कुमाँऊ पहाडीतील राज्यपालांनी ७९ व्या वर्षी पायी सर केला शिवनेरी

  • शिवजन्मस्थळी झाले नतमस्तक; मावळ्यांच्या आठवणीतही रमले

विशेष प्रतिनिधी

जुन्नर : उत्तराखंडच्या कुमाँऊ पहाडीतील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी किल्ले शिवनेरी पायीच सर केला. त्यामुळे सर्वच जण अवाक् झाले. गडांचे संवर्धन करायचे असेल तर प्रत्येक मंत्र्याला एक किल्ला दत्तक दिला पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

“यहाँ आकर अच्छा लगा. हम बहुत छोटे लोग है, हेलिकॉप्टरसे आते नही. शिवाजी महाराज इस किले पर पैदल आते थे, हम भी पैदल आहे है. ये पहाडी तो हमारे लिए कुछ भी नही है,” असे म्हणत राज्यपालांनी वयाच्या ७९ वर्षी पायी चालत शिवनेरी किल्ला सर केला. अशा प्रकारे पायी शिवनेरी किल्ला सर करणारे ते पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. राज्यपालांनी पायीच हा गड सर केल्याने सर्वच जण अवाक् झाले.

राज्यपाल कोश्यारी यांनी आज शिवनेरीला भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेबांचे दर्शन घेतले. तत्पूर्वी राज्यपालांनी पायीच हा गड सर केला. त्याचवेळी आतापर्यंत राज्याचे कोणतेच मुख्यमंत्री किल्ले शिवनेरीवर पायी चालत आले नाहीत. त्यांनी पायी यायला पाहीजे का? असा प्रश्न त्यांना विचारला असता. हा प्रश्न शेजारी उभ्या असलेल्या आमदार अतुल बेनके यांना तुम्ही विचारा अशी टिपण्णी करत कोणी कसं यावे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. माझी श्रद्धा होती म्हणून मी पायी आलो असे ते म्हणाले.

राज्यपाल कोश्यारी मूळचे उत्तराखंडचे. त्यांचा जन्म कुमाँऊ पहाडीतील बागेश्वरचा. बालपण, शिक्षण, राजकीय कारकीर्द उत्तराखंडच्या पहाडी क्षेत्रात व्यतीत झाली. कुमाँऊ विद्यापीठात शिक्षण झाले. पहाडी क्षेत्रात वावरण्यात आयुष्य व्यतीत केलंय.

राज्यपाल म्हणाले, “शिवनेरीवर येण्यापूर्वी अनेकांनी मला तिथे पाऊस आहे. चिखल आहे. शिडी चढून जावे लागेल असे म्हणून घाबरवले होते. परंतु शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन होणे हा माझ्या भाग्याचा क्षण आहे. शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्तीमत्व नव्हते तर ते अवतारी पुरुष होते. त्यांच्यासारख्या महापुरुषांकडून प्रेरणा मिळते. ते खरे पूजनीय आदर्श आहेत.

शिवजन्मस्थळी आल्यावर महाराजांच्या आयुष्यातील कर्तृत्व प्रवासाकडे ध्यान जाते.” शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे तान्हाजी मालुसरे, हंबीरराव मोहिते यांचीही आठवण कोश्यारी यांनी काढली. यापुढील काळात राम, कृष्ण, गुरु गोविंदसिंग, शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत जेणे करून जग आपल्या देशाकडे तिरक्या नजरेने पाहू शकणार नाही, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

राज्यपालांनी संपूर्ण शिवनेरी गडाची पायी चढून पाहणी केली. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक डॉ. राजेंद्र यादव उपस्थित होते. गडावरील शिवाई देवतेची आरती करून त्यांनी दर्शन घेतले. विविध वास्तूंची माहिती घेतली. गडावरील विविध झाडांची नावे विचारत आणि दिलखुलास गप्पा मारत त्यांनी शिवनेरीचा फेरफटका मारला. शिवकुंज इमारतीतील राजमाता जिजाऊ आणि बालशिवबांच्या प्रतिमेशी ते लीन होऊन नतमस्तक झाले.

शिवजन्मस्थळी शिवाजी महाराजांच्या पाळण्याची पूजा करत तेथील महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*