अमेरिकन काँग्रेसमध्ये ठराव; भारताला पाठिंबा, चीनचा निषेध

इंडिया कॉकसची कामगिरी; अमेरिकेकडून भारताच्या आक्रमकतेचे कौतुक


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : भारत – चीन हिंसक संघर्षात भारताने चीनविरोधात दाखवलेल्या आक्रमकतेचे अमेरिकेने कौतुक केलं आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये दोन शक्तिशाली सिनेटर्स ग्रुपकडून चीनच्या आक्रमकतेचा निषेध करणारा ठराव सादर करण्यात आला. चीनकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा उल्लेख ठरावात करण्यात आला आहे. पीटीआयने यासंबंधी बातमी दिली आहे.

अमेरिका कोणताही आंतरराष्ट्रीय धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी त्याचे पडसाद काँग्रेसमध्ये उमटतात. चीनविरोधातील ठराव हा त्याचाच एक भाग मानला जात आहे.

चिनी सैन्यांकडून भारतीय सैन्यांविरोधात घेतली जाणारी भूमिका, लष्कर पाठवण्याच्या घटना तसेच पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बुहमत असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर जॉन कोर्निन आणि सिनेटच्या गुप्तचर निवड समितीचे सदस्य मार्क वॉर्नर यांनी हा ठराव सादर केला. जॉन कोर्निन आणि मार्क वॉर्नर सिनेट इंडिया कॉकसचेही सह-प्रमुख आहेत.

“सिनेट इंडिया कॉकसचा सह-संस्थापक या नात्याने भारत आणि अमेरिकेमधील दृढ संबंध किती महत्त्वाचे आहेत याची मला जाणीव आहे,” असं जॉन कोर्निन यांनी सांगितलं. “मी चीनविरोधात भूमिका घेण्याच्या तसंच इंडो-पॅसिफिक क्षेत्र स्वतंत्र राहण्यासाठी भारताने दाखवलेल्या कटिबद्धतेची प्रशंसा करतो,” असंही ते म्हणाले आहेत.

१५ जून रोजी गलवान खोऱ्यात नियंत्रण रेषेवर भारत आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. चीनचे जवानही यामध्ये ठार झाले होते. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मार्क वॉर्नर यांनी वादग्रस्त ठिकाणी चीनकडून चिथावणी देणाऱ्या गोष्टी करण्यात आल्या असल्याचं म्हटलं आहे.

चीनकडून नियंत्रण रेषा बदलण्यासाठी प्रयत्न करण्यात आला असून हा ठराव त्याचा निषेध करतो असे मार्क वॉर्नर यांनी सांगितलं आहे. लोकशाही मूल्यांचा आदर करत असल्याने भारत आणि अमेरिकेतील संबंध घट्ट असल्याचंही ते म्हणाले आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*