काँग्रेसला पुढील ५० वर्षे विरोधातच बसावे लागेल; गुलाम नबी आझादांचा इशारा

  • काँग्रेसच्या हिताचा विचार करणारे आमच्या पत्राचे स्वागत करतील, आझाद यांचा दावा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसमधील बंडाळी शमायला तयार नाही. “काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणूका झाल्या नाहीत तर पक्ष मजबूत होणार नाही. त्यामुळे काँग्रेसला पुढची ५० वर्षे विरोधी बाकांवर बसावे लागेल,” असा गंभीर इशारा काँग्रेसचे बंडखोर नेते गुलाम नबी आझाद यांनी दिला आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांविषयी काँग्रेसमध्ये विरोधाची भावना निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यावर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी भूमिका मांडली असून, सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांपैकी एक असलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पत्र लिहिलेल्या नेत्यांविरूद्ध बोलणाऱ्यांचा समाचार घेतला.

सध्या अध्यक्ष होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला एक टक्केही पाठिंबा मिळू शकत नसल्याचे आझाद म्हणाले. “जर पक्षांतर्गत निवडणुका झाल्या तर पक्ष पहिल्यापेक्षा चांगली कामगिरी करेल अन्यथा पुढील ५० वर्षेही सलग विरोधातच बसेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

“ज्या कोणी व्यक्ती आमच्या या प्रस्तावाचा विरोध करत आहेत ते केवळ आपले पद जाऊ नये यासाठी करत आहेत. जर पक्षांतर्गत निवडणुका झाल्या तर पक्षाची कामगिरी पहिल्यापेक्षाही उत्तम होईल. अन्यथा पुढील ५० वर्षेदेखील काँग्रेस विरोधकांच्याच भूमिकेत दिसेल,” असं म्हणत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. “तुम्ही जेव्हा एखादी निवडणूक लढता तेव्हा कमीतकमी ५१ टक्के मते तुमच्या बाजूने असतात आणि पक्षात केवळ तुम्ही २ ते ३ लोकांच्या विरोधात निवडणूक लढवता. ५१ टक्के मते मिळणाऱ्या व्यक्तीचीच त्या पदावर नियुक्ती केली जाते. जी व्यक्ती जिंकेल तिच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केलं. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या विषयावर भाष्य केलं.

एक टक्काही पाठिंबा नाही

“निवडणुकीचा एक फायदा असा होतो की, तुम्ही निवडणूक लढवता, तेव्हा कमीत कमी पक्ष तुमच्यासोबत उभा राहतो. सध्या अध्यक्ष होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला एक टक्केही पाठिंबा मिळू शकत नाही. कार्यसमितीचे सदस्य निवडून आले, त्यांना हटवता येत नाही. मग समस्या काय आहे?,” असा सवालही त्यांनी केला.

हिताचा विचार करणारे स्वागत करतील

“जे पदाधिकारी वा राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आमच्या प्रस्तावाचा विरोध करत आहेत, त्यांना माहितीये की निवडणुका झाल्यास ते कुठेच दिसणार नाहीत. जे कुणी काँग्रेसच्या हिताचा विचार करत आहेत, ते आमच्या पत्राचे स्वागतच करतील,” असे आझाद यांनी नमूद केले.

काँग्रेस अध्यक्षपदी पूर्णवेळ व कार्यक्षम व्यक्तीची निवड करण्यात यावी, अशी मागणी करत पक्षातील २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रावरून काँग्रेसमध्ये अतंर्गत कलह निर्माण झाला होता. त्यानंतर काँग्रेस कार्यसमितीच बैठक पार पडली. या बैठकीतही गोंधळ झाला होता. त्यानंतर अध्यक्ष निवडीच्या वाद शमला गेला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*