह्यातील एका गावात एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता.

या प्रकरणात पोलिसांनी नंतर दिलशाद या व्यक्तीला अटक केली. त्याने बलात्कार करून हत्या केल्याची कबुली दिली. ही मुलगी दिलशादशी संपर्कात असल्याचे तिच्या कॉल रेकॉर्डवरून समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. लखीमपुर खेरी प्रकरणात योगी आदित्यनाथ यांनी आवश्यक असल्यास एनएसएव्दारे तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*