- मोदी सरकारने अभिप्राय मागविला
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : निमलष्करी दलांमध्ये मोठा सामाजिक बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने या दिशेने पाऊल टाकले असून, लष्कर व निमलष्करी दलात तृतीयपंथीय व्यक्तींना अधिकारी पदावर नियुक्त करण्यासंदर्भात विचारणा केली आहे. केंद्र सरकारने देशातील निमलष्करी दल दलांना याविषयी अधिकृत भूमिका मांडण्यास सांगितले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने १ जुलै रोजी यासंदर्भात पत्र पाठवले आहे. केंद्रीय निमलष्करी दलांमधील सहाय्यक कमांडट पदासाठीच्या परीक्षेच्या नियमात महिला, पुरुष व तृतीय पंथीयांचा समावेश करण्यासंदर्भात अभिप्राय मागवले होते. मात्र, त्यावर निमलष्करी दलांकडून कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने गृह मंत्रालयाने पुन्हा स्मरण करून दिले आहे.
केंद्रीय लष्करी पोलीस दलांमधील सहाय्यक कमांडट पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या नियमांमध्ये बदल करून महिला, पुरुष यांच्यासोबत तृतीयपंथी व्यक्तीचा समावेश करण्याविषयी विचारणा करण्यात आली होती. त्यावर अद्याप पर्यंत सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी व सीआयएसएफकडून कोणतीही भूमिका मांडण्यात आलेली नाही. या मुद्याचा विचार करून केंद्रीय गृह मंत्रालयाला २ जुलैपर्यंत सकारात्मक अंतिम अभिप्राय द्यावा, असे मंत्रालयाने या पत्रात म्हटले होते. या अभिप्रायानंतर या संबंधीची अधिकृत घोषणा होऊ शकते.
निमलष्करी दलांमधील लष्करी पदावर तृतीयपंथी व्यक्तींना घेण्यासंदर्भात सरकारकडून चाचपणी सुरू असल्याचे या पत्रावरून दिसून येत आहे. सरकारने यासंदर्भात निर्णय घेतल्यास निमलष्करी दलांमध्ये महिला व पुरुष अधिकाऱ्यांबरोबर निमलष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश होईल. सध्या तरी लष्कर व निमलष्करी दलात तृतीयपंथीयांची भरती केली जात नाही. परंतु, अभिप्राय आल्यावर ही भरती शक्य होऊ शकते.