- गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन; चौकशीचे आदेश
- फोनच्या तपशीलाविषयी अधिकृत माहिती नाही
वृत्तसंस्था
मुंबई : काय डेअरिंग वाढली आहे अंडरवर्ल्डची… सुशांत प्रकरणातून नार्कोटिक्स डिपार्टमेंट बॉलिवूड – ड्रग्ज कनेक्शन बाहेर आणत असताना आधी दाऊद गँगचा मातोश्रीवर निनावी फोन आला. आता शरद पवारांच्या सिल्वर ओकवर निनावी फोन आला. मात्र हा दाऊद गँगचा निनावी फोन नव्हता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला आहे. मात्र भारताबाहेरून हा फोन आला एवढीच माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी रविवारी हा फोन आला होता. गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र ही धमकी जीवे मारण्याची आहे की खंडणीबाबत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यानंतर कंगना रनौतप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही धमकीचे फोन आल्याचे समजते.
गृहमंत्री काय म्हणाले होते?
“कंगनाने मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केली आहे. त्यामुळे तिला महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस हे सक्षम पोलीस दल आहे. त्याची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते. अशा पोलिसांविषयी एखादी अभिनेत्री बोलत असेल तर योग्य नाही. त्यांना जर सुरक्षित वाटत नाही तर त्यांनी मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही,” असं गृहमंत्री अनिल देशमुख काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. यावरुनच त्यांना कालच धमकीचा फोन आला होता.
गृह मंत्रालयाने या प्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत. परंतु याबाबत गृह मंत्रालयाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या प्रकरणी ठाकरे – पवार मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचेही कळते.
मातोश्रीवर धमकीचे कॉल
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान ‘मातोश्री’वर फोनवरुन धमकी दिल्याची माहिती समोर आली. केवळ मातोश्रीच नाही तर शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरही धमकीचे फोन आल्याचे कळले.
याप्रकरणी स्थानिक खेरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथक कसून तपास करत आहेत. यासोबतच या प्रकरणाची माहिती सायबर पोलिसांना देखील देण्यात आली आहे. हा कॉल नक्की दुबईवरुन आला होता का? की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कोणी खोडसाळपणा तर केला नाही ना? याची देखील माहिती घेण्यात येतं आहे.