पत्र लिहिणारे नेते झुकायला तयार नाहीत; आझाद, सिब्बलांपाठोपाठ काँग्रेसच्या वर्मावर पृथ्वीराज चव्हाणांचे बोट


विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिणारे नेते बंडखोर नेते झुकायला तयार नाहीत. कार्यकारिणीच्या बैठकीतून त्यांच्यावर शरसंधान केले असले तरी ते आपले मुद्दे सोडायला तयार नाहीत. कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांच्या पाठोपाठ पृथ्वीराज चव्हाणांनी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “देशाची अर्थव्यवस्था बिकट स्थितीत आहे. चीनशी संघर्ष सुरू आहे. अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. असे असतानाही पक्षाकडे पूर्णवेळ नेतृत्व नसल्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका योग्यरित्या पार पाडू शकत नाही,” असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

७ ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना काँग्रेसच्या २३ नेत्यांनी पत्र लिहिले होते. या पत्राद्वारे पक्षाला एक पूर्णवेळ, सतत कार्यरत असणारे आणि सतत उपलब्ध असणाऱ्या व्यक्तीची अध्यक्षपदी निवड करण्याची मागणी करण्यात आली होती. या पत्रावर पृथ्वीराज चव्हाण यांनीही स्वाक्षरी केली होती.

या बाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “२०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर अचानक राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अध्यक्षपद सोडल्यामुळे नुकसान असे झाले की पक्ष निवडणुकीत मिळालेल्या पराभवाची समीक्षाच करू शकला नाही. त्यावेळी आमच्याकडे नेतृत्वच नव्हते. त्यानंतर सोनिया गांधी या हंगामी अध्यक्षा बनल्या. परंतु त्यांची प्रकृती पाहता त्या कायम कार्यरत असतील आणि आपल्या कार्यकर्त्यांसाठी कायम उपस्थित राहतील अशी अपेक्षा करता येणार नाही.”

आम्हाला अनेक राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्यात यश मिळाले. परंतु कर्नाटक आणि मध्य प्रदेशात सरकार टिकवण्यात आम्हाला अपयश आले. म्हणून आम्ही पक्षाला पूर्णवेळ नेतृत्वाची गरज असल्याचा विचार केला आणि आम्ही पत्राद्वारे आमचे म्हणणे सांगितल्याचं ते म्हणाले. काही नेत्यांना सोनिया गांधी यांची भेट घ्यायची होती. परंतु त्यांना भेटण्याची आम्हाला वेळ देण्यात आली नाही. म्हणून ७ ऑगस्ट रोजी आम्ही पत्र लिहून आमचे म्हणणे त्यांच्यासमोर मांडलं. आम्ही गांधी कुटुंबीयांबाहेरील व्यक्तीला अध्यक्षपदी निवडण्याची मागणी केली नव्हती. म्हणूनच हे पत्र गांधी कुटुंबीयांविरोधातील असल्याचा प्रपोगंडा पसरवण्यात आला असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.

राहुल गांधी तयार असल्यास उत्तम

चव्हाण म्हणाले, “राहुल गांधी जर पक्षाचे नेतृत्व करण्यास तयार असल्यास यापेक्षा उत्तम काहीच असू शकत नाही. परंतु त्यांना पक्षाचे नेतृत्व करायचे नाही. सोनिया गांधी आपल्या प्रकृतीच्या तक्रारींमुळे आपला पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. म्हणून आम्ही वर्कींग पार्लियामेंट बोर्डाची मागणी केली होती. हे गेल्या अनेक वर्षांपासून नाही आणि त्या मागणीत काही गैरही नाही.

चर्चेची अपेक्षा होती

आम्हाला कार्यकारिणीच्या बैठकीत पत्रावर चर्चा होईल अशी अपेक्षा होती. परंतु या बैठकीत पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या केवळ चारच नेत्यांना बोलावण्यात आले आणि त्यामुळे यावर चर्चा होऊ शकली नाही. यावर खुली चर्चा होईल अशीही आम्हाला अपेक्षा होती. परंतु आमच्यावरच आरोप करण्यात आले. अनेक नेत्यांनी पत्र न वाचताच टीका केल्याचे चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था