महाभयानक…!! मुंबईत रूग्णालयाबाहेर १००० जणांचे मृत्यू का दडवले?


  • कोरोनाबाबत देवेंद्र फडणवीसांचे यांचे मुख्यमंत्र्यांना संतप्त पत्र

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई शहरात रूग्णालयाबाहेर झालेले पण विविध प्राधिकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले सुमारे १००० जणांचे मृत्यू अद्याप राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीत दाखविण्यात आलेले नाहीत. आकडेवारीचा हा महाभयानक घोळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. अचूकता हाच कोरोनाविरोधातील लढाईसाठी विश्लेषणाचा मुख्य आधार असल्याने याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे, असे फडणवीस यांनी ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या एका पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मुंबईत ज्या रूग्णांचा मृत्यू रूग्णालयाबाहेर झालेला आहे, असे मृत्यू अद्यापही दाखविण्यात आलेले नाहीत. या मृत्यूंच्या बाबतीत वॉर्ड अधिकारी किंवा तत्सम प्राधिकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले आहे, अशांचा आकडा अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही.

माझ्या माहितीप्रमाणे, गेल्या तीन-साडेतीन महिन्यात असेही किमान १००० जणांचे मृत्यू मुंबईत झाले आहेत, त्यांची अजूनही रेकॉर्डवर नोंद घेण्यात आलेली नाही. प्राथमिक संकलनातच आतापर्यंत किमान ४५० जणांचे मृत्यू नेमकेपणाने ओळखण्यात आलेले आहेत. एकूणच मृत्यूच्या संख्येत एकतर त्याचदिवशी किंवा फार तर ७२ तासांत तशी नोंद होणे आवश्यक आहे. परंतू तीन महिने लोटले तरी मृत्यूंची नोंद रिपोर्टमध्ये होत नाही आणि ते लक्षात आल्यानंतर सुद्धा एकदम मोठी संख्या दिसू नये, या भीतीने रोज थोडे-थोडे करून ते मृत्यूसंख्येत दाखविले जाणे, ही अतिशय चुकीची रणनीती आहे.

मुळात कोरोनाविरूद्धच्या लढाईत कोेणत्या आठवड्यात किती मृत्यू झाले, किती रूग्णसंख्या आढळली, म्हणजे संसर्ग (इन्फेक्शन) किती प्रमाणात झाले आहे, हे समजण्यासाठी आकडेवारी हा अतिशय महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. अचूक विश्लेषणाचा तो महत्त्वपूर्ण आधार आहे. या विश्लेषणातूनच योग्य रणनीती आखून त्याला पायबंद घालणे शक्य आहे. त्यामुळे नोंदी अचूक ठेवण्याचा आग्रह सातत्याने असला पाहिजे. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की, ही विलंबाची पद्धत बंद करून अचूक आकडेवारी हाती येईल आणि त्याचे तत्काळ रिपोर्टिंग होईल, याचा आग्रह आपण धरला पाहिजे. त्यादिशेने योग्य त्या सूचना आपण संबंधितांना द्याल, हा विश्वास वाटतो, असेही फडणवीसांनी या पत्रात नमूद केले आहे.

असेच एक पत्र यापूर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना १५ जून २०२० रोजी पाठविले होते. सुमारे ९५० जणांचे मृत्यू कोरोनामुळे झालेले असताना सुद्धा ते त्यावेळी दाखविण्यात आलेले नव्हते. त्यानंतर १६ जून २०२० रोजी मुंबईत ८६८ आणि मुंबईसह राज्यात एकूण १३२८ जणांचे मृत्यू अधिकचे दाखविण्यात आले. मुंबईत या ८६८ च्या व्यतिरिक्त सुमारे ३५० जणांचे जुने मृत्यू दरम्यानच्या काळात अधिक करण्यात आले. (जे प्रारंभी अपात्र ठरविण्यात आले, मात्र अपात्र ठरू शकत नाहीत, असे लक्षात आल्यावर ते दाखविण्यात आले.) म्हणजेच असे एकूण १२०० हून अधिक मृत्यू एकट्या मुंबईतील जुने परंतू नंतर दाखविण्यात आले आहेत. अशाच प्रकारात मोडणारी ही दुसरी बाब आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती