- जगातील एकूण लसींपैकी ९०% भारतीय लसी; बुद्धिमत्ता आणि टेक्नॉलॉजीतून भारत आणखी पुढे जाईल
विशेष प्रतिनिधि
नवी दिल्ली : कोरोनाशी भारत आत्मनिर्भरतेतून लढा देतोय. कोरोना काळात भारतीय आरोग्य संस्था अधिक स्वावलंबी झाल्या आहेत. कोविड-१९ वर १०० हून अधिक कंपन्या लस बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत कोणता देश किंवा कंपनी सर्वप्रथम लस तयार करेल हे सांगणे कठीण आहे. आम्हाला आशा आहे की, ही लस तयार झाली तर ती लपवली जाणार नाही, असे भारतात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लस तयार करणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितले. दिव्य मराठीने ही बातमी दिली आहे.
पूनावाला म्हणाले, “एक इंग्रजी म्हण आहे- एव्हरी क्लाऊड हॅज अ सिल्व्हर लायनिंग (प्रत्येक दुःख किंवा अडचणीच्या घटनेत एक संधी लपलेली असते). कोविड जेव्हा भारतात आला तेव्हा ताबडतोब निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये भारत आघाडीवर होता. या परिस्थितीकडे आपण एक संधी म्हणून पाहिले पाहिजे. ज्याद्वारे आपण आपली आरोग्यसेवा मजबूत करू शकतो. आपल्या आरोग्यसेवा धोरणांमध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. यामुळे देशातील नागरिकांना चांगली आरोग्यसेवा देता येईल.
जगातील एकूण लसींपैकी ९०% भारतीय आहेत. भारतीय कंपन्या जगातील उत्पादन क्षेत्रात आधीपासूनच आघाडीवर आहेत. महामारीच्या या काळात व्यवसाय आणि आरोग्य संस्था दोन्ही एकत्र आले आहेत, जेणेकरून भारत कोरोनाविरुद्ध आत्मनिर्भरतेने लढा देऊ शकेल.”
- भारताची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सीरम मायलॅबसोबत दररोज २ लाख किट तयार करत आहे. मला खात्री आहे की आम्ही उपलब्ध प्रतिभा, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण विकासासाठी मदत करू, जेणेकरून इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
- लस तयार करणे रोलर कोस्टर चालवण्यासारखे आहे. लस बनवताना चढउतार होतात. आपण संयम बाळगला पाहिजे. लगेच एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचू नये. चाचण्यांचे तीन टप्पे आहेत. आम्हाला तिन्ही टप्पे पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागेल.
- सध्या संपूर्ण जग एक अनपेक्षित महामारीशी लढा देत आहे. यामुळे आपले जीवन एक अनिश्चित काळासाठी ठप्प झाले आहे. प्रत्येक देश आपापल्या स्तरावर काम करत आहे. साथरोगाचा सामना करण्यासाठी आपण जे काही करू शकतो ते करणे आवश्यक आहे.
- आम्ही यूएस बायोटेक फर्म कोडानेक्स, ऑस्ट्रियाची थेमिस यासारख्या अनेक कंपन्यांसोबत भागिदारीच्या माध्यमातून लस तयार करत आहोत. याशिवाय दोन कंपन्या आहेत. सर्व कंपन्या ही लस विकसित करणे आणि बाजारात आणण्यासाठी मदत करत आहेत.
- सामायिक मॉडेलवर संशोधन, विकास यशस्वी झाले तर लस मोठ्या प्रमाणात तयार होऊ शकेल आणि जागतिक स्तरावर ती उपलब्ध होईल.
- भारतात लस तयार झाल्यास त्याची किंमत कमीच असेल. आम्हाला आशा आहे की सरकार ती खरेदी करेल आणि लोकांना मोफत उपलब्ध करुन देईल. लॉकडाऊनमुळे अनेक देशांमध्ये समस्या आहेत. तथापि, आमचे तंत्रज्ञान आधुनिक आहे. त्यातून लसीची मागणी पूर्ण करता येईल.
- सरकारच्या मागणीनुसार आणि चाचणीच्या यशावर आधारित ही लस भारताला उपलब्ध होईल. आम्हाला आशा आहे की, याचे सर्वाधिक डोस भारताला मिळतील.