‘मेक इन इंडिया’ची भरारी, संपूर्ण भारतीय बनावटीचे विमान तयार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘मेक इन इंडिया’ने भरारी घेतली आहे. एका मराठी तरुणाने तब्बल नऊ वर्षांच्या प्रयत्नानंतर संपूर्ण भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतर गेल्या वर्षी या विमानाची नोंदणी झाली होती.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मेक इन इंडियाने भरारी घेतली आहे. एका मराठी तरुणाने तब्बल नऊ वर्षांच्या प्रयत्नानंतर संपूर्ण भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतर गेल्या वर्षी या विमानाची नोंदणी झाली होती.

कॅप्टन अमोल यादव यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. २०११ साली यादव यांनी अर्ज केला होता. परंतु, धोरणलकवा असलेल्या संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या सरकारने त्यांना काहीही मदत केली नाही. नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडून (डीजीसीए) विमानाला मान्यता मिळण्यासाठी अनेक वर्षे गेली. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपानंतर गेल्या वर्षी या विमानाची नोंदणी होऊ शकली.

मेक इन इंडिया प्रदर्शनामध्येही कॅप्टन अमोल यांनी विमानासह सहभाग घेतला होता. त्यानंतर यादव यांनी वेगाने काम सुरू केले. विमाननिर्मिती क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवू पाहणाऱ्या यादव यांच्या विमानाने चाचणीचा पहिला टप्पा पार केला आहे. संपूर्ण भारतीय बनावटीचे असे हे पहिलेच विमान आहे. पहिल्या टप्प्यात या विमानाचा विमानतळावरील वावर, उड्डाण, अवतरण यांची चाचणी धुळे विमानतळावर पार पडली.

कॅप्टन अमोल यादव यांनी १९९८ साली आपल्या थर्स्ट एअरक्राफ्ट या कंपनीच्या माध्यमातून देशातील पहिल्यावहिल्या विमाननिर्मितीचा प्रयत्न सुरू केला. पहिला प्रयत्न पूर्ण होऊ शकला नाही. मात्र त्यामुळे नाउमेद न होता त्यांनी २००३ मध्ये दुसऱ्या विमानाची निर्मिती सुरू केली. तो प्रकल्पही पूर्णत्वास गेला नाही. २००९ साली त्यांनी मुंबईतील चारकोप येथे आपल्या घराच्या गच्चीवर सहा आसनी विमानाची निर्मिती सुरू केली. २०११ साली अर्ज करूनही नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडून (डीजीसीए) विमानाला मान्यता मिळण्यासाठी अनेक वर्षे गेली. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपानंतर गेल्या वर्षी या विमानाची नोंदणी होऊ शकली.

कॅप्टन अमोल यांनी हे विमान कोणत्याही सरकारी मदतीशिवाय स्वबळावर तयार केले आहे. यासाठी त्यांनी आपले घरही गहाण ठेवले आहे. आतापर्यंत यावर ६ कोटींचा खर्च झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी दीड ते दोन कोटी रुपयांची गरज आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर विमान नियमित वापरासाठी सज्ज होईल. कॅप्टन अमोल यांनी १९ आसनी विमानही तयार करण्यास सुरुवात केली होती. पण आर्थिक अडचणींमुळे तो प्रकल्प थांबवावा लागला.

विमानाच्या पहिल्या चाचणीमध्ये त्याचा विमानतळावरील वावर कसा आहे याची पाहणी करण्यात आली. विमान सरळ रेषेत चालू शकते का, १८० अंशामध्ये ते वळते का, वेगावरील नियंत्रण या बाबींची चाचणी करण्यात आली. तसेच उड्डाण आणि अवतरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात सर्किट चाचणी केली जाईल. या वेळी विमान उड्डाण करून आकाशात एक फेरी मारेल आणि पुन्हा ते विमानतळावर उतरवण्यात येईल. येथे विमानापेक्षा वैमानिकाचे कसब महत्त्वाचे ठरेल. नव्याने तयार झालेल्या विमानाचे उड्डाण करताना जोखीम असते. त्यामुळे ही जबाबदारी कॅप्टन अमोल स्वत: घेणार आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*