मोदी सरकारचा महाराष्ट्राला मोठा दिलासा, पीएम केअर फंडातून सर्वाधिक २७५ व्हेंटिलेटर महाराष्ट्राला


  • ५० हजार मेड इन इंडिया व्हेंटिलेटरसाठी २ हजार कोटी मंजुर

विशेष प्रतिनिधी

 

नवी दिल्ली:  कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्राला मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पीएम केअर फंडातून सर्वाधिक २७५ व्हेंटिलेटर महाराष्ट्राला देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे स्थलांतरित मजुरांसाठी राज्यांना १ हजार कोटी रुपये देण्यात आले असून त्यातही सर्वाधिक १८१ कोटी रुपये महाराष्ट्रास देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी जीवरक्षक प्रणाली अर्थात व्हेंटिलेटर अत्यावश्यक असतात. देशात पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटर्सची उपलब्धता करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फंडातून त्यासाठी २ हजार कोटी रुपयांचा निधी मंजुर केला असून त्यातून ५० हजार मेड इन इंडिया व्हेंटिलेटरची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यांचा पुरवठा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे चालविल्या जाणाऱ्या कोव्हिड रुग्णालयांना करण्यात येणार आहे.


मेड इन इंडिया व्हेंटिलेटर !

 विरोधकांनी राजकीय स्वार्थासाठी टिकेची राळ उडवून दिलेल्या पीएम केअर फंडाचे महत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. देशातील व्हेंटिलेटर्सचा तुटवडा दूर करण्यासाठी ५० हजार व्हेंटिलेटरसाठी २ हजार कोटी रूपये पीएम केअर फंडातून देण्यात आले आहेत. या ५० हजार पैकी ३० हजार व्हेंटिलेटर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल)तर्फे बनविण्यात येत आहेत. उर्वरित २० हजार पैकी १० हजार व्हेंटिलेटर एग्वा हेल्थकेअर, ५ हजार ६५० व्हेंटिलेटर एएमटीझेड बेसिकतर्फे, ४ हजार व्हेंटिलेटर एएमटीजेड हायएंडतर्फे आणि ३५० व्हेंटिलेटर एलाइड मेडिकल बनविणार आहे.


आतापर्यंत २ हजार ९२३ व्हेंटिलेटर तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी १ हजार ३४० व्हेंटिलेटर राज्यांना पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक २७५ व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहे. राज्यातील कोरोनाची गंभीर स्थिती पाहता मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. यामुळे राज्यांच्या आरोग्य यंत्रणेवरील मोठा ताण कमी झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्राखालोखाल सर्वाधिक रुग्ण असलेल्या दिल्लीलादेखील २७५ व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे गुजरातला १७५, बिहार १००, कर्नाटक ९०, राजस्थानला ७५ व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महिनाअखेरपर्यंत सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना अतिरिक्त १४ हजार व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्यात येणार आहे.

स्थलांतरित मजुरांच्या कल्याणासाठी राज्ये – केंद्रशासित प्रदेशांना १ हजार कोटी रूपयांचा निधी यापूर्वीच देण्यात आला आहे. त्याचा उपयोग मजुराचा निवार, भोजन, उपचार आणि वाहतुक व्यवस्थेसाठी राज्यांनी करणे अपेक्षित आहे. या निधीमध्येही सर्वाधिक १८१ कोटी रूपये महाराष्ट्राला देण्यात आले आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेश १०३ कोटी, तामिळनाडू ८३ कोटी, गुजरात ७६६ कोटी, दिल्ली ५५ कोटी, प. बंगाल ५३ कोटी, बिहार ५१ कोटी, मध्य प्रदेश ५०, राजस्थान ५० कोटी आणि कर्नाटक ३४ कोटी ही राज्ये प्रमुख लाभार्थी ठरली आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती